गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

सांगलीत 3 फेब्रुवारीला शिवगर्जना महानाट्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा होणार जागर - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने सांगली येथे शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी या महानाट्याचे उद्घाटन होणार आहे. तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये जवळपास २५० कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा