मंगळवार, २४ मे, २०२२

राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी पोजिशन पेपर पोर्टलच्या माध्यमातून अभिप्राय नोंदवा - प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोजिशन पेपर पोर्टलच्या माध्यमातून सर्व शाळा व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व समाजमाध्यमातील व्यक्तींनी उपयुक्त असे अभिप्राय, मत, प्रतिसाद, सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्रीय मंत्रीमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजूर केलेले आहे. या धोरणातील ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील प्रक्रियेमध्ये एकवाक्यता राहावी व संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात पोर्टल (NCF Portal) विकसित करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक पोजिशन पेपर विकसित करण्यासाठी चार प्रकारचे अभ्यासक्रम आराखडे विकसीत करण्यासाठी एकूण 25 पोजिशन पेपर तयार करण्यात येत आहेत. राज्यस्तरावरून सदर पोजिशन पेपर विकसनाची स्वतंत्र प्रक्रिया सुरु आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील व शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्राशी संबंधित सर्व तज्ञांना आपले अभिप्राय, मते प्रतिसाद व सूचना नोंदविण्याची संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून या पोर्टल मध्ये सर्व 25 विषयांवरील पोजिशन पेपरशी संबंधित प्रश्न देण्यात आले आहेत. या प्रश्नांना अनुसरून आपले तज्ञत्व अथवा आवड असलेल्या विषयावर आपले मत नोंदविता येणार आहे. पोर्टलवरील पोजिशन पेपर संदर्भात सहभाग, मत, प्रतिसाद, सूचना नोंदविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती पुढीलप्रमाणे- SCERT मार्फत विकसित करण्यात आलेल्या https://scertmaha.ac.in/positionpapers/ लिंक वर क्लिक करून अथवा गुगल क्रोम ब्राउझर मध्ये लिंक कॉपी करून पोर्टलला भेट द्यावी. आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरची आराखडा (template) प्रत डाउनलोड करावी. पोझिशन पेपरच्या आराखड्यात आवश्यक मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत / सूचना / योग्य उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व अनुषंगिक साहित्याचे वाचन करावे. हे अनुषंगिक साहित्य वाचनासाठी https://bit.ly/३wcP८Eh येथे उपलब्ध आहे. डाउनलोड केलेल्या पोझिशन पेपरच्या मसुद्यामधील मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत सूचना / योग्य उत्तरे मराठी अथवा इंग्रजी मध्ये तयार करावीत. यासाठी स्वतंत्र वर्ड फाईल (word file) तयार करावी किंवा गुगल डॉक (google dot) चा वापर करावा. आपले मत / सूचना / योग्य उत्तरे तयार झाल्यावर पोर्टल वर आपली नावनोंदणी करावी. नावनोंदणी नंतर आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरच्या आराखड्यामध्ये पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले मत / सूचना/ योग्य उत्तरे/ प्रतिसाद मराठी अथवा इंग्रजीमध्ये नोंदवा व सबमीट करा. आपण नोंदविलेल्या आपल्या प्रतिसादाची प्रत आपणास आपण पोर्टल वर दिलेल्या आपल्या ईमेल वर पाठविण्यात येईल. याबाबत तांत्रिक अडचण असल्यास positionpapers@maa.ac.in या ईमेल वर संपर्क साधू शकता. पोझिशन पेपर साठी योगदान देण्यासाठीची अंतिम दिनांक 30 मे 2022 राहील, असे डॉ. होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा