सोमवार, २३ मे, २०२२

तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्याकरिता व नोंदणीसाठी 25 मे रोजी कार्यशाळा

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना तृतीयपंथीय असल्याबाबतचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याकरिता तसेच ज्या तृतीयपंथीयांनी अद्याप NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांची नोंदणी करण्याबाबतची कार्यशाळा दि. 25 मे 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाने तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याकरीता NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींकरीता नाविण्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि, राज्यातील तृतीयपंथीयांची आकडेवारी निश्चित नसल्याने तसेच सर्व तृतीयपंथीयांनी अद्याप ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्याकरीता पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठीचे ध्येय धोरण निश्चित करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी राज्यभर विशेष उपक्रम दि. 23 मे 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत राबविला जात आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात दि. 25 मे 2022 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे श्री. चाचरकर यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा