शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

क्रीडा संकुलातील सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार - क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :  जिल्हा क्रीडासंकुलात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध सोयी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी  निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिले.
लोकनेते स्व. राजारामबापू पाटील चॅरीटेबल ट्रस्ट, सांगलीच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे आयोजित जयंत चषक  खुल्या राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, धनंजय पाटील, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, कमलाकर पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शासन क्रीडा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून सोयी सुविधांसाठी मदत करेल. देशात, राज्यात क्रिकेट, कबड्डी अशा स्पर्धा नेहमीच मोठ्या प्रमाणावर भरविल्या जातात परंतु दुर्लक्षित असणाऱ्या तायक्वाँदो खेळामध्ये लक्ष घालून या खेळाच्या स्पर्धा भरविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. क्रीडा राज्यमंत्री म्हणून आपल्या ज्या काही मागण्या, अडचणी असतील त्या सोडविण्याचे काम निश्चितपणाने करू. जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेल्या मागण्यांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो खेळाडू अर्णव अत्रे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी तायक्वाँदो खेळाडूंशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच तायक्वाँदो खेळाडूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या विविध सोयी सुविधांची राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी करून जिल्हा क्रीडा संकुलात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधाबाबत कौतुक करून समाधान व्यक्त केले.
प्रारंभी लोकनेते स्व. राजारामबापू पाटील कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विनाअनुदानित शाळांनाही क्रीडा साहित्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली. स्वागत धनंजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक संजय बजाज यांनी केले. सूत्रसंचालन एम. सी. कांबळे यांनी केले.
       या कार्यक्रमापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी येथे स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) यांच्या समाधीस्थळी भेट देवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा