सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' स्पर्धेत भाग घ्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा-सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी व घरगुती स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात. तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीव्दारे सामाजिक संदेश देखील दिले जातात. याच धर्तीवर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. मताधिकार हा 18 वर्षावरील नागरीकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतल दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर आपल्या देखावा-सजावटीतून जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आली आहे. 00000

बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभाबाबतचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फतच करावे - सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याकरीता कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची नोंदणी करून कामगारांना मंडळाच्या वतीने नोंदणी पश्चात पात्र बांधकाम कामगारांना विविध लाभ देण्यात येतात. या योजनेचा लाभ मिळण्याकरीता जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव यांनी केले आहे. बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येणाऱ्या योजनेमध्ये शैक्षिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य इत्यादी योजनांचा समावेश केला आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कमगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मंडळाचे कामकाज राज्यातील सर्व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत अतिरिक्त स्वरूपाच्या कामकजान्वये चालविण्यात येते. या कामकाजाकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कोणऱ्याही खाजगी प्रतिनिधी अथवा एजंट / दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तींची अधिकृत नेमणूक करण्यात आलेली नाही. सांगली जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांनी मंडळाने ठरवून दिलेल्या नोंदणी शुल्क 37 रूपये (नोंदणी शुल्क 25 रूपये व नुनतीकरण शुल्क 12 रूपये एक वर्षासाठी) आकारण्यात येत असून याची रितसर पावती कामगारांना दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच मंडळामार्फत मोफत / नि:शुल्क वितरीत करण्यात येते. तरी बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंट / दलला व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तींच्या प्रलोभनाला बळी न पडता वरील सर्व अनुषंगीक कामकाजासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये. व्यवहारासंबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे. 00000

बेरोजगार उमेदवारांसाठी 24 व 25 ऑगस्टला ऑनलाईन रोजगार मेळावा

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांना आद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दि. 24 व 25 ऑगस्ट 2022 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 23 ऑगस्ट पर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील मेन्टनंस, हेल्पर, मोल्डर, सीएनसी ऑपरेटर, डिजीटल मार्केटिंग, मेकॅनिकल इंजिनिअर, केमिस्ट, पीएलसी ओपीटी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टेक्निशियन, सेल्स असोसिएट, डिझाईन इंजिनिअर, सेल्स एक्झीकेटीव्ह, बँक ऑफीस एक्झीकेटीव्ह, आफटर सेल्स सर्व्हीस एक्झीकेटीव्ह, एचआर ॲण्ड ॲडमीन एक्झीकेटीव्ह इत्यादी पदे https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित करण्यात आली आहेत. या पदासाठी इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर व पदव्यूत्तर पदवी तसेच आयटीआय डिप्लोमा, इंजिनिअरींग पदवी /पदवीका इत्यादी विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारासाठी रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डच्या आधारे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव्दारे लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्तपदांसाठी पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. याबाबत काही अडचण असल्यास 0233-2990383 या क्रमांकावर किंवा sanglirojgar@gmail.com यावर संपर्क करावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. 00000

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गतीमानतेवर भर - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : इतिहासातून प्रेरणा घेऊन राज्य आणि देशाला विकासाकडे आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास नेण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कामाच्या गतीमानतेवर भर द्यावा. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनाविषयक सकारात्मक लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने चालल्यास वेगाने काम होते. येत्या काळात ही चाके गतीने फिरताना नक्कीच पहायला मिळतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कार्य, विविध लढे याचा उहापोह करून उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, माणसांच्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली असून आता आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत. सुदृढ, चांगले आरोग्य ही महत्वाची बाब झाली आहे. यासाठीच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जिल्ह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दरमहा सरासरी 3 हजार 544 गरोदर मातांना आवश्यक संदर्भसेवा निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील सदस्यांना देशांतर्गत व सर्व अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येतो. सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1 लाख 63 हजार पेक्षा जास्त लाभार्थींची ई-गोल्डन कार्ड काढण्यात आलेली आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अद्यापही ज्यांचा दुसरा डोस प्रलंबीत आहे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस व बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झालेला असून टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात आज आणखी 34 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक ODF प्लस झाल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 2 लाख 97 हजार पेक्षा जास्त कुटुंबाना वैयक्तीक नळ कनेक्शन देण्यात आले आहे. याचबरोबर 714 नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडा तयार असून 437 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. विविध सोयी सुविधा देवून गुणवत्तापूर्ण जीवनमान लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही डॉ. सुरेश खाडे यावेळी म्हणाले. जिल्ह्यामध्ये सध्या धरणक्षेत्रामध्ये व इतरही भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या व नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. संभाव्य पुरस्थितीच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनही पुर्णपणे सज्ज आहे. पण पुरपरिस्थिती उद्भवूच नये यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा या अभियानास जिल्ह्यातील लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी मन:पूर्वक धन्यवाद देवून अनेक भाषा, जाती, धर्मांनी, आपला देश एकसंघ बनलेला आहे. देशात सुराज्य निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बलशाली देश घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत भारताने विविध क्षेत्रात केलेली प्रगती नेत्रदिपक असल्याचे डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले. डॉ. सुरेश खाडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या रणसंग्रामात सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशीचा जंगल सत्याग्रह हा चळवळीचा टप्पा ठरला. धुळे येथे सांगलीच्या क्रांतिकारकांनी लुटलेला खजिना, वाटेगाव येथील शेतकऱ्यांनी बर्डे गुरूजींच्या नेतृत्वाखालील सारावाढी विरोधात काढलेला मोर्चा, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव कचेरीवर काढलेला मोर्चा, इस्लामपूर मामलेदार कचेरीवरील मोर्चा, विश्रामबाग येथील रेल्वे स्टेशन जाळण्याची घटना, 1943 साली कुंडल बँकेवर घातलेला दरोडा, शेणोली स्थानकानजीक रेल्वेची लुट यासारख्या विविध घटनांचे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत प्रखर महत्व आहे. जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या कारवायांमध्ये जिल्ह्यातील महिला क्रांतिकारकांनी दिलेले योगदानही मोठे आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची कामगिरी हे तर स्वातंत्र्य लढ्याचे सुवर्णपानच आहे. सांगली जिल्ह्याला खेळांची मोठी परंपरा असून आजअखेर 49 आंतरराष्ट्रीय खेळाडू या जिल्ह्याने दिले आहेत. असे सांगून डॉ. सुरेश खाडे म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत जिल्ह्यातील संकेत सरगर यांने वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक मिळवून सांगली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखीत केले आहे. मिरज येथे तयार होत असलेल्या जगप्रसिध्द तंतूवाद्यातील तानपुरा या वाद्यास जीआय मानांकन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून ते लवकरच मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानामुळे पूर आणि महापुरांची वारंवारता वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणामही मोठ्या मानवी समूहावर होत आहे, असे सांगून डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपत्तीतून सावरण्यासाठी केवळ तात्कालिक उपाय उपयेगाचे नाही तर दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे. त्यानुसारच दिर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देणार आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तसेच या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी त्यांनी एकोपा टिकवूया. भारताची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्वल परंपरा अखंड ठेवूया, असे कळकळीचे आवाहन केले. यावेळी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना उत्कृष्ट जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून निवड झालेले डॉ. कैलास पाटील, पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेले केंद्रीय गृहमंत्रीपदक प्राप्त मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोश डोके, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा बक्षिस वितरण करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. 00000

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

हर घर तिरंगा मोहिमेचा विटा शहरात सायकल रॅली व चित्ररथाव्दारे प्रचार

सांगली दि. ८ (जि.मा.का.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारासाठी विटा तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा, नगरपालिका विटा व बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने विटा शहरातून आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा मोहिम प्रचार प्रसिद्धीकरिता काढण्यात आलेली सायकल रॅली बळवंत कॉलेज विटा येथून निघून पुढे शिवाजी चौक, चौंडेश्वरी मंदिर विटा बाजार पेठ, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे विटा हायस्कूल विटा येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये सर्व प्रशासकीय प्रमुख तसेच बळवंत कॉलेजचे साधारणत: 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून विटा शहरातील नागरिकांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयामार्फत या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीकरिता चित्ररथ देखील वरील मार्गावरून फिरवण्यात आला. ०००००

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने "गाथा क्रांतिवीरांची" या कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन

सांगली दि. ८ : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून "गाथा क्रांतिवीरांची" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सांगली येथे करण्यात आल्याची माहिती श्री. बिभिषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अजरामर नाव. जुलमी ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिटिश राजवट झुगारून नीरा काठ पासून कृष्णा, वारणा नद्यांच्या खोऱ्यात आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून १९४२ मध्ये प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. याच अनुषंगाने भारत छोडो या स्वातंत्र्य चळवळीच्या ९ ऑगस्ट क्रांती दिनास क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “गाथा क्रांतिवीरांची" या देशभक्तीपर नृत्य, नाट्य आणि संगीतमय कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी, सकाळी १०.०० वाजता, विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली येथे करण्यात आलेले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जीवनकार्यावर आधारित जीवनगाथा, स्वातंत्र्य संग्रामाची शाहिरी, देशभक्तीपर गीते, प्रेरणा गीते, ओवी, गोंधळी, भारुड, संयुक्त महाराष्ट्राची छक्कड, जयोस्तुते गीत, देशभक्तीचा पोतराज, समुहगीते तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा धगधगता इतिहास दर्शविणारी ध्वनीचित्रफित इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे संयोजन ल.वि.तथा बाळासाहेब गलगले फौंडेशन यांचे असून कार्यक्रमाचे समन्वयक कृष्णात कदम हे आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन श्री विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे. ०००००

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

जिल्ह्यातील वारणा धरणात 28.77 टी.एम.सी. पाणीसाठा वारणा धरणातून 1675 क्युसेक्स विसर्ग सुरू

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.77 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 68.89 (105.25), धोम 9.34 (13.50), कन्हेर 7.57 (10.10), वारणा 28.77 (34.40), दूधगंगा 19.70 (25.40), राधानगरी 7.19 (8.36), तुळशी 2.86 (3.47), कासारी 2.24 (2.77), पाटगांव 3.18 (3.72), धोम बलकवडी 3.54 (4.08), उरमोडी 7.42 (9.97), तारळी 5.03 (5.85), अलमट्टी 117.38 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा - 1675, दुधगंगा - 1000, राधानगरी - 1600, तुळशी - निरंक, कासारी - 550, पाटगांव -250, धोम बलकवडी - 4, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - 6000 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 8.1 (45), आयर्विन पूल सांगली 8.6 (40) व अंकली पूल हरिपूर 11.4 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 46.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 46.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 10.6 (263.8), जत 1.2 (259.6), खानापूर-विटा 3.6 (323.8), वाळवा-इस्लामपूर 18.2 (383.6), तासगाव 9.3 (264.2), शिराळा 46.4 (732), आटपाडी 0.5 (207. 6), कवठेमहांकाळ - 2.6 (358), पलूस -8.5 (236.5 ), कडेगाव 7.9 (310.5). 00000

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

मिरज मालगाव रोड येथील राष्ट्रीय महामार्गावर ९ ऑगस्ट रोजी शहीद मॅरेथॉन स्पर्धा - तहसिलदार दगडू कुंभार

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत हर घर झेंडा व स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मिरज तालुका प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 9 ऑगस्ट 2022 रेाजी सकाळी 6.30 वाजता डॉ. अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल, मेथे मळा, मिरज-मालगाव रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 (बायपास पुलाजवळ) या महामार्गावर बायपास पुल ते तानंग फाटा अशी 5 कि. मी अंतराची शहीद मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिरज तहसिलदार दगडू कुंभार यांनीं केले आहे. शहीद मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/FFCi6T6Tsfuf4ktv7 या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहनही तहसिलदार दगडू कुंभार यांनी केले आहे. ०००००

हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत आटपाडी तालुक्यात विविध कार्यक्रम - तहसिलदार बी. एस. माने

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत आटपाडी तालुका प्रशासनामार्फत दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता भवानी हायस्कूल आटपाडी येथे भारताच्या नकाशामध्ये विद्यार्थी उभे करून राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 4 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयाचे 1 हजार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आटपाडी तहसिलदार बी. एस. माने यांनी दिली. तसेच दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता आटपाडी शहरातून स्वराज्य फेरी (रॅली) काढण्यात येणार आहे. स्वराज्य फेरीमध्ये 6 हजार 677 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वराज्य फेरीची सुरूवात एसटी स्टँड आटपाडी येथून सुरू होवून तहसिल कार्यालय आटपाडी येथे या फेरीचा समारोप होणार असल्याचे तहसिलदार बी. एस. माने यांनी सांगितले. ०००००

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

कोणतीही वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण दक्षता घ्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासन कटिबध्द असून कोणतीही वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयंसिंह जाधव, जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 409 कुटुंब संख्या असून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आजअखेर 2 लाख 97 हजार 251 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 64 हजार 158 कुटुंबांना नळ जोडणी देणे बाकी आहे. जल जीवन मिशन कार्यक्रम 2023 पर्यंत असून उर्वरीत कुटुंबांनाही विहीत मुदतीत नळ जोडणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा योजना सुरळीत चालाव्यात यासाठी पाणीपट्टी आकारण्याचे काटेकोर नियोजन करावे असे सांगून ही रक्कम ग्रामपंचायतीने अन्य कारणांसाठी वापरू नये असेही सूचित केले. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरीत करत असताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशित केले. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी यांना नळ जोडणी बाबतचे काम सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या बैठकीत 38 पाणी पुरवठा योजनांना शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर सर्वानुमते प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात 714 पाणी पुरवठा योजनांपैकी 700 योजनांचा डीपीआर तयार झालेला आहे. 6 योजना रद्द करणे आवश्यक आहे तर 8 योजना जागा उपलब्धतता अथवा तत्सम कारणांसाठी प्रलंबित आहेत. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जेवढ्या योजनांना प्रशासकीय योजना प्राप्त आहे तेवढ्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही सांगितले. या सर्व योजनांबाबत आढावा घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रद्द करावयाच्या योजनांबाबत संबंधित ग्रामपंचायतींचा तसा ठराव घ्यावा. ज्या ठिकाणी योजनांसाठी जागा उपलब्धतेची समस्या आहे ती सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची मदत घ्यावी असे सांगितले. मिरज तालुक्यातील 5 गावांना पाणी पुरवठा योजनेची गरज आहे पण त्यासाठी उदभव नसल्याने औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी परवाना प्राप्त करून योजना घ्यावी लागते. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून पाठपुरावा सुरू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आपण स्वत: औद्योगिक विकास महामंडळ मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. ०००००