सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने "गाथा क्रांतिवीरांची" या कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन

सांगली दि. ८ : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून "गाथा क्रांतिवीरांची" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सांगली येथे करण्यात आल्याची माहिती श्री. बिभिषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अजरामर नाव. जुलमी ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिटिश राजवट झुगारून नीरा काठ पासून कृष्णा, वारणा नद्यांच्या खोऱ्यात आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून १९४२ मध्ये प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. याच अनुषंगाने भारत छोडो या स्वातंत्र्य चळवळीच्या ९ ऑगस्ट क्रांती दिनास क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “गाथा क्रांतिवीरांची" या देशभक्तीपर नृत्य, नाट्य आणि संगीतमय कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी, सकाळी १०.०० वाजता, विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली येथे करण्यात आलेले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जीवनकार्यावर आधारित जीवनगाथा, स्वातंत्र्य संग्रामाची शाहिरी, देशभक्तीपर गीते, प्रेरणा गीते, ओवी, गोंधळी, भारुड, संयुक्त महाराष्ट्राची छक्कड, जयोस्तुते गीत, देशभक्तीचा पोतराज, समुहगीते तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा धगधगता इतिहास दर्शविणारी ध्वनीचित्रफित इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे संयोजन ल.वि.तथा बाळासाहेब गलगले फौंडेशन यांचे असून कार्यक्रमाचे समन्वयक कृष्णात कदम हे आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन श्री विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा