सोमवार, १६ मे, २०२२

इस्लामपूर येथील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हॉलिबॉल खेळासाठी ही उत्तेजनार्थ व प्रोत्साहन देणारी बाब - क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे

- राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली व मुलींच्या गुजरात संघास सुवर्ण पदक तर मुलांच्या राजस्थान व मुलींच्या केरळ संघास रौप्य पदक - पुढच्या काळात आयोजित स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ टॉप फोर मध्ये असावा सांगली दि. 16 (जि.मा.का.) : इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलिबॉल स्पर्धा पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आम्हीही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी,कुस्ती, खो-खो, शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धांच्या आयोजनाने सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आहे, पण अशा प्रकारच्या हॉलिबॉलच्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन आजपर्यंत आम्ही कधी पाहिलेले नाही, असे सांगून उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेल्या पाच दिवसापासून या स्पर्धेसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जवळपास दररोज 15 ते 16 हजार क्रीडा प्रेमी या स्पर्धांचा आस्वाद घेताना पहावयास मिळाले. त्यामुळे हॉलिबॉल खेळासाठी ही उत्तेजनार्थ व प्रोत्साहन देणारी बाब आहे, असे प्रतिपादन क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धा - 2022 पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शैलजादेवी पाटील, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव अनिल चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी, नीलकंठ बशीर, शामराव पाटील, नेताजी पाटील, मेहबूब शेख आदि उपस्थित होते. क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या स्पर्धेत केरळ, राजस्थान, गुजरात व दिल्ली या चार टीम फायनल मध्ये पाहावयास मिळत आहेत. पुढच्या काळात ज्यावेळी अशा प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होतील त्यामध्ये महाराष्ट्राचा संघ टॉप फोर मध्ये असावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा व्यक्ती जेंव्हा क्रीडा प्रेमी असतो, खेळाडूवृत्तीचा असतो त्यावेळी सामाजिक कार्य करत असताना सुध्दा त्याला निश्चितपणाने अधिक उर्जा मिळत असते, असे सांगून प्रतिक पाटील यांच्यातील खेळाडूवृत्ती अशीच पुढे जात राहो, प्रगती करत राहो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुका घडविताना जिवा भावाची माणसे जपली तीच परंपरा प्रतिक पाटील ही जपतील. देशातील उत्कृष्ठ स्पर्धा घेवून देशातील खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी प्रतिक पाटील यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जोपासण्यासाठी प्रतिक पाटील यांनी भव्य दिव्य अशा हॉलिबॉल स्पर्धा इस्लामपूर येथे आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून सांगलीकर व इस्लामपूरकरांना भव्य दिव्य हॉलिबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य अशा दर्जेदार हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेची देशातील टॉप स्पर्धा म्हणून नोंद होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून सांगली व इस्लामपूरच्या मातीचे नाव देश आणि राष्ट्रीय पातळीवर नेहण्याचे काम झाले असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी प्रतिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी आपण आयोजित केलेली ही स्पर्धा देशातील सर्वोत्तम स्पर्धा करण्यात सर्व घटकांनी मोलाचे सहकार्य केले. देशातून आलेल्या खेळाडूंनीही खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही जिल्ह्यात, राज्यात खेळाडू घडविण्याचे काम अखंड ठेवू असे सांगितले. याप्रसंगी शरद लाड, आर.डी.सावंत, विनायक पाटील, देवराज पाटील, विजयराव पाटील, अँड. चिमण डांगे, अँड. धैर्यशील पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद व प्रतिक पाटील यांचे उत्कृष्ठ नियोजन !! इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत आयोजित २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली संघाने सुवर्ण पदक,तर राजस्थान संघाने रौप्य पदक,तसेच मुलींच्या गुजरात संघाने सुवर्ण पदक,आणि केरळ संघाने रौप्य पदक पटकाविले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच 'प्रतिसाद' स्मरणिका प्रकाशन, आणि जेष्ठ संघटक, खेळाडू एम.एस. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. साधारण २५ हजारच्यावरती क्रीडा रसिकांनी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही अंतिम सामान्यांचा मनमुराद आनंद लुटला. सर्व गॅलरी क्रीडा रसिकांनी खचाखच भरल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी एकच मैदान करून रसिकांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मुलींचा रात्री ९.१५ ला, तर मुलांचा रात्री ११.१५ ला सामना खेळविला. हा सामना रात्री १२.३० वाजता संपला. उपस्थित क्रीडा रसिक, राज्य व देशातून आलेले खेळाडू, पंच व मान्यवरांनी प्रतिक पाटील यांच्या उत्कृष्ठ नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. प्रथम मुलींचा गुजरात विरुध्द केरळ या संघाचा अंतिम सामना खेळविण्यात आला. गुजरात संघाने सलग ३ सेट घेत सुवर्ण पदकावर नांव कोरले. त्यांनी पहिल्यापासून सामन्यावर पकड ठेवत पहिला सेट २५-२१ ने,दुसरा सेट २५-१९ ने, तर तिसरा सेटही २५-१९ जिंकला. या संघातील मुलींनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. गुजरात संघाने विजयश्री खेचून आणल्यावर मैदानातच गरबा केला. क्रीडा रसिकांनी या संघास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या दिल्ली संघाने प्रभावी आक्रमण व उत्कृष्ठ बचावाचा खेळ करीत सुवर्ण पदक खेचून घेतला. दिल्ली संघाने ३-० असा थेट विजय मिळविला. त्यांनी पहिला सेट २५- २१,दुसरा सेट २५-१५,तर तिसरा सेट २५-२० फरकाने घेतला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा