शनिवार, १ जुलै, २०१७

वस्तू व सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात सोप्या पद्धतीने व प्रभावीपणे करू - राज्य कर उपायुक्त योगेश कुलकर्णी

सांंगली, दि. 1, (जि. मा. का.) : वस्तू सेवा कर (जी.एस.टी.) ही प्रणाली केंद्र राज्य शासनांच्या समन्वयातून तयार करण्यात आली आहे. या करप्रणालीमुळे करचुकवेगिरीला आळा बसणार आहे. जी. एस. टी. कर प्रणालीमुळे जवळपास 18 विविध कर बंद होणार असून एकच वस्तू सेवा कर लागू होणार आहे. या कर प्रणालीचे दडपण घेऊ नये. सांगली जिल्ह्यात वस्तू सेवा कर प्रणाली प्रभावीपणे राबवताना सोप्या सुकर पद्धतीने या करप्रणालीची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही राज्य कर उपायुक्त योगेश कुलकर्णी यांनी आज येथे दिली.
वस्तू सेवा कर प्रणाली (जी. एस. टी.) आजपासून अस्त्वित्त्वात आली. या करप्रणालीच्या स्वागतार्थ आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आमदार सुरेश खाडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्य कर उपायुक्त वैशाली काशिद आणि दीपाली चौगुले व्यासपीठावर उपस्थित होत्या.
जीएसटी संदर्भात कोणत्याही अडचणीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता विक्रीकर कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे दूरध्वनी क्रमांक 0233-2623719, 2624053, 2622528 हे आहेत, असे सांगून राज्य कर उपायुक्त योगेश कुलकर्णी म्हणाले, वस्तू सेवा कर (जी.एस.टी.) कर प्रणाली सोप्या पध्दतीने हाताळता येणार आहे. पूर्वीच्या कर प्रणालीमधील बहुतांशी नियम शिथील करण्यात आले असून कमीत कमी नियमावली यामध्ये ठेवण्यात आली आहे. या प्रणालीत आयजीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी असे तीन विभाग करण्यात आले आहेत. करदात्यांना त्यांना लागू असणाऱ्या कर प्रणालीमध्ये कर भरता येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता विक्रीकर खात्याने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दिनांक 25 जून 2017 पासून जीएसटी अंतर्गत नवीन करदात्यांना नोंदणी दाखले देण्याची सुविधाही www.gst.gov.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व करदात्यांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वस्तू सेवा कर प्रणालीच्या स्वागतासाठी देशामध्ये आनंदोत्सव होत असल्याचे सांगून आमदार सुरेश खाडे म्हणाले, 167 देशांमध्ये वस्तू सेवा कर प्रणाली अस्तित्त्वात आहे. या कर प्रणालीची अंमलबजावणी करणारा भारत 168 वा देश आहे. ही कर प्रणाली व्यापारी उद्योग जगताला तारणारी आहे. प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि गावाचा विकास ही करप्रणाली करेल. त्यासाठी सी. ए. नी व्यापारी उद्योजकांना मदत करावी. सांगली जिल्ह्यात या कर प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी, हे स्पष्ट करतानाच आमदार सुरेश खाडे यांनी या करप्रणाली बाबत महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पाठ ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी एस. टी. पी. संघटनेचे ट्रेड असोसिएशनचे श्री. चितळे, अतुल शहा, उपाध्यक्ष ऍ़ड. अमोल माने, सी. ए. असोसिएशनचे संदीप तगारे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वस्तू सेवा कर कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. सहाय्यक आयुक्त राजश्री थोरात, श्रीमती करंदीकर, श्रीमती लाड यांनी वस्तू सेवा करावर आधारित कविता सादर केल्या. वैशाली काशिद यांनी प्रास्ताविक केले. माधुरी म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र बेलवलकर यांनी मानले.
यावेळी विक्रीकर संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, कर सल्लागार, लेखापाल, उद्योजक, व्यापारी वस्तू सेवा कर कार्यालयाचे राज्य कर सहाय्यक आयुक्त, राज्य कर अधिकारी, राज्य कर निरीक्षक अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा