सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

माता व बाल मृत्यू शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

माता व बाल मृत्यू शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे - माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी - आरोग्य ‍विभागास आवश्यक निधी उपलब्ध करून देवू सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : स्वत:पेक्षा आपल्या कुटूंबाची जास्त काळजी घेत असताना महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिला सुदृढ असल्यास कुटुंब, समाज, गाव व देश सुदृढ होतो. त्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. यासाठी आरोग्य ‍विभागास आवश्यक निधी उपलब्ध करून देवू. आरोग्य विभागाने माता व बाल मृत्यू शुन्य टक्के करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शायकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महिलांनी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता पडल्यास त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. वेळीच निदान व उपचार केल्यास मृत्यू टाळता येतील. महिला ज्या प्रमाणे कुटुंबाची काळजी घेतात त्या प्रमाणेच त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत सुंदर असल्याचे ते यावेळी म्हणाले. खासदार संजय पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जावून सर्व्हे करून डेटा हाती आल्यानंतर उपचारासाठी वेगवेगळ्या फंडातून मदत करण्यासाठी प्रयत्न करू. राज्याला व देशाला आदर्श देण्याचे काम जिल्हा करेल. वेगवेगळे उपक्रम हाती घेवून यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी सहकार्याची भूमिका बजावतील, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, घराचा पाया महिला आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहिम सुरू आहे. आरोग्याचा मुळ आधार पोषण हाच आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या पोषणावरती जास्त भर देणे गरजेचे आहे. पोषणामध्ये आयर्न (लोह) हा घटक महत्वाचा आहे. आयर्न वाढविण्यासाठी योग्य रितीने जेवण करावे. सकाळी उठल्यापासून 30 ते 40 मिनीटांमध्ये काही तर खावे, यामध्ये कोणतेही एक फळ, केळी घेतली तरी चालेल. गरोदर मातांनी फळे खावीत. खाद्यपदार्थामध्ये आयर्न जास्त असले पाहिजे. त्यासाठी हिरवा भाजीपाला जेवणामध्ये घ्यावा. गुळामध्ये प्रोटीन व आयर्न असते. पत्तागोबी, फुलगोबी, मासांहार, डाळी, अख्खा मसूर मध्ये आयर्न भरपूर आहे. गरोदर मातांनी आयर्न कमतरता टाळण्यासाठी त्यांना देण्यात येणारी आयर्न गोळी घ्यावी. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात सर्व घरामध्ये तपासणी होणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. किमान तीन महिन्यातून एकदा आपला रक्तदाब, 30 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनी शुगर, हिमोग्लोबीन या तीन प्रकारच्या तापसण्या वर्षात किमान चार वेळा कराव्यात. सर्वांनी आरोग्यावर लक्ष द्या. ही मोहिम यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी मोहिमेबाबत सविस्तर माहिती देवून ते म्हणाले, सुदृढ समाजासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. महिला निरोगी रहावी, जागरूक व्हावी आणि समाजात तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी नवरात्र उत्सव दरम्यान माता सुरिक्षत तर घर सुरक्षित या आरोग्य तपासणी उपक्रम मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान आदरयुक्त भावनेतनू सार्वजनकि आरोग्य विभागाच्यावतीने महिलांसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 185 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा करून देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 18 वर्षावरील अविवाहित महिला, विवाहित महिला (ज्यांना अपत्य नाही), विवाहित महिला (ज्यांना 1 व 2 अपत्यावरील असेलेले), 30 वर्षावरील सर्व महिला व पुरूष यांचे उंची आणि वजनाचे मोजमाप, हिमोग्लोबीन, मधुमेह, रक्तदाब, रक्त गट आणि असंसर्गजन्य आजार अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शून्य ते 18 वयोगटातील मुला-मुलींची घरोघरी जावून तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातून दर्जेदार सेवा देण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शुभारंभ फित कापून करण्यात आला. तसेच स्मार्ट पीएचसी जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मोनिका करंदीकर यांनी केले. आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी मानले. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गरोदर माता, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 00000

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

जिल्हा उद्योग केंद्रात गुंतवणूक व निर्यात विषयी 28 रोजी कार्यशाळा

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : उद्योग संचालनालयामार्फत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या सहकार्याने 28 सप्टेंबर रोजी गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या विषयी कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सांगली येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे. यामध्ये निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था, संघटना, समुह, वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात विषयक काम करणारे घटक, संशोधक, बँक इत्यादी सहभागी होणार आहेत. 0000

प्रक्षेत्र भेट कार्यक्रमासाठी 10 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्यांतर्गत प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी विटा अंतर्गत खानापूर, तासगाव, पलूस, आटपाडी, कडेगाव या तालुक्यामध्ये आयोजित केला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दि. 3 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जमा करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी विटा यांनी केले आहे. 0000

"माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान 18 वर्षावरील महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : शासनातर्फे दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानात जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. या अभियानाच्या जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी मोहिमेच्या उद्घाटनादिवशी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विशेष मेडीकल व डेंटल शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, आरसीएचओ डॉ. वैभव पाटील, डीआरसीएचओ डॉ. विवेक पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आदि उपस्थित होते. 30 वर्षावरील सर्व महिलांचे रक्तदाब, हिमोग्लोबीन, मधुमेह व थायरॉईड यांच्या अचूक तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन प्रशिक्षणाची तातडीने सोय करावी. तसेच ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांनी त्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे. सर्व प्रकारच्या तपासण्या अचूक असाव्यात. या तपासण्यानंतर ज्या महिलांमध्ये आरोग्य विषयक उपचारांची गरज भासेल त्यांना उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयाकडे वर्ग करावे. गरोदर स्त्रियांची जास्त काळजी घ्यावी. या तपासण्यांसाठी डिजीटल उपकरणांचा वापर करावा. महिलांमध्ये तंबाखू सेवनाची सवय असल्यास फोर फिंगर टेस्ट करावी. कर्करोगाविषयीच्या तपासण्याही कराव्यात. 40 वर्षावरील सर्व महिलांची सी.एच.ओ यांनी मोतिबिंदूची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या अभियानामध्ये पुढील प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. वजन व उंची, रक्त व लगवी, एक्सरे, मेमोग्राफी, कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग, आरटीआय-एसटीआय तपासणी, माता व बालकांचे लसीकरण, तज्ज्ञांमार्फत अतिजोखमीच्या मातांची तपासणी, सोनोग्राफी व सल्ल्यानुसार इतर तपासणी. औषधोपचार त्यामध्ये आयएफए, फोलिक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न सुक्रोज इंजेक्शन, आरआयटी/एसटीआय उपचार. तसेच पोषण, आरआयटी व एसटीआय, बीएमआय, मानसिक आरोग्य, स्तनपान व व्यसनमुक्ती या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावर देण्यात येणार आहे जोडप्यांना व दोन अपत्य असणाऱ्या मातांना उपलब्ध साधनांबाबत माहिती दिली जाणार आहे. 0 ते 6 वर्षे वयोगटातील मधील बालकांची तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाला जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेवक, सेविका यांनी घरोघरी जाऊन शिबीर व उपलब्ध सुविधा बाबत माहिती द्यावी या बाबतच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच या मोहिमेमध्ये 20 हजार 100 इतक्या गरोदर मातांची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. 00000

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून 10 वी च्या विद्यार्थीनीचे विशेष कौतुक

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या कामातून प्रेरणा घेवून सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील 10 वी ची विद्यार्थीनी सुखदा धनंजय भोळे हिने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेवून अग्नीपंख हे पुस्तक व रोपटे भेट दिली. यावेळी तिचे पालक धनंजय भोळे व आजोबा आनंदराव झांबरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थीनीस स्वलिखीत शुभेच्छा पत्र दिले. 00000

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : आगामी सण, उत्सव व विविध आंदोलने या बाबींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे. अशा मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढू नयेत असे मार्ग, अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटात, किंवा घाटावर किंवा सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवळे, आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत, किंवा सार्वजनिक जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 33, 35, 37 ते 40, 43, 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधिन असलेल्या व त्यांस पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार प्रदान केले आहेत. सदरचा आदेश दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. या दरम्यान पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण, जनसमुदाय इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. सदर आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे आदेश पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिले आहेत. 00000

लम्पी चर्मरोगाच्या लसीकरणासाठी 310 खाजगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील जनावरांमध्ये पसरत असलेल्या लम्पी चर्मरोग साथीचा प्रादुर्भाव जलद गतीने व प्रभावीपणे रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी 310 खाजगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे, राज्यातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा साथ रोग आढळून आला आहे व जलदगतीने पसरणार अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही सदर आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याकामी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरण करण्यासाठी खाजगी सेवादाता यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी विनंती केली आहे. लम्पी चर्मरोग नियंत्रण व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने खाजगी सेवादाता यांच्या सेवा अधिग्रहीत करणे आवश्यक आहे. डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सदर आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील 310 खाजगी सेवादाता यांच्या सेवा विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिग्रहीत करण्यात आली आहे. संबंधित खाजगी सेवादाता यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांच्या नियंत्रणाखाली व आदेशान्वये कामकाज करावयाचे आहे. खाजगी सेवादाता यांना मानधन अदा करावयाची कार्यवाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी नियमानुसार करावयाची आहे, असेही या आदेशात म्हटले आहे. 00000

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

लम्पी चर्मरोग - खबरदारी, लसीकरण, वेळीच औषधोपचार हाच उपाय

सद्या देशात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची साथ आली आहे. आपल्या जिल्ह्यातही या रोगाचा प्रसार होत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 118 इतक्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून यामुळे तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 जनावरे या रोगातून बरीही झाली आहेत. वेळीच निदान व योग्य उपचार यामुळे लम्पी चर्मरोगापासून जनावरांचा बचाव करता येतो. यासाठी पशुपालकांनी सजग राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या रोगाचे संक्रमण माणसांमध्ये होत नसल्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. लम्पी चर्मरोग हा कॅप्री पॉक्स विषाणूमुळे होतो. गोट पॉक्स (शेळ्यातील देवी ) आणि शिप पॉक्स (मेंढ्या तील देवी ) या विषाणूच्या समुहातील हा विषाणू आहे. प्रामुख्याने गायी, कमी प्रमाणात म्हैशी यांना बाधीत करतो, शेळ्या व मेंढ्यांना अजिबात होत नाही. रोगाचा प्रसार - परजीवी कीटक (डास, माशा, गोचीड), बाधित जनावराच्या नाकातील/डोळ्यातील श्रावाने दूषित चारा/ पाणी, जनावरांची वाहतूक, बाधित पशुचे वीर्य यापासून होतो. लम्पी चर्मरोगाची लक्षणे - बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 14 दिवस एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येते. ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू 10-50 मि. मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळयात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते. या आजाराच्या प्रादुर्भावामध्ये फुफ्फूसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा होवू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सुज येवून काही जनावरे लंगडतात. लम्पी चर्मरोग आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना - बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवू नये. हा आजार संसर्गजन्य असल्याने लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तसेच टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता एक टक्के फॉर्मलीन किंवा 2-3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. निरोगी जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना लसीकरण तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात 100 टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते. लम्पी स्किन रोग नियंत्रणासाठी प्रशासनामार्फत बाधित पशुधनांचे अलगीकरण करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर शासकीय/निमशासकीय पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून औषधोपचार सुरू आहेत. बाधित गावातील सर्व पशुपालकांमध्ये रोगाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बाधित पशुधनाच्या संपर्कात गावकरी व इतर पशुधन येणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. बाधित गावांमध्ये किटक नाशक फवारणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने झालेली आहे. बाधित गावांपासून 5 किमी अंतरावरील त्रिज्येच्या गावांमधील पशुधनास व बाधित गावांमधील निरोगी पशुधनास रिंग पद्धतीने (बाहेरून आत या पद्धतीने) Goat Pox vaccine चे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत 1 लाख 63 हजार 100 लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत 88 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करणे, जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करणे, बैलगाडी शर्यतीचे तथा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करणे इ. बाबींना सक्त मनाई केली आहे. तसेच संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या आजाराचा प्रतिबंध व परिणामकारक नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. हेमंत चव्हाण माहिती सहाय्यक जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

अंकुर बालशिक्षण उपक्रमाने कणखर व बुध्दीमान युवा निर्मितीच्या पायाचा आरंभ - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कणखर व बुध्दीमान युवा बनविण्याच्या कार्याचा पाया अंकुर बाल शिक्षण उपक्रमाने सुरू केल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आज अंकुर बाल शिक्षण उपक्रम पुस्तक प्रकाशन व बाल संसाधन आणि विकास केंद्र शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी डॉ. खाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सर्वश्री मोहनराव कदम, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारती बिराजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, समाज कल्याण माजी सभापती प्रमोद शेंडगे आदि उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुडी यांनी प्रास्ताविकामध्ये एकात्मिक बाल विकास योजना, अंकुर बाल शिक्षण उपक्रम, बाल संसाधन व विकास केंद्र तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात कुपोषण नाही ही अभिमानाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय अंगणवाडी ताईंना जाते. एक मोठा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मी जिल्हा परिषदेची यंत्रणा, अधिकारी व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो. अशा उपक्रमांमधूनच जिल्ह्याचा विकास होतो व आपला जिल्हा नेहमीच राज्य शासनासाठी मार्गदर्शक ठरला आहे. देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे काम या उपक्रमाच्या माध्यमातून घडावे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आमदार श्री. पडळकर म्हणाले, शासन व प्रशासन यांनी एकत्र काम केल्यास योजना तळागाळापर्यंत पोहचतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती पटसंख्या हे जिल्हा परिषद प्रशासनाचे यश आहे. नविन पिढीला आकार देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. राष्ट्राच्या उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्राचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत असल्याचेही ते म्हणाले. सुरवातीस कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी महिला व बाल विकास विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची पाहणी केली. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना आदर्श पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, आटपाडी येथील उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षकांनाही आदर्श पुरस्कार देण्यात आला. तर बाल विकास अधिकारी मनिषा साळुंखे व राहूल बिरनाळे तसेच सहाय्यक बाल विकास अधिकारी दीपलक्ष्मी परनाकर व परवीन पटेल यानांही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच अंकुर बाल शिक्षण उपक्रम पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000