गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

येत्या रविवारी 'हॅप्पी स्ट्रीट' कार्यक्रमाचे आयोजन

सांगली दि. 29 (जि.मा.का.): सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून महसंस्कृती महोत्सवाचे दि 2 मार्च ते 6 मार्च रोजी कल्पद्रुम मैदान सांगली येथे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग असलेला 'यलो सांगली हॅप्पी स्ट्रीट' हा कार्यक्रम दि. 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे होत असून यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. मल्लखांब, कबड्डी, योगासने आणि अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच रांगोळी काढणे, बैलगाडी, टांगा सफर, घोडेस्वारी, हलगी ढोल ताशा पथक, लेझिम पथक त्याच बरोबर झुंबा डान्स, लहान मुलांसाठी कार्टून्स, करा ओके तसेच लहानपणीच्या खेळाची अनुभुती सांगलीकरांना घेता येणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या विविध लोककला यामध्ये नागरिकांना पाहता येणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, व्यासपीठावर मुक्त सादरीकरणही करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, गायक, नृत्य कलाकार, झुंबा डान्सर, चित्रकार, शाहीर, हास्य क्लब, सायकलिंग क्लब, शाळा व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था, महिलांचे किटी पार्टी ग्रुप, इतर कलाकार यांनी या मंचावर येवून आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या सर्व सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी सर्व नागरिकांनी रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

मुंबई दि. १७ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुणे येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जल, स्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात दोनशेहून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील. भारताचे औद्योगिक बलस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात ३९.८८ लाख एमएसएमईचे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर १०८.६७ लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ प्रदान करेल. एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये : या एक्स्पोमध्ये २०० हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांची संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे विविध क्षेत्र जसे की एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स याचे प्रदर्शन करतील. एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील. नॉलेज सेमिनार : प्रख्यात तज्ञ आणि विचारवंत नेते, संरक्षण क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड, संधी आणि आव्हाने यावर दृष्टीक्षेप टाकतील कौशल्य विकास कार्यशाळा : संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना समर्थन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक सहाय्य पर्याय प्रदर्शित करण्यात येतील. धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल. तज्ञांचे सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि ट्रेंड्सवर अपडेट मिळू शकतील. आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील. या एक्स्पोद्वारे एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहाय्य ऑफर करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करतील. एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो २०२४ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील २ हजारहून अधिक संस्था सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. एल ॲण्ड टी. डिफेन्स, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ, सोलार, भारत फोर्ज आणि सार्वजनिक सरंक्षण क्षेत्रातील उपक्रम (PSU) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविण्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यात सहभागींना फायदेशीर व्यावसायिक संधी, शेकडो कोटींचे संभाव्य करार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी लाभदायक ठरेल. "हा एक्स्पो आपल्या राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्याची शासनाची बांधिलकी अधोरेखित करतो. नावीन्य आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडे, संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारा आहे ”, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या." "आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण एमएसएमई तयार झाल्या आहेत. तिन्ही सैन्य दलाचा सहभाग यात असणार आहे. आज देशात मोठया प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत असताना महाराष्ट्रात १० ऑर्डंनंस फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पी एस यु आहेत. याची राज्यात इकोसिस्टिम तयार झाली आहे. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲण्ड टी, अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक येतील, गुंतवणूक वाढेल. मुख्य म्हणजे उत्पादन करणारे आणि खरेदीदार आर्म्ड फोर्स असे दोन्ही एका ठिकाणी एकत्र असतील. उद्योग विभागाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधील सर्वात मोठा एक्स्पो महाराष्ट्रात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. "महाराष्ट्रातील एमएसएमईच्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी हा एक्स्पो एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पना वाढवून आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याच्या भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. *****

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

पी. एम. किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभासाठी शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी

- सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत देशव्यापी संपृक्तता मोहीम सांगली दि. 13 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक बाबीची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी राज्यात दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकूण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- शिवगर्जना महानाट्य उपक्रमाची सांगता - तीनही दिवस शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरत आहे. या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून गेले तीन दिवस सुरू असलेल्या शिवगर्जना महानाट्य उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदि उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही शिवगाथा सांगलीकरांसाठी विनामूल्य सादर करण्यात आली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली व अलौकिक वारसा तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या महानाट्यात १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा आनंद घेतला. अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान अशा शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांनी साक्षात शिवकाल शिवप्रेमींपुढे उभा राहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे मैदान उजळून निघाले. 00000

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा प्रारंभ सांगलीत तीन दिवस होणार शिवजागर

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अनुभूती - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा आज प्रारंभ झाला. आमदार अरूण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, माजी नगरसेविका सविता मदने आदि उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाकडून शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे दैवत व आपले आदर्श आहेत. त्यांचे चरित्र अनुभवावे व त्यांचे विचार आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार अरूण लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे आयोजन हा राज्य शासनाचा चांगला उपक्रम आहे. यामुळे चांगले बघण्याची संधी मिळाली असून या माध्यमातून शिवचरित्र अनुभवायला मिळणार आहे. सर्वांनी शिवचरित्राचा आदर्श घ्यावा व त्यांच्या विचारांचे जीवनात अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले, ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित हा कार्यक्रम पाहायला मिळणे हे आपले भाग्य आहे हे समजून हे महानाट्य सर्वांनी पाहावे व त्यांचे कार्य, विचार व चरित्रापासून स्फूर्ती घ्यावी. या महानाट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र अनुभवण्याची संधी सर्वांना लाभणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रारंभी दीप प्रज्वलन व शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व मा. मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जात आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर होत आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ५ फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर होत असून तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग, एक धगधगत्या इतिहासाची आठवण, नेत्रसुखद आतषबाजी, तीन तासात संपूर्ण शिवचरित्राचे दर्शन, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्र मुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग या महानाट्यामध्ये दाखविण्यात आले आहेत. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

सांगलीत 3 फेब्रुवारीला शिवगर्जना महानाट्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा होणार जागर - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने सांगली येथे शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी या महानाट्याचे उद्घाटन होणार आहे. तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये जवळपास २५० कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000