गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोमवारपूर्वी ई-पीक पाहणी ॲपवर रब्बी हंगामाची माहिती भरावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : रब्बी हंगामातील ई पीक पाहणीची मुदत शासनाने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर अद्यापही नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती त्वरीत करुन घ्यावी आणि रब्बी हंगामाची माहिती फोटोसह ॲपवर भरावी. तसेच ज्या खातेदारांनी नोंदणी केलेली आहे. परंतु अद्यापही रब्बी पिकाची माहिती भरलेली नाही त्यांनी त्वरीत माहिती भरावी. जर रब्बी हंगामात पड असेल तर चालू पड असा पर्याय निवडून माहिती भरावी. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी रब्बी हंगाम संपत असून त्यानंतर या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही हे लक्षात घेवून त्या पुर्वीच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची माहिती फोटोसह ई-पीक पाहणी ॲपवर भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. पीक कर्ज, पीक विमा तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बांधावरुनच नोंदणी करता येते. या साठी राज्य शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसीत केले आहे. ॲन्ड्रॉईड मोबाईलवरील ॲपव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची माहिती त्यांच्या बांधावरुनच नोंदविता येते. एका अँड्रॉइड मोबाईल वरून जास्तीत जास्त पन्नास खातेदारांची माहिती नोंदवता येणार आहे तसेच हे पीक पाणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपण डाऊनलोड करून घ्यावे व आपली त्यामध्ये नोंदणी करून रब्बी हंगाम निवडून, पिकाची माहिती भरून पिकाचा फोटो काढून फोटो माहिती अपलोड करावी. ई-पीक पहाणी ॲपमुळे वस्तू्स्थितीदर्शक व सत्यस्थितीदर्शक (Real Time Crop Data) माहिती उपलब्ध होणार असून या माहितीच्या आधारे पिक विमा व इतर शासकीय योजनांसाठी शेतक-यांना फायदा होणार आहे. ई-पीक पहाणी ॲपमुळे शेतकरी स्वतः आपल्या पिकाची माहिती फोटोव्दारे नोंदविणार असल्याने वस्तूपस्थितीदर्शक माहिती उपलब्ध होणार आहे. ई-पीक पाहणी द्वारे आलेल्या पिकांची माहिती शासकीय ‍विभागास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार असून या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी गुगल प्ले-स्टोअरवरुन हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे व यामध्ये २८ फेब्रुवारी पुर्वी रब्बी हंगामाची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा