बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

कोणतीही वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण दक्षता घ्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासन कटिबध्द असून कोणतीही वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयंसिंह जाधव, जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 409 कुटुंब संख्या असून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आजअखेर 2 लाख 97 हजार 251 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 64 हजार 158 कुटुंबांना नळ जोडणी देणे बाकी आहे. जल जीवन मिशन कार्यक्रम 2023 पर्यंत असून उर्वरीत कुटुंबांनाही विहीत मुदतीत नळ जोडणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा योजना सुरळीत चालाव्यात यासाठी पाणीपट्टी आकारण्याचे काटेकोर नियोजन करावे असे सांगून ही रक्कम ग्रामपंचायतीने अन्य कारणांसाठी वापरू नये असेही सूचित केले. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरीत करत असताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशित केले. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी यांना नळ जोडणी बाबतचे काम सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या बैठकीत 38 पाणी पुरवठा योजनांना शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर सर्वानुमते प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात 714 पाणी पुरवठा योजनांपैकी 700 योजनांचा डीपीआर तयार झालेला आहे. 6 योजना रद्द करणे आवश्यक आहे तर 8 योजना जागा उपलब्धतता अथवा तत्सम कारणांसाठी प्रलंबित आहेत. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जेवढ्या योजनांना प्रशासकीय योजना प्राप्त आहे तेवढ्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही सांगितले. या सर्व योजनांबाबत आढावा घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रद्द करावयाच्या योजनांबाबत संबंधित ग्रामपंचायतींचा तसा ठराव घ्यावा. ज्या ठिकाणी योजनांसाठी जागा उपलब्धतेची समस्या आहे ती सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची मदत घ्यावी असे सांगितले. मिरज तालुक्यातील 5 गावांना पाणी पुरवठा योजनेची गरज आहे पण त्यासाठी उदभव नसल्याने औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी परवाना प्राप्त करून योजना घ्यावी लागते. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून पाठपुरावा सुरू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आपण स्वत: औद्योगिक विकास महामंडळ मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा