गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

येत्या रविवारी 'हॅप्पी स्ट्रीट' कार्यक्रमाचे आयोजन

सांगली दि. 29 (जि.मा.का.): सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून महसंस्कृती महोत्सवाचे दि 2 मार्च ते 6 मार्च रोजी कल्पद्रुम मैदान सांगली येथे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग असलेला 'यलो सांगली हॅप्पी स्ट्रीट' हा कार्यक्रम दि. 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे होत असून यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. मल्लखांब, कबड्डी, योगासने आणि अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच रांगोळी काढणे, बैलगाडी, टांगा सफर, घोडेस्वारी, हलगी ढोल ताशा पथक, लेझिम पथक त्याच बरोबर झुंबा डान्स, लहान मुलांसाठी कार्टून्स, करा ओके तसेच लहानपणीच्या खेळाची अनुभुती सांगलीकरांना घेता येणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या विविध लोककला यामध्ये नागरिकांना पाहता येणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, व्यासपीठावर मुक्त सादरीकरणही करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, गायक, नृत्य कलाकार, झुंबा डान्सर, चित्रकार, शाहीर, हास्य क्लब, सायकलिंग क्लब, शाळा व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था, महिलांचे किटी पार्टी ग्रुप, इतर कलाकार यांनी या मंचावर येवून आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या सर्व सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी सर्व नागरिकांनी रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा