शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा प्रारंभ सांगलीत तीन दिवस होणार शिवजागर

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अनुभूती - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा आज प्रारंभ झाला. आमदार अरूण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, माजी नगरसेविका सविता मदने आदि उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाकडून शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे दैवत व आपले आदर्श आहेत. त्यांचे चरित्र अनुभवावे व त्यांचे विचार आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार अरूण लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे आयोजन हा राज्य शासनाचा चांगला उपक्रम आहे. यामुळे चांगले बघण्याची संधी मिळाली असून या माध्यमातून शिवचरित्र अनुभवायला मिळणार आहे. सर्वांनी शिवचरित्राचा आदर्श घ्यावा व त्यांच्या विचारांचे जीवनात अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले, ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित हा कार्यक्रम पाहायला मिळणे हे आपले भाग्य आहे हे समजून हे महानाट्य सर्वांनी पाहावे व त्यांचे कार्य, विचार व चरित्रापासून स्फूर्ती घ्यावी. या महानाट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र अनुभवण्याची संधी सर्वांना लाभणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रारंभी दीप प्रज्वलन व शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व मा. मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जात आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर होत आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ५ फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर होत असून तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग, एक धगधगत्या इतिहासाची आठवण, नेत्रसुखद आतषबाजी, तीन तासात संपूर्ण शिवचरित्राचे दर्शन, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्र मुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग या महानाट्यामध्ये दाखविण्यात आले आहेत. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा