बुधवार, २६ जुलै, २०१७

खरीप हंगामासाठी आपत्कालीन पिक व्यवस्थापन

यावर्षी खरीप हंगामात 2017 मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुरूवातीला काही भागामध्ये चांगला पाऊस झाला परंतु काही भागामध्ये अजिबात पाऊस झालेला नाही. दिनांक 20 जुलै पर्यंत वाळवा, शिराळा आणि कडेगाव तालुक्यामध्ये सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला असून इतर तालुक्यात सरासरीपेक्षा 50 टक्के पाऊस कमी आहे. आटपाडी, खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये सरासरीच्या फक्त 25 टक्के पाऊस झाला आहे. मोठ्या खंडानंतर पुन्हा पाऊसाला सुरूवात             झाली आहे. सद्यस्थितीत शेतकरी बंधूनी अद्याप पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये किंवा दुबार पेरणी करावयाची असल्यास पुढीलप्रमाणे पिक पेरणीचे व्यवस्थापन करावे.
पीक
सुधारीत / संकरीत वाण
बियाणे (किलो/हे.)
पेरणी अंतर (सेमी)
रोपांची संख्या हेक्टरी (लाखात)
बाजरी
श्रध्दा, सबुरी, शांती, आयसीटीपी-8203, धनशक्ती, आदिशक्ती
3
45
1.5
सुर्यफूल
मॉर्डेन, एसएस-56, भाणु, इतर संकरीत वाण
8 ते 10
45
0.74
तूर
बीएसएमआर-736, बीडीएन-1, माउली, नं. 148, विपुला, राजर्शी
12
45 ते 60
0.75
हुलगा
सीना, माण
10
30
3.33
एरंडी
डीसीएच-32, व्हीआय-9, अरूणा, गिरीजा
12 ते 15
60x45
0.37
चवळी
फुले पंढरी, फुले विठाई
10
45
3.33

    उशीरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये 25 ते 45 सेमी खोलीच्या जमिनीवर आंतरपिके घेण्याची शिफारस केलेली आहे. बाजरी आणि तूर (2 : 1) आंतरपीक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. बाजरी आणि सुर्यफूल ही पिके 90 ते 100 दिवसात तयार होतात तर तूर पिकाचा पक्वता कालावधी 145 ते 150 दिवसांचा असल्यामुळे पिकांच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागविली जाते पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पीक तरी निश्चित पदरात पडते अवर्षण परिस्थितीवर मात करण्यास मदत होते. याशिवाय तूर गवार (1:2), एरंडी गवार (भाजीसाठी) (1 :2) आणि एरंडी दोडका (मिश्र पीक) घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच अधिक आर्थिक फायदा मिळतो.
आंतरमशागत महत्त्वाची
    जमिनीतून बाष्पीभवन होऊन पाणी हवेत उडून जात असते त्यामुळे जमिनीतील ओल कमी होते. कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातून होणारे बाष्पीभवन कमी होत आणि ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. तणांच प्रमाण जास्त असल्यास तण सुध्दा पिकांच्या बरोबरीने पाणी शोषण करतात म्हणून तण नियंत्रण केल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
दोन टक्के युरिया फवारणी करावी
    पावसात खंड पडल्यावर पिकांची वाढ थांबते, पिकांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते, मुळाव्दारे पाणी, अन्नद्रव्य शोषण्याची क्रिया मंदावते. अशा परिस्थितीत नंतर पाऊस झाल्यावर पुन्हा ही क्रिया त्वरीत पुर्ववत सुरू होण्यासाठी पिकावर 2 टक्के युरियाची फवारणी करावी. यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि मुळ जमिनीतून अन्नद्रव्य, पाणी शोषून घेण्यास योग्य होतात.

आच्छादनाचा वापर
    जमिनीच्या पृष्ठभागावर पिकांच्या ओळीमध्ये काडी-कचरा, पीक अवशेष, पाला पाचोळा, ऊसाचे पाचट इत्यादी सेंद्रीय पदार्थाचे प्रति हेक्टरी 5 टन याप्रमाणे आच्छादन करावे. भाजीपाला, फळपिके यासारख्या नगदी पिकांमध्ये सेंद्रीय पदार्थाऐवजी प्लॅस्टीक फिल्मचे आच्छादन केलेले अधिक फायदेशीर होवू शकते. आच्छादनामुळे 25 ते 30 टक्के उत्पादनामध्ये वाढ होते असे आढळून आले आहे.
परावर्तकांचा वापर
    पानांव्दारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन ऍ़ट्राझीन किंवा फिनाईल मरक्युरीक ऍ़सिटेट यापैकी एका परवर्तकाची फवारणी करावी यामुळे सुर्यप्रकाश पानांवरून परावर्तीत होतो. त्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होऊन अवर्षणाचा ताण सहन करण्यास मदत होते.
संरक्षित पाणी
    सध्या उभ्या असलेल्या पिकांच्या महत्त्वाचा पीक वाढीच्या संवेदनशिल अवस्थेनुसार पिकास एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीक वाचवण्यासाठी संरक्षित पाणी देणे यामध्ये दोन गोष्टी अधोरेखित होतात. प्रथम म्हणजे पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो पीक सुकण्यास सुरूवात               झालेली असते, तसेच मातीतला ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरूवात झालेली असते.  दुसरे म्हणजे उपलब्ध पाण्याच्या साठ्यात अत्यल्प पाणी असते. अशा परिस्थितीत हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी 10 सेमी पेक्षा कमी पाणी बसूच शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा पीक सुकण्यास सुरूवात झालेली असते, जमिनीला भेगा पडलेल्या असतात पाणी साठ्यात थोडेच पाणी उपलब्ध असते तेव्हा हलके पाणी सर्व शेतात समप्रमाणात देवून पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचन हे एक हुकमी अस्त्र आहे.

डॉ. दिलीप कठमाळे
कृषिविद्यावेत्ता, प्रभारी अधिकारी
कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज
00000