रविवार, २३ जून, २०१९

विकास कामांसाठी भरीव निधी देवू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कवठेपिरान येथे आयोजित विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिमराव माने, हुतात्मा दुध संघाचे गौरव नायकवडी, शेखर इनामदार, सरपंच सौ. गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हिंदकेसरी पै. मारूती माने विकास कार्यकारी सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिंदकेसरी पै. मारूती माने यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच 3 कोटी 65 लाख रूपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचा व 4 कोटी रूपये खर्चाच्या पूरसंरक्षक घाटाच्या कामाचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नुतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना लागणारा निधी कमी पडू देणार नाही. प्रामुख्याने या परिसरात आवश्यक असणारे ग्रामीण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील. शिवप्रतिष्ठानतर्फे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल.
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शासन शेती आणि शेतकरी यांना प्राधान्य देवून विविध योजना, ध्येय, धोरणे राबवत आहे. कृषि कर्जमाफी, कोतवालांची मानधन वाढ, शेतकरी सन्मान योजना यासारखे अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासन राबवित आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्वसामान्य माणसांसाठी अखंड काम करू. सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न समजवून घेऊन काम करू अशी ग्वाही दिली.
भिमराव माने यांनी कवठेपिरानसह आठ गावातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, दर्जावाढ केलेले रस्ते, शिवसृष्टी यासारखी कामे प्राधान्याने व्हावीत अशी विनंती केली.
यावेळी कवठेपिरान पंचक्रोशीतील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


शुक्रवार, २१ जून, २०१९

योगधारणेला दैनंदिन जीवनशैली बनवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्स्फूर्तपणे साजरा

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धारणा दैनंदिन जीवनशैली बनवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज  येथे केले.
    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे तसेच, गुरूदेव आश्रम बालगाव, पतंजली योग समिती, आयुष मंत्रालय, ब्रह्माकुमारी, विविध योगासन संघटना यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल, मिरज रोड, सांगली येथे आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रात्यक्षिकांत डॉ. चौधरी यांच्यासह महापौर संगिता खोत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, गुरूदेवाश्रमाचे स्वामी अमृतानंद, अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, पतंजली योग समितीचे शाम वैद्य, क्रीडा अधिकारी एस. जी. भास्करे, प्रशांत पवार, सीमा पाटील, आरती हळिंगे, राहुल पवार, जमीर अत्तार आदि उपस्थित होते.
    पतंजली योग समिती यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी  योग प्रात्यक्षिके, योगांचे जीवनातील महत्त्व उपयुक्तता याबाबत योग प्रशिक्षक श्याम वैद्य यांनी माहिती दिली. योग प्रशिक्षक मृणाल पाटील, शोभा बन्ने, स्वामी अमृतानंद, राजू बांदल, प्रीती जावळे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी शरीर शिथिलीकरणानंतर विविध योगासने कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती आदिंची प्रात्यक्षिके करण्यात आली. योगासनांमध्ये दंड स्थितीतील आसने, बैठक स्थितीतील आसने, पोटावर झोपून करावयाची आसने, पाठीवर झोपून करावयाची आसने यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधऱी यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विविध मान्यवर, क्रीडा संस्था, मंडळे, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. क्षितिजा पाटील, तसेच ब्रह्माकुमारी यांच्यातर्फे सादर करण्यात आलेली योगासने सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली.
सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. माणिक वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने संकुल परिसर स्वच्छता करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयाच्या वतीने वाहतूक नियंत्रण व बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने रूग्णवाहिका व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर योग साधनेला मान्यता मिळवून दिल्याने योग दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.
00000



गुरुवार, ६ जून, २०१९

शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणारी - प्रधानमंत्री पीक विमा योजना

खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम केले जात आहे.
सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात भात (24 महसुली मंडळे), ज्वारी (50 महसुली मंडळे), बाजरी (34 महसुली मंडळे), भुईमूग (56 महसुली मंडळे), सोयाबीन (49 महसुली मंडळे), मूग (31 महसुली मंडळे), उडीद (31 महसुली मंडळे), कापूस (3 महसुली मंडळे) या अधिसूचित पिकांसाठी, एकूण 278 अधिसूचित महसूल मंडळ / मंडळगटस्तरावर विमा क्षेत्र घटक धरुन, तसेच मका (9 तालुके), तूर (जत तालुका) या अधिसूचित पिकांसाठी, एकूण 10 अधिसूचित तालुका / तालुकागटस्तरावर ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, मुंबई मार्फत राबविण्यात येत आहे.
    नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास योजनेतील अटी-शर्तीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. अन्नधान्य गळितधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर 2 टक्के निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पनाच्या 5 वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत जोखमींच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत (1) अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकाची पेरणी झालेले क्षेत्र हे 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास अधिसूचित विमा क्षेत्र घटक हे विमा संरक्षित रक्कमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईस विमाधारकांसाठी पात्र राहील. (2) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित विमा क्षेत्र घटक हे नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के मर्यादेपर्यंत आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देय आहे. (3) पीक पेरणी पासून काढणीच्या कालावधीत दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ या सारख्या टाळता येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षण देय आहे. (4) गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामा करुन निश्चित केले जाते. (5) ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्याबांधून सुकवणी करणे आवश्यक आहे अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांच्या काढणीनंतर 14 दिवसांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती तसेच चक्रीवादळ, वादळी पाऊस अवेळी पाऊस यामुळे कापणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती 72 तासांच्या आत संबंधित बँक / वित्तीय संस्था / विमा कंपनी यांना देणे बंधनकारक आहे.
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, जवळच्या प्राधिकृत बँका/ प्राथमिक कृषि पत पुरवठा करणाऱ्या संस्था / संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात, योग्य त्या विमा हप्त्यासह, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 8अ चा उतारा, पेरणीचा दाखला किंवा पेरणी घोषणा पत्र, बँक पासबुकाची प्रत, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा/ सहमतीपत्र, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक  कागदपत्रासह प्रस्ताव विहीत वेळेत सादर करावा. तसेच बिगर कर्जदार शेतकरी विमा संकेतस्थळावर (www.pmfby.gov.in) ऑनलाईन अर्ज भरू शकतील. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक असल्याने सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे त्यांच्या कर्ज मागणी अर्जामध्ये नमूद केलेल्या पिकाच्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेणे, तसेच आधार कार्ड मोबाईल क्रमांक / ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे संबंधित बँकेकडे चौकशीकरुन विमा प्रस्ताव दाखल केल्याची खात्री शेतकऱ्यांनी करावी. तसेच, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.

                                                      शंकरराव पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
00000