बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

जात पडताळणी प्रकरणातील त्रुटींची पुर्तता 25 फेब्रुवारी पर्यंत करा - नंदिनी आवडे

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगलीकडे डिसेंबर 2021 अखेर ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी प्रलंबित प्रकरणाबाबत त्रुटींची पुर्तता 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 12 वी विज्ञान शाखा विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशित विद्यार्थी, सेवा व निवडणूक कारणाकरिता ज्या अर्जदारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणी करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरण सादर केले आहे, परंतु त्यांच्या प्रकरणामध्ये अपूर्ण कागदपत्र असल्याने प्रकरण प्रलंबित आहे, अशा अर्जदारांनी त्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावी. यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जो ई-मेल आयडी अर्जात नमूद केला आहे त्या ई-मेलवर प्रकरणास काय आक्षेप आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आक्षेपाची पुर्तता ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून घ्यावी. जेणेकरून या प्रकरणावर कार्यवाही करणे सोईचे होऊन प्रकरणे तात्काळ निकाली काढता येतील. ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केला आहे परंतु अद्यापर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तसेच त्यांना आक्षेपासंबंधित संदेश किंवा ई-मेल प्राप्त झाला नाही, अशा अर्जदारांनी संबंधित समितीकडे भेट द्यावी. या प्रकरणात काही आक्षेप असल्यास आक्षेपाची पूर्तता तात्काळ करावी. जे अर्जदार 25 फेब्रुवारी पर्यंत आक्षेपांची पुर्तता करणार नाहीत, अशा अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे गृहीत धरून संबंधितांचे अर्ज नस्तीबंद करून परत करण्यात येतील व अशा अर्जदारांना जात पडताळणी आवश्यक असल्यास नव्याने अर्ज सादर करावा लागेल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी , असे आवाहनही श्रीमती आवडे यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा