सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभाबाबतचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फतच करावे - सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याकरीता कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची नोंदणी करून कामगारांना मंडळाच्या वतीने नोंदणी पश्चात पात्र बांधकाम कामगारांना विविध लाभ देण्यात येतात. या योजनेचा लाभ मिळण्याकरीता जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव यांनी केले आहे. बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येणाऱ्या योजनेमध्ये शैक्षिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य इत्यादी योजनांचा समावेश केला आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कमगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मंडळाचे कामकाज राज्यातील सर्व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत अतिरिक्त स्वरूपाच्या कामकजान्वये चालविण्यात येते. या कामकाजाकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कोणऱ्याही खाजगी प्रतिनिधी अथवा एजंट / दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तींची अधिकृत नेमणूक करण्यात आलेली नाही. सांगली जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांनी मंडळाने ठरवून दिलेल्या नोंदणी शुल्क 37 रूपये (नोंदणी शुल्क 25 रूपये व नुनतीकरण शुल्क 12 रूपये एक वर्षासाठी) आकारण्यात येत असून याची रितसर पावती कामगारांना दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच मंडळामार्फत मोफत / नि:शुल्क वितरीत करण्यात येते. तरी बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंट / दलला व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तींच्या प्रलोभनाला बळी न पडता वरील सर्व अनुषंगीक कामकाजासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये. व्यवहारासंबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा