शुक्रवार, २७ मे, २०२२

एनडीआरएफ मार्फत गाव आपत्ती प्रतिसाद दलास एक दिवसीय प्रशिक्षण सोमवारपासून - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : महापूर या संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सुसज्ज राहण्याकरिता सांगली जिल्ह्यातील एकूण 104 पूरप्रवण गावामध्ये गाव आपत्ती प्रतिसाद दल गठीत करण्यात आलेले आहे. या गाव आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांना तालुकानिहाय तालुक्याच्या ठिकाणी एन.डी.आर.एफ. मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण दि. 30 मे ते 3 जून 2022 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शोध व सुटका, प्रथमोपचार पध्दती, उपलब्ध असलेले साहित्य वापराचे प्रात्यक्षिक, बोट वापराबाबत माहिती इत्यादीचा समावेश असणार आहे. दि. 30 मे रोजी मिरज, 31 मे रोजी महानगरपालिका सांगली, 1 जून रोजी पलूस, 2 जून रोजी वाळवा व 3 जून रोजी शिराळा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रम सर्व संबंधित पूरप्रवण गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांना अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 00000

गुरुवार, २६ मे, २०२२

पूरनियंत्रणाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्य पूर समन्वय बैठक. विविध धरणांमधून उपखोऱ्यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन होणार

- समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक होणार - अलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियमीत ठेवण्यास अलमट्टी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती सांगली दि. 26 (जि. मा. का.) : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची पूरनियंत्रणाबाबतची बैठक आज दि. 26 मे 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीत अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी दररोज जलशास्त्रिय माहितीची देवाण घेवाण करण्याचे तसेच विविध धरणांमधून उपखोऱ्यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन करण्याचे ठरले. पावसाळ्यामध्ये कृष्णाखोरे पूरनियंत्रण कक्ष, सांगली व अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे ठरले. ही बैठक जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस कर्नाटक राज्याचे अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता एच. सुरेश (KBJNI Dam zone), अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक सुर्वे, सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदवडेकर, कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार तसेच कोयना, वारणा, दुधगंगा, राधानगरी धरण व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली (Real Time Data Acquisition System) ही प्रणाली अधीक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील येवा, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. या प्रणालीचा वापर अधिक सक्षमपणे करुन कृष्णा उपखोऱ्यातील सर्व यंत्रणामध्ये समन्वय साधुन प्रभावी पूर नियंत्रण करता येईल, असा विश्वास मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला. अशा प्रणालीचा अवलंब कर्नाटक राज्यामध्ये देखील करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये राजापूर बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाच किलोमीटर अंतरावर नदीपात्रात नवीन पूल बांधकामासाठी करण्यात आलेला कॉपरडॅम व अनुषंगीक भरावा काढून घेण्याबाबत अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांनी संबंधीताना सूचना करण्यास सुचविले. त्याबाबत अधीक्षक अभियंता डी. बसवराज ( KBJNL, Dam Circle, Almatti) यांनी सहमती दर्शवली. कृष्णा उपखोऱ्यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जिवीत व वित्त हानी टाळून प्रभावी पुरनियंत्रणाच्या दृष्टीने अलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियमीत ठेवण्याविषयी बैठकीत चर्चा होवून यास अलमट्टी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. 00000

बुधवार, २५ मे, २०२२

गोसीखुर्दच्या शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा पालकमंत्री जयंत पाटील शेतकऱ्यांच्या उन्नती व भरभराटीसाठी करणार मार्गदर्शन

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील निवडक 200 प्रगतीशिल शेतकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पिक पध्दतीचा अभ्यास करणे अवलंब करणे या दृष्टीने दिनांक 25 ते 29 मे 2022 या कालावधीत शेतकरी समृद्धी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर चे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिनांक 25 मे रोजी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. या प्रसंगी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता किशोर दमाह, सुहास मोरे आणि इतर अभियंते उपस्थित होते. दिनांक 28 मे 2022 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे शेतकऱ्यांच्या उन्नती व भरभराटीसाठी तसेच चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. गोसीखुर्द प्रकल्प पुर्णावस्थेकडे येतांना प्रकल्पाच्या पाण्याचा सुयोग्य वापर करावा व लाभधारक शेतकऱ्यांनी पिक पध्दतीत बदल करून वैयक्तिक व राष्ट्रीय उत्पन्नात भर घालावी या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी पंढरपूर, बारामती, इस्लामपूर, सांगोला व सोलापूर या भागातील उस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, उस कारखाना व निवडक शेतांना भेट देवून पाहणी करणार आहेत. उस लागवडीमधील तज्ञ, कृषी रत्न संजय माने यांच्या शेताला भेट देवून त्यांचेही मार्गदर्शन गोसीखुर्द लाभधारकांना मिळणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांना प्रकल्पाच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आवाहन गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी केले आहे. 00000

मंगळवार, २४ मे, २०२२

राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी पोजिशन पेपर पोर्टलच्या माध्यमातून अभिप्राय नोंदवा - प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोजिशन पेपर पोर्टलच्या माध्यमातून सर्व शाळा व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व समाजमाध्यमातील व्यक्तींनी उपयुक्त असे अभिप्राय, मत, प्रतिसाद, सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्रीय मंत्रीमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजूर केलेले आहे. या धोरणातील ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील प्रक्रियेमध्ये एकवाक्यता राहावी व संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात पोर्टल (NCF Portal) विकसित करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक पोजिशन पेपर विकसित करण्यासाठी चार प्रकारचे अभ्यासक्रम आराखडे विकसीत करण्यासाठी एकूण 25 पोजिशन पेपर तयार करण्यात येत आहेत. राज्यस्तरावरून सदर पोजिशन पेपर विकसनाची स्वतंत्र प्रक्रिया सुरु आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील व शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्राशी संबंधित सर्व तज्ञांना आपले अभिप्राय, मते प्रतिसाद व सूचना नोंदविण्याची संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून या पोर्टल मध्ये सर्व 25 विषयांवरील पोजिशन पेपरशी संबंधित प्रश्न देण्यात आले आहेत. या प्रश्नांना अनुसरून आपले तज्ञत्व अथवा आवड असलेल्या विषयावर आपले मत नोंदविता येणार आहे. पोर्टलवरील पोजिशन पेपर संदर्भात सहभाग, मत, प्रतिसाद, सूचना नोंदविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती पुढीलप्रमाणे- SCERT मार्फत विकसित करण्यात आलेल्या https://scertmaha.ac.in/positionpapers/ लिंक वर क्लिक करून अथवा गुगल क्रोम ब्राउझर मध्ये लिंक कॉपी करून पोर्टलला भेट द्यावी. आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरची आराखडा (template) प्रत डाउनलोड करावी. पोझिशन पेपरच्या आराखड्यात आवश्यक मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत / सूचना / योग्य उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व अनुषंगिक साहित्याचे वाचन करावे. हे अनुषंगिक साहित्य वाचनासाठी https://bit.ly/३wcP८Eh येथे उपलब्ध आहे. डाउनलोड केलेल्या पोझिशन पेपरच्या मसुद्यामधील मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत सूचना / योग्य उत्तरे मराठी अथवा इंग्रजी मध्ये तयार करावीत. यासाठी स्वतंत्र वर्ड फाईल (word file) तयार करावी किंवा गुगल डॉक (google dot) चा वापर करावा. आपले मत / सूचना / योग्य उत्तरे तयार झाल्यावर पोर्टल वर आपली नावनोंदणी करावी. नावनोंदणी नंतर आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरच्या आराखड्यामध्ये पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले मत / सूचना/ योग्य उत्तरे/ प्रतिसाद मराठी अथवा इंग्रजीमध्ये नोंदवा व सबमीट करा. आपण नोंदविलेल्या आपल्या प्रतिसादाची प्रत आपणास आपण पोर्टल वर दिलेल्या आपल्या ईमेल वर पाठविण्यात येईल. याबाबत तांत्रिक अडचण असल्यास positionpapers@maa.ac.in या ईमेल वर संपर्क साधू शकता. पोझिशन पेपर साठी योगदान देण्यासाठीची अंतिम दिनांक 30 मे 2022 राहील, असे डॉ. होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

बेरोजगार उमेदवारांसाठी 25 व 26 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यावतीने दि. 25 व 26 मे 2022 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव्दारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. पसंतीक्रम नोंदवताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमसएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. उमेदवारांनी दि. 25 मे 2022 पर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असेल तर 0233-2990383 वर किंवा sanglirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सेल्स असोसिएशन, टेक्निशियन, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिजीटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर हार्डवेअर / सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट ॲण्ड ई.टेंन्डरिंग एक्झिक्युटिव्ह, सी.एन.सी ऑपरेटर, प्रेस मशिन ऑपरेटर, हेल्पर, सुपरवायझर, सेल्स कन्सलटंट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट, ऑडिट अकौटंट, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, स्टोअर किपर, पर्चेस एक्झिक्युटिव्ह, पर्चेस एक्झिक्युटिव्ह आऊटसोर्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, एचआर ॲण्ड ॲडमिन एक्झिक्युटिव्ह, पीपीसी हेड, प्रॉडक्शन सुपरवायझर, ड्राफ्ट्समेन, फिटर, वेल्डर, आटो इलेक्ट्रीशियन, अेसी ॲण्ड रेफ्रिजेशन व सीट मेटल इत्यादी जागा www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसुचित करण्यात आलेल्या आहेत. या पदासाठी इ. 10 वी, 12 वी, पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर, संगणक, तसेच आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदवी/ पदविका इत्यादी विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारासाठी रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

सोमवार, २३ मे, २०२२

तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्याकरिता व नोंदणीसाठी 25 मे रोजी कार्यशाळा

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना तृतीयपंथीय असल्याबाबतचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याकरिता तसेच ज्या तृतीयपंथीयांनी अद्याप NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांची नोंदणी करण्याबाबतची कार्यशाळा दि. 25 मे 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाने तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याकरीता NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींकरीता नाविण्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि, राज्यातील तृतीयपंथीयांची आकडेवारी निश्चित नसल्याने तसेच सर्व तृतीयपंथीयांनी अद्याप ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्याकरीता पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठीचे ध्येय धोरण निश्चित करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी राज्यभर विशेष उपक्रम दि. 23 मे 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत राबविला जात आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात दि. 25 मे 2022 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे श्री. चाचरकर यांनी सांगितले. 00000

शुक्रवार, २० मे, २०२२

नियमित मान्सुन सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पेरणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : सध्या जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा मान्सुन पुर्व पाऊस आहे. नियमित मान्सुनचे आगमन सांगली जिल्ह्यात 5 ते 10 जूनच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेशी ओल व नियमित मान्सुन सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 19 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काल सरासरी 52.8 मिली मिटर पाऊस झाला आहे. जत तालुक्यातील डफळापूर महसूल मंडळात सर्वात जास्त 126.3 मि.मी. पाऊस झाला आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज व तासगाव तालुक्यात सर्वच महसुल मंडळात 50 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. कोकरूड, ताकारी, कासेगाव महसुल मंडळात सर्वात कमी 13 ते 15 मि.मी. पाऊस पडला आहे. एकंदरीत जिल्ह्यात मान्सुन पुर्व पावसाने जोरदार हजेरी दिलेली आहे. जिल्ह्यात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडलेली महसुल मंडळे मिरज, आरग, सांगली मालगाव, बेडग, बेळंकी, भोसे, कुपवाड, संख, माडग्याळ, जत, मुचंडी, डफळापूर, कुंभारी, शेगांव, सावळज, ढालगाव, देशिंग, कुची, कवठेमहांकाळ व हिंगणगाव ही आहेत. 00000

ई-बाईक्समध्ये अनधिकृत बदल करू नये परिवहन विभागाचे आवाहन

- प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी ई-बाईक्समध्ये अनधिकृत बदल करु नयेत. जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादीत करणारे उत्पादक व विक्री करणारे वितरक यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहन धारक यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा, 1988 तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तरी वाहन उत्पादक, विक्रेते व नागरीक यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त यांनी केले आहे. काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. तसेच ज्या ई-बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे, अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास्त करतात अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिकची करतात, असे निदर्शनास आले आहे. वास्तविक अशा वाहनांना नोंदणी आवश्यक नसल्यामुळे त्यांना वाहन चालक अनुज्ञप्तीची देखील आवश्यकता नाही. यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीर बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई-बाईक्सना आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत. तरी या संदर्भात प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी व अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा Type Approval Test Report व परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी. महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सूट दिलेली आहे. आज अखेर राज्यात एकूण 66 हजार 482 इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 2(u) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली असून त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलामीटर पेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना नोंदणीपासून सूट आहे. अशाप्रकारे वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची (Vehicle Model) चाचणी ही केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 मध्ये विहित केलेल्या मान्यताप्राप्त संस्था (Testing agency) जसे की, ARAI, iCAT, CIRT इत्यादी या संस्थांकडून Type Approval Test Report घेणे अनिवार्य आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे परिवहन आयुक्त कार्यालय अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते व तसे संबंधित वाहन उत्पादकास व राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्राव्दारे कळविते, असे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जिल्ह्यात सरासरी 52.8 मि.मी. पाऊस

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जत तालुक्यात 93.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 71.4, जत 93.4, खानापूर-विटा 38, वाळवा-इस्लामपूर 33.5, तासगाव 55.6, शिराळा 21.04, आटपाडी 24.8, कवठेमहांकाळ 86.9, पलूस 46.7, कडेगाव 17.8. 00000

गुरुवार, १९ मे, २०२२

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

नागरिकांना 20 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन सांगली दि. 19 (जि.मा.का.) :‍ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संधटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार समर्पित आयोग हे शनिवार, दि. 21 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे भेट देणार आहेत. समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत यासाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांचा संपर्क क्रमांक व पत्ता पुढीलप्रमाणे आहे. संपर्क क्रमांक-0233-2600185 ईमेल- dcrsangli@gmail.com. पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, विजयनगर, सांगली, ता. मिरज, जि. सांगली-416415. नागरिकांनी त्यांची निवेदने दि. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावीत. निवेदन सादर करताना निवेदनामध्ये नागरिकांनी त्यांचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी अचूकपणे नमुद करावा. जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे प्राप्त होणारी निवेदने दि. 20 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. जे नागरिक समर्पित आयोगाचे भेटीचे वेळी परस्पर निवेदन देवू इच्छितात त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे दि. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने द्यावीत. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या निवेदनाबाबतच मागासवर्ग आयोग यांच्याकडून दि. 21 मे 2022 रोजी भेटीची वेळ कळविण्यात येणार आहे. बैठकीचे ठिकाण हे विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयातील सभागृह असेल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी कळविले आहे. 000000

सोमवार, १६ मे, २०२२

इस्लामपूर येथील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हॉलिबॉल खेळासाठी ही उत्तेजनार्थ व प्रोत्साहन देणारी बाब - क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे

- राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली व मुलींच्या गुजरात संघास सुवर्ण पदक तर मुलांच्या राजस्थान व मुलींच्या केरळ संघास रौप्य पदक - पुढच्या काळात आयोजित स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ टॉप फोर मध्ये असावा सांगली दि. 16 (जि.मा.का.) : इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलिबॉल स्पर्धा पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आम्हीही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी,कुस्ती, खो-खो, शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धांच्या आयोजनाने सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आहे, पण अशा प्रकारच्या हॉलिबॉलच्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन आजपर्यंत आम्ही कधी पाहिलेले नाही, असे सांगून उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेल्या पाच दिवसापासून या स्पर्धेसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जवळपास दररोज 15 ते 16 हजार क्रीडा प्रेमी या स्पर्धांचा आस्वाद घेताना पहावयास मिळाले. त्यामुळे हॉलिबॉल खेळासाठी ही उत्तेजनार्थ व प्रोत्साहन देणारी बाब आहे, असे प्रतिपादन क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धा - 2022 पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शैलजादेवी पाटील, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव अनिल चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी, नीलकंठ बशीर, शामराव पाटील, नेताजी पाटील, मेहबूब शेख आदि उपस्थित होते. क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या स्पर्धेत केरळ, राजस्थान, गुजरात व दिल्ली या चार टीम फायनल मध्ये पाहावयास मिळत आहेत. पुढच्या काळात ज्यावेळी अशा प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होतील त्यामध्ये महाराष्ट्राचा संघ टॉप फोर मध्ये असावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा व्यक्ती जेंव्हा क्रीडा प्रेमी असतो, खेळाडूवृत्तीचा असतो त्यावेळी सामाजिक कार्य करत असताना सुध्दा त्याला निश्चितपणाने अधिक उर्जा मिळत असते, असे सांगून प्रतिक पाटील यांच्यातील खेळाडूवृत्ती अशीच पुढे जात राहो, प्रगती करत राहो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुका घडविताना जिवा भावाची माणसे जपली तीच परंपरा प्रतिक पाटील ही जपतील. देशातील उत्कृष्ठ स्पर्धा घेवून देशातील खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी प्रतिक पाटील यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जोपासण्यासाठी प्रतिक पाटील यांनी भव्य दिव्य अशा हॉलिबॉल स्पर्धा इस्लामपूर येथे आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून सांगलीकर व इस्लामपूरकरांना भव्य दिव्य हॉलिबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य अशा दर्जेदार हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेची देशातील टॉप स्पर्धा म्हणून नोंद होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून सांगली व इस्लामपूरच्या मातीचे नाव देश आणि राष्ट्रीय पातळीवर नेहण्याचे काम झाले असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी प्रतिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी आपण आयोजित केलेली ही स्पर्धा देशातील सर्वोत्तम स्पर्धा करण्यात सर्व घटकांनी मोलाचे सहकार्य केले. देशातून आलेल्या खेळाडूंनीही खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही जिल्ह्यात, राज्यात खेळाडू घडविण्याचे काम अखंड ठेवू असे सांगितले. याप्रसंगी शरद लाड, आर.डी.सावंत, विनायक पाटील, देवराज पाटील, विजयराव पाटील, अँड. चिमण डांगे, अँड. धैर्यशील पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद व प्रतिक पाटील यांचे उत्कृष्ठ नियोजन !! इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत आयोजित २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली संघाने सुवर्ण पदक,तर राजस्थान संघाने रौप्य पदक,तसेच मुलींच्या गुजरात संघाने सुवर्ण पदक,आणि केरळ संघाने रौप्य पदक पटकाविले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच 'प्रतिसाद' स्मरणिका प्रकाशन, आणि जेष्ठ संघटक, खेळाडू एम.एस. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. साधारण २५ हजारच्यावरती क्रीडा रसिकांनी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही अंतिम सामान्यांचा मनमुराद आनंद लुटला. सर्व गॅलरी क्रीडा रसिकांनी खचाखच भरल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी एकच मैदान करून रसिकांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मुलींचा रात्री ९.१५ ला, तर मुलांचा रात्री ११.१५ ला सामना खेळविला. हा सामना रात्री १२.३० वाजता संपला. उपस्थित क्रीडा रसिक, राज्य व देशातून आलेले खेळाडू, पंच व मान्यवरांनी प्रतिक पाटील यांच्या उत्कृष्ठ नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. प्रथम मुलींचा गुजरात विरुध्द केरळ या संघाचा अंतिम सामना खेळविण्यात आला. गुजरात संघाने सलग ३ सेट घेत सुवर्ण पदकावर नांव कोरले. त्यांनी पहिल्यापासून सामन्यावर पकड ठेवत पहिला सेट २५-२१ ने,दुसरा सेट २५-१९ ने, तर तिसरा सेटही २५-१९ जिंकला. या संघातील मुलींनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. गुजरात संघाने विजयश्री खेचून आणल्यावर मैदानातच गरबा केला. क्रीडा रसिकांनी या संघास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या दिल्ली संघाने प्रभावी आक्रमण व उत्कृष्ठ बचावाचा खेळ करीत सुवर्ण पदक खेचून घेतला. दिल्ली संघाने ३-० असा थेट विजय मिळविला. त्यांनी पहिला सेट २५- २१,दुसरा सेट २५-१५,तर तिसरा सेट २५-२० फरकाने घेतला. 00000

बुधवार, ४ मे, २०२२

संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वय व संवाद ठेवून काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी सज्जता ठेवा - जलसंपदा विभागाने कर्नाटकातील अलमट्टी व कोल्हापूर, सातारा येथील धरण व्यवस्थापन यंत्रणांशी समन्वय ठेवावा - सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी - पूरबाधीत गावातील धोकादायक घरांचेही निरीक्षण करावे - पावसाच्या अद्ययावत माहितीसाठी जलसंपदा विभागाचे RTDAS ॲपचा वापर करावा सांगली दि. 4 (जि.मा.का.) : संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी. पूर परिस्थिती उद्भवल्यास सर्व विभागांनी समन्वयाबरोबर योग्य संवाद ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त ‍नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूरबाधित गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनामार्फत आवश्यक साहित्य पुरविण्यात आले आहे. या साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात यावी. शक्य होत असल्यास रस्त्याच्या बॅरिकेटींगसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बॅरिकेटींग अथवा बांबूची खरेदी करण्यात यावी. त्याचबरोबर गाव समित्या सक्रिय करण्यात याव्यात. पूर परिस्थिती उद्भवल्यास स्थलांतराची प्रक्रिया गतीने राबवावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात. बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्काची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा. तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत ठेवा. या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी. तसेच पावसाच्या अद्ययावत माहितीसाठी जनतेने जलसंपदा विभागाचे RTDAS ॲपचा वापर करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत. यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते त्याची यादी तातडीने तयार करावी. पूरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. त्यामुळे संभाव्य धोके टळतील त्यामुळे जीवित हानीचा धोका टळेल. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे तसेच रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही याबाबतची यंत्र सामग्री सज्ज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल यांची माहिती देवून ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी. महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे. संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसिलदारांनी तर ग्रामपंचायती व महानगरपालिकेकडील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. बीएसएनएलने लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज ठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम, महानगरपालिकेकडील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे. बोटी व अन्य आवश्यक सामग्री सज्ज ठेवावी. धोकादायक निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. तसेच पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास पूरबाधीत गावांमध्ये निवारागृहांची उपलब्धता ठेवा. अतिवृष्टीच्या काळात जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण, औषधाचा साठा व चारा या बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच कृषि विभागाने स्वयंचलित हवामान केंद्रे याबाबतची तपासणी करावी व खते, बी-बियाण्यांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याचे सांगून शहरात पॅचवर्क चे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरूमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय 24x7 पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे 92 असून यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली असल्याचे सांगून आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, पूरकाळात शवदहनाचा प्रश्न गंभीर होतो यासाठी कुपवाड येथील 8 स्मशानभूमी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरात आपत्ती मित्र ही संकल्पना राबविण्यात येत असून या अंतर्गत आत्तापर्यंत 200 जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे. तसेच आपत्ती मित्र ॲप ही महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपवर महापालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 00000
पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सर्वच बाबींचा सुक्ष्मपणे अभ्यास करून तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली दि. 4 (जि.मा.का.) : जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना सर्वच बाबींचा सुक्ष्मपणे अभ्यास करून अभियंत्यांनी प्रस्ताव तयार करावेत. सदरचे प्रस्ताव जिल्हा स्तरावरील तज्ज्ञ समितीकडून तपासणी करून घेण्यात यावेत. त्याचबरोबर सदर योजनेतून किती घरांना, कुटुंबांना याचा लाभ होणार आहे याबाबतचे सर्व्हेक्षण करावे, असे आदेशित करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 115 नळपाणीपुरवठा योजनांना तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक व्ही. एन. जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, जलसंपदा विभागाचे एम. आर गळंगे, जलजीवन मिशन चे नोडल अधिकारी शितल उपाध्ये, तालुका गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना सदरची गावे बफर झोन / कोर झोन यामध्ये आहेत का? याची चौकशी करावी. तसे आढळल्यास संबंधित विभागाकडून कामे करण्याबाबत परवानगी घेण्यात यावी. दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असलेल्या पाणीपुरवठा योजनांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीकडे सादर करावा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांवर गटविकास अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे व वेळोवेळी कामाची पहाणी करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच जिल्ह्यात मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत व पुढील कामांबाबतचा आराखडा तातडीने तयार करून प्रशासनास सादर करावा. सांगली जिल्ह्याचे पाणीपुरवठामध्ये राज्यात चांगले काम असून या कामात सातत्य ठेवावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गावनिहाय मंजूर होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे करताना, नळ कनेक्शन वाटप करताना गटविकास अधिकारी व संबंधित विभागाने एकत्रित कार्यवाही करावी. ही कामे ग्रामपंचायत स्तरावर होत असल्याने त्याचे सुक्ष्मपणे नियोजन करावे. नळ मिटर लावल्यामुळे पाण्याची तर बचतच होईल तसेच पाणी पुरवठा योजना योग्य पध्दतीने चालतील व सर्वांना समप्रमाणात व योग्य दाबाने पाणी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. ०००००

रविवार, १ मे, २०२२

जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी पंचायत राज व्यवथा महत्वाची - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी स्थानिक स्तरावरचे अधिकार स्थानिकानांच देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पंचायत राज व्यवथा महत्वाची असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अधिकारांचे बळकटीकरण होण्याची गरजही पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिपादीत केली. जिल्हा परिषद स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद सांगली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सुहास बाबर, देवराज पाटील, अविनाश पाटील, मालन ‍ मोहिते, कांचन पाटील, प्रविण हेंद्रे, आशा पाटील, छाया पाटील, कमल पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, पदमाकर जगदाळे, दिनकरराव पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कै. वसंतदादा पाटील, कै. गुलाबराव पाटील, कै. राजारामबापू पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम केले आहे. जिल्हा परिषद सांगली ही दिग्गज नेतृत्व तयारी करणारी शाळा आहे. या शाळेने महाराष्ट्राला अनेक नविन नेतृत्व दिले आहेत. आताही जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून जी नविन पिढी तयार होत आहे तीही भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद सांगली ही नेहमीच राज्यासाठी मार्गदर्शक राहिली असून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी माझी शाळा आदर्श शाळा आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी स्मार्ट पी.एच.सी. असे दोन उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये जिल्हा परिषद सांगली ने अत्यंत चांगले काम केले असून 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल मंत्री मंडळाच्या बैठकीम मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे पुढील काळात कोरोनाचे संकट आले तरी आपण त्याचा ताकदीने मुकाबला करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक पातळीवरच जनतेला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होवू नयेत असा आम्हा सर्वांचा आग्रह आहे. त्यासाठी इम्पेरियल डाटा संकलित करण्याचे काम सुरू असून लवकरच जनतेच्या समस्यांची जाण असणारे, जनसेवेला प्राधान्य देणारे अभ्यासू प्रतिनिधी जिल्हा परिषद सभागृहामध्ये निवडून येतील. त्यातून विकासाची कामे अधिक सक्षमपणे होतील. माजी मंत्री आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव नाईक यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज व्यवस्थेचा पर्यार्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा फार मोठा वाटा आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातूनच केंद्र व राज्य शासनाचा निधी ग्रामीण स्तरावर विकासासाठी नियोजनबध्द पध्दतीने वापरात आणला गेला. 1962 ते 1972 या कालखंडात जिल्हा परिषद यंत्रणांनी परिवर्तन घडविणारे कार्य केले. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात उत्तम समन्वय राहिल्यास विकासाची कामे गुणवत्तापूर्ण होतात. याचे आदर्श उदाहरण सांगली जिल्हा परिषदेने घालून दिले आहे. या जिल्हा परिषद सभागृहात नेहमीच चांगल्या पध्दतीने कामकाज झाले आहे. सांगली जिल्हा परिषदेचा जसे पदाधिकारी चांगले लाभले तसेच अनेक चांगले अधिकारीही लाभले आहेत. जेवढे राज्य आणि केंद्र सरकारे महत्वाची आहेत तेवढेच पंचायत राज यंत्रणाही महत्वाची आहे. यावेळी त्यांनी पंचायत राज व्यवस्थेतील आपल्या प्रदीर्घ वाटचालीतील अनेक अनुभव अधोरेखीत केले. यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, कै. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पंचायत राज व्यवस्थेची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजली. ग्रामीण भागातील माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी कृषि, पशुसंवर्धन यासारखी ग्रामीण सेवेची खाती जिल्हा परिषदेकडे ठेवावीत. यावेळी त्यांनी सांगली जिल्हा परिषदेने हाती घेतलेली माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट पी.एच.सी. हे उपक्रम अधिक सक्षमपणे राबवून ग्रामीण विकासाचा कै. यशवंतराव चव्हाण यांचा उपदेश खऱ्या अर्थाने सफल करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या विकासात आणि बळकटीकरणात पंचायत राज व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करून जिल्हा परिषदेमार्फत सुरू असणाऱ्या मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी.एच.सी. यांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागावर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे यांनी मानले. 00000