शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लसीचा डोस देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीची एक - एक मात्रा दिली जात आहे. त्यास अनुसरून सन २०२२ मध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दि. २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांना दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जवळच्या बुथवर नेऊन पोलिओ लसीचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इत्यादी व्दारे करण्यात आली असून लसीकरणासाठी एकूण 2061 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण क्षेत्रातील अपेक्षित 17 हजार 260 लाभार्थीसाठी 1 हजार 453 बुथ, शहरी भागातील 17 हजार 372 लाभार्थीसाठी 114 बुथ व महानगरपालिका क्षेत्रातील 53 हजार 834 लाभार्थीसाठी 494 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. लाभार्थीना २ कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेवून बुथची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक बुथवर दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख व्यक्ती व स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी.स्टँण्ड, रेल्वे स्थानके, टोलनाके इत्यादी ठिकाणी 169 ट्रान्सिट टीम (ग्रामीण 86, शहरी 10 व महानगरपालिका 73) कार्यरत आहेत. बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार, विटभट्ट्या, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे व खाजगी दवाखाणे, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 274 मोबाईल टीम (ग्रामीण 248, शहरी 6 व महानगरपालिका 20) कार्यरत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. 00000

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

युक्रेनमध्ये सांगली जिल्ह्या तील नागरिक, विद्यार्थी अडकले असल्याहस संपर्क साधा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले नागरिक, विद्यार्थी तिथे अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे हेल्पलाईन स्थापन करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे. केंद्रीय परराष्ट्र कार्यालय, नवी दिल्ली, फोन क्र. टोल फ्री 1800118797, फोन 011-23012113 / 23014105 / 23017905, फॅक्स-011-23088124, ईमेल situationrom@mea.gov.in. सांगली जिल्ह्यातील कोणीही नागरिक, विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 / टोल फ्री क्रमांक 1077, ई-मेल sanglirdc@gmail.com वर संपर्क साधावा. तसेच स्थानिक तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. ०००००

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे काम राज्यात आदर्शवत - मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : लहान बालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. यातील अनेक आजार असे आहेत ज्यांवर बालक लहान असतानाच उपचार सुरू केला तर त्याचा फार मोठा फायदा होवू शकतो. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतचे कामकाज राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. हॉटेल द ग्रेट मराठा सांगली येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रशिक्षण, डिजीटल श्रवणयंत्र वाटप शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहायक अनिता हसबणीस, लाभार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, अनेक लहान बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. त्यांच्यावर लहानपणीच लवकर उपचार केल्यास लाभदायक ठरू शकते. जिल्ह्यात जवळपास 0 ते 6 वर्षे वयोगटातील दोन लाख बालके आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टिमची संख्या मर्यादित असल्याने ते प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण द्यावे. अंगणवाडी सेविकांच्यामार्फत त्यांच्यामार्फत प्रत्येक बालकाची तपासणी केली जाईल. काही आजार आढणाऱ्या बालकांची पुन्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टीम मार्फत तपासणी केली जाईल. प्रत्येक बालकास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करावे. याबरोबरच प्रायव्हेट इंस्टिट्यूट सोबत समन्वय ठेवून बालकांना उपचार द्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत टीमला फील्डवर काम करत असताना आवश्यक असणाऱ्या बाबींचे सखोल मार्गदर्शन होण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करून त्याला प्रात्यक्षिकांची जोड देण्याच्या दृष्टीने येत्या काळात नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट सेवा दिलेल्या तसेच कोविड सेंटरमध्ये अहोरात्र सेवा बजावलेल्या डॉ. प्रसाद पाटील, डॉ. संदिप साळवी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुनिता गायकवाड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. कल्याणी शिंदगी, डॉ. नवाजशरिफ मुजावर व योगेश कदम यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कर्णबधीर बालकांना प्राथमिक स्वरूपात डिजीटल श्रवणयंत्राचे वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले. 00000

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आता ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा न्यायालय सांगली व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रकरणांबरोबरच ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ही आता राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 12 मार्च 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १८ खालील प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुनलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण ‍कि. नरडेले यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभाग घ्या - तहसिलदार प्रदीप उबाळे

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा, व्हीडिओ तयार करणे, पोष्टरची डिझाईन स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेची सविस्तर माहिती http://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत असून या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन 283-इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा-इस्लामपूर तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करताना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहनही तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे 00000

आयईएम धारक उपक्रमांना नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने 25 मार्च 2021 पासून आय ई एम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित जी 2 बी पोर्टल (http://services.dipp.gov.in/lms) सुरु केले आहे. प्रत्यक्षात उत्पादनात गेलेल्या उद्योग घटकाकडून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क साधून त्वरीत आयईएम पार्ट 'बी' भरून घेणे आवश्यक आहे. उत्पादनापूर्वीच्या इतर टप्प्यातील आयईएम धारक उपक्रमांनी नव्या संकेतस्थळावर पार्ट ए बाबतची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. एका आय ई एम कंपनी व्यावसायिक घटकाच्या नावे त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आय ई एम जारी केला जात आहे. या करीता अर्जदारांना पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या आय ई एम संदर्भात डेटा अपडेट अथवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी 15 जुलै 2021 पासून जी 2 बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्युटोरियल जी 2 बी. पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. जरी संबंधित आय ई एम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकामध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आय ई एम धारकांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुनश्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून या सर्व अर्जांची पुनश्च पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यु. आर. कोड आधारित पोचपावती दिली जाणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकासाचे उप प्रकल्प राबविण्यासाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते

सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उप प्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज) यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे. सदर अर्ज हे शेळ्या (मांस व दुध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स इत्यादींचा समावेश असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले. 00000

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोमवारपूर्वी ई-पीक पाहणी ॲपवर रब्बी हंगामाची माहिती भरावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : रब्बी हंगामातील ई पीक पाहणीची मुदत शासनाने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर अद्यापही नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती त्वरीत करुन घ्यावी आणि रब्बी हंगामाची माहिती फोटोसह ॲपवर भरावी. तसेच ज्या खातेदारांनी नोंदणी केलेली आहे. परंतु अद्यापही रब्बी पिकाची माहिती भरलेली नाही त्यांनी त्वरीत माहिती भरावी. जर रब्बी हंगामात पड असेल तर चालू पड असा पर्याय निवडून माहिती भरावी. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी रब्बी हंगाम संपत असून त्यानंतर या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही हे लक्षात घेवून त्या पुर्वीच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची माहिती फोटोसह ई-पीक पाहणी ॲपवर भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. पीक कर्ज, पीक विमा तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बांधावरुनच नोंदणी करता येते. या साठी राज्य शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसीत केले आहे. ॲन्ड्रॉईड मोबाईलवरील ॲपव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची माहिती त्यांच्या बांधावरुनच नोंदविता येते. एका अँड्रॉइड मोबाईल वरून जास्तीत जास्त पन्नास खातेदारांची माहिती नोंदवता येणार आहे तसेच हे पीक पाणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपण डाऊनलोड करून घ्यावे व आपली त्यामध्ये नोंदणी करून रब्बी हंगाम निवडून, पिकाची माहिती भरून पिकाचा फोटो काढून फोटो माहिती अपलोड करावी. ई-पीक पहाणी ॲपमुळे वस्तू्स्थितीदर्शक व सत्यस्थितीदर्शक (Real Time Crop Data) माहिती उपलब्ध होणार असून या माहितीच्या आधारे पिक विमा व इतर शासकीय योजनांसाठी शेतक-यांना फायदा होणार आहे. ई-पीक पहाणी ॲपमुळे शेतकरी स्वतः आपल्या पिकाची माहिती फोटोव्दारे नोंदविणार असल्याने वस्तूपस्थितीदर्शक माहिती उपलब्ध होणार आहे. ई-पीक पाहणी द्वारे आलेल्या पिकांची माहिती शासकीय ‍विभागास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार असून या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी गुगल प्ले-स्टोअरवरुन हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे व यामध्ये २८ फेब्रुवारी पुर्वी रब्बी हंगामाची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार 28 फेब्रुवारीला

सांगली दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली मार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी सोमवार, दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली आहे. सेमिनारमध्ये मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त श्रीकांत विनायक वारूंजीकर हे मत्स्य शेती व शासकीय योजना विषयी माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सहायक आयुक्त ज. बा. करीम व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा सहभाग असणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी meet.google.com/mqv-dbye-qvy सेमिनारच्या या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनीटे अगोदर सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

सांगली ‍जिल्ह्यात 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : सांगली ‍जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 12 मार्च 2022 रोजी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली ए.एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बॅंक, दूरसंचार, बीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविणेबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे. 000000

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

शहिद जवान रोमित चव्हाण यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

शहिद रोमित चव्हाण यांचा अभिमान वारणा काठासह संपूर्ण देशाला कायम राहील - पालकमंत्री जयंत पाटील सांगली दि. 21 (जि.मा.का.) : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण, वय वर्षे २२ यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शिगाव येथे शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. शिगाव येथील स्मशानभूमीत शहिद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, तहसिलदार प्रदीप उबाळे, अप्पर तहसिलदार श्रीमती धनश्री भांबुरे, जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, वैभव शिंदे, सरपंच उत्तम गावडे, बाजीराव देशमुख, सांगली व कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्या मनिषा गावडे, सांगली जिल्हा सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता वैशाली चव्हाण यांनी तर सैन्य दलाच्या वतीने सुभेदार विजय कांबळे, स्टेशन कमांडर कोल्हापूर यांच्या वतीने, जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण कमांड यांच्या वतीने सुभेदार राजाराम पाटील यांनी शहिद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. शहिद रोमित चव्हाण यांचे पार्थिव सकाळी 6.50 च्या सुमारास शिगाव गावात दाखल झाले. पार्थिव गावात येताच अमर रहे अमर रहे, रोमित चव्हाण अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा रोमित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा गावकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली. पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. घराजवळ आणि गावाच्या कमानीजवळ लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजवलेल्या रस्त्यावरून शहिद रोमित चव्हाण यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मध्यवर्ती हुतात्मा राजेंद्र पाटील चौकात सकाळी 7.45 च्या दरम्यान त्यांचे पार्थिव गावकऱ्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावकरी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी जनसमुदायांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. सकाळी 8.50 वाजता पार्थिव वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर वडील तानाजी चव्हायण यांनी मुखाग्नी दिला. शहिद रोमित चव्हाण अनंतात विलीन झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी वीरपिता तानाजी चव्हाण यांच्याकडे राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. शहीद रोमित चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे वडील तानाजी चव्हाण, आई वैशाली चव्हाण, बहिण तेजस्विनी असे कुटुंबिय आहेत. यावेळी श्रध्दांजली अर्पण करताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, वारणा काठची परंपरा शूरत्वाची, वीरत्वाची आहे. याच परंपरेशी नाते सांगणारा शहिद रोमित चव्हाण लहानपणापासूनच सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वप्न बाळगून होता. बारावी झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले व तो सैन्यामध्ये भरती झाला. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या शोघ मोहिमेतील पथकामध्ये काम करत असताना शोध मोहिमेदरम्यान एका घरामध्ये लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या एका साथीदारावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यामध्ये त्यांना वीरमरण आले. अशा या धाडसी रोमित चव्हाण यांचा अभिमान वारणा काठच्या लोकांबरोबरच सर्व देशाला कायम राहील. शहिद रोमित यांच्या कुटुंबियांना हा बसलेला धक्का न पेलवणारा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या या शोककाळात आम्ही सर्वजण त्यांच्या दुख:त सहभागी आहोत, अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून धीर दिला. 00000

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

स्टार्टअप किंवा व्यवसाय असणाऱ्या महिला उद्योजकांनी प्रशिक्षण व स्टार्टअप इन्क्युबेशन सपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज करावेत - सहायक आयुक्त ज. बा. करीम

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : स्टार्टअप किंवा व्यवसाय असणाऱ्या महिला उद्योजक उमेदवारांनी प्रशिक्षण आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सपोर्ट मिळविण्यासाठी इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नाव नोंदणी करावी. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2022 असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण 8 मार्च 2022 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरु होईल. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली. राज्य अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्याचे नियोजित केले आहे. हा कार्यक्रम प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी आखला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत असून निवडलेल्या १२० महिला उद्योजकांना हे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रशिक्षणामधे स्टार्टअपसाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकापर्यंत आपली कल्पना कशी "पिच" करावी यावर देखील लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याशिवाय कार्यक्रमादरम्यान विविध फेऱ्यांमध्ये निवड झाल्यानंतर निवडलेल्या 6 उद्योजकांना Nexus प्री. इन्क्युवेशन प्रोग्राममध्ये सामील होण्याची संधी मिळेल, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा - जिल्हापधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : भारत ‍निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voter’s Awareness Contest) अंतर्गत दि. 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीत मतदार जागृतीशी संबंधित स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हापधिकारी तथा जिल्हाव निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन स्पर्धा, गाण्याची स्पर्धा व घोषवाक्य (Slogan) तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचा समावेश केला आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकास बक्षिसांचे वितरण केले जाणार असून बक्षिसाचे स्वरूप व स्पर्धेचे नियम याची सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 000000

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

ध्वनीची विहीत मर्यादा राखून विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : सण, उत्सव, समारंभासाठी ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी एकूण 9 सण / उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत दिली आहे. ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत देण्यात आलेले सण / उत्सव पुढीलप्रमाणे - शिवजयंती (शासकीय) - 1 दिवस, ईद-ए-मिलाद - 1 दिवस, डॉ. आंबेडकर जयंती - 1 दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन - 1 दिवस, गणपती उत्सव - 5 दिवस (गणेश चतुर्थी, पाचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्थी), नवरात्री उत्सव - 2 दिवस (अष्टमी व नवमी), दिवाळी - 1 दिवस (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस - 1 दिवस, 31 डिसेंबर - 1 दिवस. वरीलप्रमाणे देण्यात आलेली सवलत घोषीत शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषीत शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त सांगलीमिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्राधिकृत केले आहे. 00000

सातारा ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दुरूस्तीकामी सांगली जिल्हा कि.मी. 667/400 ते कि.मी. 668/400 भाग वाहतुकीस बंद

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : सातारा ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 सांगली जिल्हा कि.मी. 667/400 ते कि.मी. 668/400 या भागातील काँक्रीट रस्त्याचे व्दिपदर क्षतीग्रस्त झाले आहे. त्याचे तातडीने मजबुतीकरण व दुरूस्ती करण्याकामी जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 16 फेब्रुवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीसाठी सदर काँक्रीट व्दीपदर मार्गाचा पृष्ठभाग वाहतुकीस बंद करून त्यावरील वाहतुक कराड ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या कराड कोल्हापूरच्या पश्चिम दिशेने एकाच मार्गीकेमधून वळविणे व वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. पोलीस अधीक्षक सांगली / कोल्हापूर / सातारा, ग्रामीण व पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे विभाग पुणे यांनी दि. 16 फेब्रुवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान कि.मी. 667/400 ते कि.मी. 668/400 या दरम्यान वाहतुकीचे नियोजन करण्यासंबंधी आवश्यक आदेश निर्गमित करावेत. प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर यांनी कि.मी. 667/400 ते कि.मी. 668/400 या दरम्यान वाहतुकीचे सुचना फलक, दिशा चिन्ह इत्यादी सर्व वाहतुक सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित कराव्यात, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. 00000

जात पडताळणी प्रकरणातील त्रुटींची पुर्तता 25 फेब्रुवारी पर्यंत करा - नंदिनी आवडे

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगलीकडे डिसेंबर 2021 अखेर ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी प्रलंबित प्रकरणाबाबत त्रुटींची पुर्तता 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 12 वी विज्ञान शाखा विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशित विद्यार्थी, सेवा व निवडणूक कारणाकरिता ज्या अर्जदारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणी करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरण सादर केले आहे, परंतु त्यांच्या प्रकरणामध्ये अपूर्ण कागदपत्र असल्याने प्रकरण प्रलंबित आहे, अशा अर्जदारांनी त्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावी. यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जो ई-मेल आयडी अर्जात नमूद केला आहे त्या ई-मेलवर प्रकरणास काय आक्षेप आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आक्षेपाची पुर्तता ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून घ्यावी. जेणेकरून या प्रकरणावर कार्यवाही करणे सोईचे होऊन प्रकरणे तात्काळ निकाली काढता येतील. ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केला आहे परंतु अद्यापर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तसेच त्यांना आक्षेपासंबंधित संदेश किंवा ई-मेल प्राप्त झाला नाही, अशा अर्जदारांनी संबंधित समितीकडे भेट द्यावी. या प्रकरणात काही आक्षेप असल्यास आक्षेपाची पूर्तता तात्काळ करावी. जे अर्जदार 25 फेब्रुवारी पर्यंत आक्षेपांची पुर्तता करणार नाहीत, अशा अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे गृहीत धरून संबंधितांचे अर्ज नस्तीबंद करून परत करण्यात येतील व अशा अर्जदारांना जात पडताळणी आवश्यक असल्यास नव्याने अर्ज सादर करावा लागेल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी , असे आवाहनही श्रीमती आवडे यांनी केले आहे. 00000

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सन 2021 या वर्षासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील योगिता अनिल माळी यांच्या मे व्यास एटंरप्रायजेस तर व्दितीय पुरस्कार पलूस तालुक्यातील कुंडल येथील सचिन बाबासाहेब लाड यांच्या मे. राजतिलक इंडस्ट्रीज यांना मिळाला आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली. 00000

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 4 मार्च पर्यंत अर्ज करावेत - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सन 2021-22 या वर्षांकरीता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी दि. 4 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नयेत म्हणून इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडील शासन निर्णयान्वये शासकिय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सन 2019-20 पासून सुरु करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत भटक्या जमाती – क प्रवर्गातील इयत्ता 12 वी नंतरच्या केंद्रीभुत प्रवेश (Cap Round) प्रक्रियेव्दारे सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकिय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या तथापि, शासकिय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरीता वार्षीक खर्चाकरीता भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये शासन निर्णयानुसार जमा करण्यात येते. तरी भटक्या जमाती – क प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दि. 4 मार्च 2022 अखेर सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांच्याकडे अर्ज सादर करावेत. अधिक माहीतीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर, यांनी केले आहे. 00000

महिला लोकशाही दिन सोमवारी

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी 2022 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. 00000

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल. ००००

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

राज्य शासनाच्या योजना घेवून सांगली जिल्ह्यातून धावल्या महाराष्ट्र व कोयना एक्सप्रेस राज्यात पाच एक्सप्रेस गाड्यांवरून राज्य शासनाच्या योजनांची प्रसिध्दी

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : महाविकास आघाडी शासनाकडून राज्यात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत व क्षेत्रिय ‍जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे विविध माध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. प्रथमच रेल्वे रॅपव्दारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मिरज व सांगली मार्गे धावणाऱ्या कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेसचा यात समावेश आहे. रेल्वे डब्यांवर जाहिराती रॅप करण्याची संकल्पना राज्य शासनाने अवलंबली असून राज्यात दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेस, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई ते लातूर लातूर एक्सप्रेस अशा एकूण पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या कल्याणकारी कामाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या महाराष्ट्र व कोयना एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबवलेल्या राज्य शासनाच्या वतीने ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’या टॅग लाईन द्वारे लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर देण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा यात समावेश आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’हा संदेश देण्यात येत आहे. कर्जमुक्ती.. चिंतामुक्त शेतकरी, माझी वसुंधरा, मोफत सातबारा आता दारी येणार.. ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार.. महिला सक्षमीकरण- कुटुंबातील महिलांच्या नावे घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट, कौशल्य विकास-..बेरोजगारांना रोजगार, विक्रमी लसीकरण.. कोरोनापासून संरक्षण, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना, जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण, आपद्ग्रस्तांना मदत, कापूस खरेदीसाठी मदत.. आदी अनेक निर्णय व योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 00000

जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 20 मार्च पर्यंत - जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा सांगली केंद्रावर दि. 27, 28 व 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 10 फेब्रुवारी 2022 पासून दि. 20 मार्च 2022 पर्यंत देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली. या परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लीकेशन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरच भरता येईल. या परिक्षेस नव्याने बसू इच्छिणाऱ्या तसेच पुर्वी परिक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2600300 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे. 00000

मार्जिन मनी योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करा - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थीनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सांगली कार्यालयामार्फत कौशल्य विकास योजनेंतर्गत तीन दिवसांचा मत्स्यव्यवसाय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम सांगली / मिरज येथे आयोजित करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण निशुल्क असून प्रशिक्षणासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय वि. वारूंजीकर यांनी केले आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणात बायॉफ्लोक पध्दतीने मत्स्यसंवर्धन, रंगीत माशांचे संवर्धन, मस्त्य मूल्यवर्धित पदार्थ, मत्स्य मूल्यवर्धित उपपदार्थ (fish - o - craft) याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थीना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड करताना मत्स्यव्यवसायाचा अनुभव असणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य देण्यात येईल, असे श्री. वारूंजीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000