शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

कामगारांच्या अडीअडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : कामगारांच्या व्यथा, अडचणी, त्यांची सुख:दुख: ही मी स्वत: भोगलेली असून यातून कामगारांच्यासाठी काही तरी मार्ग निघावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करून एकाच छताखाली कामगारांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे संपन्न झाला. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कामगार कष्टाचे काम करत असतो त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. कामगारांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला मल्टीपर्पज ईएसआय हॉस्पीटलसाठी प्रयत्न करीत असून 6 ईएसआय हॉस्पीटल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पुणे येथील मल्टीपर्पज हॉस्पीटलची पायाभरणी लवकरच करण्यात येईल. कामगारांची मुले खेळ, उद्योगात आली पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी वास्तु उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ईएसआय हॉस्पीटलला जोडूनच कामगारांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कामगारांच्या मुलांना टेक्नीकल प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून प्रत्येक वर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलन अत्यंत आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देवून येथून पुढे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जुन्या व नव्या साहित्याचा इतिहास नोंदविला जावा असे सांगून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, वर्षभर कवि संमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी घ्यावेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या कलाकारांना वाव मिळेल. कामगार ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांना चांगली स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, खाण्यापिण्याची व्यवस्था अशा सुविधा त्यांना परवडतील अशा पध्दतीने उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, कामगार साहित्य चळवळीची अत्यंत आवश्यकता आहे. अनुदवादक फळी निर्माण करून आपल्या भाषेतील साहित्य इतर ठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी वैचारिक लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी साहित्य संमेलनाबद्दल सविस्तर माहिती देवून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुरवे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000000

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ

पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन सांगली दि. 24 ( जि.मा.का.) : ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा... तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी..... गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा... तुकाराम .. जय..जय राम... कृष्ण हरी... असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंचाचे, डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ०००००

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार - ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर

सर्व उद्योगात कामगार हाच केंद्रबिंदू ... पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सृजनात्मा निर्माण करणारा आत्मा, म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. संस्कृती म्हणजे एकमेकांना जोडून राहणं, प्रेम करणं. यंत्रमानवाला आपल्या मेंदुवर स्वार होऊ देवू नका. यंत्र माणसाच्या हातात पाहिजे, ते माणसाच्या डोक्यावर जावू नये. यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा हा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केलेलं आहे. माणसामधली सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कविताही असणार आहे, त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचं साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा ‍विश्वास 17 व्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे आयोजित 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उप सचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते. डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य, मग ते कोणाचंही, कोणत्याही काळातलं असू देत, निर्माण करणारा माणूसच असतो. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते साहित्य त्याच्या जगण्यातून निर्माण होत असतं. साहित्याचा विषय हा नेहमी माणूसच असतो. मग माणसाचं जगणं, तो ज्या कुटुंबात, समाजस्तरात जन्माला येतो, ज्या वातावरणात वाढतो. त्या वातावरणातलं राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, सांस्कृतिक वातावरण या सगळ्या ताणाबाणांच्या मिश्रतेचा साहित्यात आविष्कार होत असतो. कामगार साहित्यातही हेच होत असतं. कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो, असे त्या म्हणाल्या. मी कामगार आहे तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे! “ म्हणजे लिहिणार आहे असे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे म्हणतात, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क इत्यादी बाबींच्यामधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला. नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचं नवं अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चे यामुळे कामगार चळवळीचं अस्तित्व समाजाला जाणवू लागलं. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातूनं होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळीतुन कामगार चळवळ ही पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली. बुध्दी व श्रम ही दोन्ही बले जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुध्दी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी यावेळी केले. 19 व्या शतकात महात्मा फुले, शतपत्रेकार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कामगारांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली. सध्याच्या काळात कामगारांच्या चळवळी मंदावत आहेत. हा जागतिकीकरणाचा दुष्परिणाम आहे. कंत्राटी पध्दतीने कामगार भरती होत असल्याने त्यांना संघटीत होण्यास संधी मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. कामगारांनी काम मागण्यापेक्षा देणारे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सर्व उद्योगात कामगार केंद्रबिंदू असल्याने त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी. कामगार साहित्य संमेलनाला मोठा वारसा असून यातून कामगारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कामगार कल्याण मंडळामार्फत होत आहे. कामगार साहित्य संमेलनाच्या मंचावरून कामगारांचे प्रश्न, समस्या यावर चर्चा घडते. कामगार कल्याण मंडळाने 17 वे साहित्य संमेलन साहित्य, आरोग्य पंढरी असलेल्या मिरजेत आयोजित केल्याबद्दल कामगार मंडळाचे त्यांनी आभार मानले. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात असून कबड्डी सारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत. शिक्षण, साहित्य व सांस्कृतिक विषयक कार्यक्रम आयोजित करून कामगारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम कल्याण मंडळामार्फत केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. कामगार कल्याण मंडळामार्फत साहित्य संमेलनासारखे उपक्रम आयोजित करून कामगाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे, असे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुमारे 12 वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनामध्ये ३ हजार कामगार व कुटुंबियांनी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्र गीत तर बाबा नदाफ आणि सहकाऱ्यांनी महात्मा फुले यांचा सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे माहेर हा अखंड सादर केला. कार्यक्रमात अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळ वादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 00000

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

तृणधान्य वापराबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करा आमदार सुधीर गाडगीळ यांचे आवाहन सांगली, दि. 23 (जि.मा.का.):- आरोग्यासाठी तृणधान्ये आहारात हितकारक आणि महत्त्वाची असून तृणधान्य वापराबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना शिंदे, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे, विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर येथील प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे योगेश बन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे रामकृष्ण पटवर्धन व महाविद्यालयाचे प्राध्यापक राजकुमार पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आमदार श्री. गाडगीळ म्हणाले, आहारात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र फास्ट फूड मुळे आहारात तृणधान्याचे प्रमाण कमी झाले आहे. तृणधान्यांचा आहारात नेहमी वापर करून रोग प्रतिकार शक्ती वाढवू, असे आवाहन त्यांनी केले. तृणधान्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कृषी विभागाबरोबरच सर्वच विभागानी प्रयत्न करावेत, असे सांगून श्री, गाडगीळ म्हणाले तृणधान्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले याचे आपणास समाधान वाटते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, फास्ट फूडच्या वापरामुळे आहारात तृणधान्याचा वापर कमी झाला आहे. तृणधान्याचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2023 वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्यामुळे आरोग्य चांगले होऊन प्रतिकारशक्ती वाढते यामुळे शालेय पोषण आहारामध्ये देखील तृणधान्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राध्यापक राजकुमार पाटील म्हणाले, निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे. तृणधान्य सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते यामुळे मानवी आहारात तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जावेत, असे श्री. पाटील म्हणाले. पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी आमदार श्री. गाडगीळ यांनी तृणधान्य पासून बनवलेल्या विविध पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली. तदनंतर त्यांनी रांगोळी प्रदर्शनाचीही पाहणी केली. 000000

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

बाल महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व ऑलंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेवून नाव उज्वल करावे - महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त संजय माने

चाचा नेहरु विभागीय बाल महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद सांगली आणि पुणे जिल्ह्याकडे सांगली दि. 17 (जि.मा.का.) : बाल महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय व ऑलंपिक स्पर्धांमध्ये सहभागी घेवून स्वतःचे व महिला व बाल विकास विभागाचे नाव उज्वल करावे. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून योग्य ती मदत व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महिला व बाल विकास विभाग पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी दिली. जिल्हा महिला व बाल विकास विभाग पुणे व जिल्हा महिला व बाल विकास विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा संकुल श्री. संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज सांगली मिरज रोड सांगली येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता समारंभ व स्पर्धांचे बक्षीस समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला खरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, चंद्रशेखर तेली, विनोद चौगुले, अतिश शिंदे, विधिसल्लागार दिपिका बोराडे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आदि उपस्थित होते. शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सव २०२२-२३ या कार्यक्रमाचे पुणे विभागातील ५ जिल्ह्यातील अनाथ निराधार निराश्रीत उन्मागी दुर्लक्षित बालकांच्या कलागुणांना व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बाल महोत्सवामध्ये बालकांसाठी वैयक्तिक व सांघीक स्पर्धाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय बाल महोत्सवामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील ५०० बालकांनी सहभाग घेवून वैयक्तिक व सांघीक स्पर्धा/सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद व्दिगुणीत करुन आस्वाद घेतला. या महोत्सवामध्ये जनरल चॅम्पीयन शिप मुली पुणे जिल्ह्याला तर जनरल चॅम्पीयन शिप मुले ही सांगली जिल्ह्याला मिळाली. यावेळी बाल महोत्सवातील सहभागी प्रवेशितांना ज्या ज्या खेळामध्ये प्राविण्य मिळविले आहे त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचे कौतुक केले. 000000

रोजगार मेळावा 22 फेब्रुवारीला - सहायक आयुकत ज.बा. करीम

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून प्लेसमेंट ड्राईव्हचे व रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 22 फेब्रवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gpv.in या वेबसाईटवर नोंदणी करावी व मुलाखतीसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुकत ज.बा. करीम यांनी केले आहे. प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्यामध्ये सहा कंपन्याची / उद्योजकांची एकूण २१३ पदे भरण्यात येणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील हिंदुस्थान नायलॉन लि. सांगली, कामधेनू ॲग्रोव्हेट, कसबे डिग्रज, मुथुट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली, नेहा इंजिटेक सोल्युशन प्रा लि., सांगली, श्री.चिंतामणी मोटार्स प्रा.लि. सांगली, स्पॉटलाईट कन्सलटंट, पुणे इ. विविध नामवंत कंपन्यानी / सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये विविध प्रकारची पदभरती करण्यात येणार आहेत. मुथुट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली यांच्याकडील फिल्ड ऑफिसर-20, क्रेडिट ऑफिसर-15, व ब्रॅच मॅनेजर-10 या पदासाठी शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास, बी.कॉम व कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी आहे. नेहा इंजिटेक सोल्युशन प्रा.लि, सांगली यांच्याकडील मेकॅनिकल इंजिनिअर-4, फिटर-2, वेल्डर-5, व हेल्पर-10 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिकपात्रता BE-Mech/ DME, ITI- Fitter, Welder व इ.१० वी व १२ वी पास अशी आहे. तसेच कामधेनू ॲग्रोव्हेट, कसबे डिग्रज यांच्याकडील सेल्स कोऑर्डीनेटर-1, सेल्स ऑफिसर-12, ड्रायव्हर-3, प्लॉट सुपरवायझर-1, न्यूट्रीशन मॅनेंजर-2 इत्यादी जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणीक पात्रता बीकॉम/एमकॉक, टॅली, बीएससी/एमएससी-ॲग्री, एमबीए, कोणत्याही शाखेचा पदवीधर, 10 वी व Driver पास अशी आहे. हिंदुस्थान नॉयलॉन सांगली यांच्याकडील Marketing Executive-5, Turner-10, CNC/VMC Operator-15, Machinist-12, Fitter-10, Helper-10, Machine Operator-10 अशी पदे भरण्यात येणार असुन यासाठी इ.10 वी 12 वी कोणत्याही शाखेची पदवी तसेच ITI-Fitter, Machinist, CNC/VMC, Turner पास अशी आहे. चिंतामणी मोटार्स, सांगली यांच्याकडील Purchase Executiv-2, HR Asst.Manager-1, Machine Operator-2, CO2 Welder-2 एकूण- 7 पदे भरणार असुन सदर पदासाठी ‍इ.12 वी पास, Diploma-DME/Degree-Mech/Automobile, MBA पदासाठी इ.१० वी व १२ वी पास अशी आहे. तसेच SpotLight Cunsultant, Pune यांच्याकडील Field Executive/CNC Machine/Relationship Manager- 50 पदे भरणार असुन सदर पदासाठी‍ कमीत कमी इ.12 वी पास असणे आवश्यक आहे. 000000

अटल भूजल पंधवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात 13 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयामार्फत भूजल पंधवडा राबविण्यात येत आहे. केंद्रशासन व जागतिक बँक सहाय्यीत अटल भूजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 95 गावांत अटल योजनेचा चित्ररथ शालेय विद्यार्थांच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, वृक्षारोपण, शेतकरी मेळावे, सरपंच परीषद अशा विविध उपक्रमांचे आयोजन भूजल पंधवडामध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी दिली. भूजल पंधवड्यात लोकसहभागातून भूजलाचे महत्व, पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करण्यात येत असून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच भूजल संबंधी विविध घटकांची प्रात्यक्षीके तसेच उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे. पुरवठा (जलसंधारणाची कामे) व मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना म.न.रे.गा., प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये अभिसरण साध्य करणे, भूजलाच्या शाश्वत विकासाकरीता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे ही अटल योजनेची मुख्य उद्यिष्टे आहेत. विविध उपक्रम राबवून अटल भूजल योजनेबाबत योजनेत समाविष्ठ गावात जनजागृती करण्यात येणार आहे. गावातील विविध पातळीवर ग्रामस्थ, महिला, सामाजिक संस्था यांच्या बैठका घेवून भूजलाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. जल सुरक्षा आरखड्याच्या माध्यमातून भूजलची घसरण थांबविणे व भूजल पातळीत वाढ करणे या करीता उपायायोजनाची माहिती विविध उपक्रमातून गावस्तरावर देण्यात येणार आहे. यामध्ये भूजल पुनर्भरण उपाययोजनेंतर्गत सिमेंट नाला बांध, माती नाला बांध व दगडी बांध, विहीर पुनर्भरण, रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट, इ. कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, अस्तीत्वातील कामांचे पुनर्रुजीवन अंतर्गत सिमेंट नाला बांध व तत्सम कामे-हायब्रीड गॅबीयन बंधारे व अस्तीत्वातील जलसंधारणाच्या कामांची दुरूस्ती तसेच भूजल पुनर्भरण, जलसंधारण कामाच्या साठवण क्षेत्रातील गाळ काढणे अशी पुनर्रुजीवन कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, मागणी व्यवस्थापन व पाणी बचतीच्या उपाययोजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर, मातीतील आद्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर, पाणी उपलब्धतेनुसार पिकसंरचना इत्यादीसाठी चालना देण्यात येणार असून कृषि विभागाव्दारे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व इतर सुरु असलेल्या योजनांमधून एककेंद्राभिमुखतेव्दारे अंमलबजावणी करून पाण्याची बचत व कार्यक्षम पाणी वापरात वाढ करण्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी सांगितले. 00000

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी 9 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून 20 टक्के स्वीय निधीमधून सन 2022-23 मध्ये घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा. व भ.ज., नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे दि. 9 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या योजनेत प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये लाभाचे स्वरूप असून अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचा (तहसिलदार/ प्रांताधिकारी) जातीचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्यांचा (तहसिलदार) उत्पन्नाचा दाखला, ग्रामसेवक यांनी दिलेला संबंधित अर्जदाराचा रहिवासी दाखला अथवा स्वयंघोषणपत्र, यापूर्वी सदर योजनेचा वा अन्य शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला अथवा स्वयंघोषणापत्र, अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसल्याबाबत संबंधित ग्रामसेवकांचा दाखला अथवा स्वयंघोषणापत्र, अर्जराच्या स्वतः च्या नावे असणाऱ्या जागेचा ८ अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार-किमान क्षेत्रफळ २६९ चौ. फूट असावे ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 00000

महिला लोकशाही दिन 20 फेब्रुवारीला

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे फेब्रुवारी 2023 या महिन्यातील महिला लोकशाही दिन ‍दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. 00000

मिरज उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी - उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : ‍मिरज उपविभागातील मिरज तालुक्यातील 13, तासगाव तालुक्यातील 17 व कवठेमहांकाळ तालुक्यातील 10 अशा एकूण 40 गावांतील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता पद्मभूषण वसंतरावदादा पाटील पंचायत समिती मिरज येथे ठेवण्यात आला आहे. संबंधित गावातील नागरीकांनी आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी मिरज उपविभाग मिरज तथा पोलीस पाटील निवड समिती अध्यक्ष समीर शिंगटे यांनी केले आहे. मिरज तालुक्यातील इनामधामणी, कवलापूर, कावजी खोतवाडी, कळंबी, कानडवाडी, आरग, पद्माळे, शिंदेवाडी, कदमवाडी, मानमोडी, नावरसवाडी, जुनीधामणी, ‍निलजी (एकूण 13 गावे), तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, चिंचणी, नागाव निमणी, वासुंबे, बेंद्री, लिंब, शिरगाव कवठे, खुजगाव, जरंडी, मोराळे पेड, बलगवडे, वाघापूर, निंबळक, बिरणवाडी, भैरववाड, किंदरवाडी, नागेवाडी (एकूण 17 गावे) व कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, कुची, जाखापूर, कुंडलापुर, मोघमवाडी, कोकळे, विठुरायाचीवाडी, शेळकेवाडी, बसाप्पाचीवाडी, मोरगाव (एकुण 10 गावे), अशा एकूण 40 गावांतील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 17 फेब्रुवारी रोजी होणार असल्यांचे उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

चाचा नेहरू बाल महोत्सवातून भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील - उपआयुक्त संजय माने

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या क्रीडा स्पर्धेतून बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन या स्पर्धेतुन भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास महिला व बालविकास विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित विभागीय चाचा नेहरू बाल मोहत्सवाचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त संजय माने व जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सांगलीच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, सातारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. बालगृहातील बालकांचे केवळ संगोपन,पुनर्वसन हा उद्देश नसून त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांच्या गुणांना वाव देण्याचे काम महिला व बाल विकास विभागामार्फत केले जात आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक भावना व खिलाडू वृत्तीने खेळ करावा असे आवाहन श्री. माने यांनी केले व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. खूप खेळा... नाव कमवा... प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो, कमतरता असते, पण याचा विचार न करता तुमच्यातील सुप्त गुण ओळखा, खूप खेळा आणि नाव कमवा असा मायेचा संदेश जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी यावेळी बोलताना दिला. श्रीमती पाटोळे म्हणाल्या, तुमच्यातील प्रकाशाने जगाला दिपवून टाका. आपले वेगळे अस्तित्व निर्माण करा, जग बदलण्याची तुमच्यात धमक असून जिंकायचेच ही उमेद तुमच्यात कायम ठेवा. महिला व बाल विकास विभागाच्या कामाला माया व करुणेची किनार असून ज्यांचे कोणी नाही त्यांची काळजी घेणारा हा विभाग असल्याचे मतही जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले व महोत्सवातील स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुलांनी त्यांच्यातील क्रीडा गुणांचा योग्य विकास करून खेळात करियर केल्यास त्यांना शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागाने चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आयोजित करून मुलांमधील सुप्त गुणांना वाव-चालना दिली ही कौतुकाची बाब आहे. भविष्यात या मुलांमधून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व्यक्त केला व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा विषयक योजनांची माहिती दिली. बालगृहातील बालकांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, मुलांच्या क्रीडा गुणांना चालना मिळावी यासाठी असे महोत्सव स्पर्धा वारंवार आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत सातारा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी व्यक्त केले. मुलांमधील क्रीडा गुणांना चालना मिळावी, त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण व्हावी यासाठी बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी सांगितले व जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्याबद्द्ल त्यांचे आभार मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चाचा नेहरू व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करुन विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन विधी सल्लागार दिपीका बोराडे यांनी केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे यांनी आभार मानले. 00000

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम,१९६० मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी मानवहितकारक कार्य करणाऱ्या, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांचे अर्ज संबंधित कामाच्या संपूर्ण तपशिलासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सांगली (मुख्यालय मिरज) येथे दि. २२ फेब्रुवारी २०२३ अखेर समक्ष अथवा टपालाने अथवा ई-मेलने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे. व्यवस्थापकीय समितीवर गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे सदस्य, मानवहित कार्य करणाऱ्या / प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या/ प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत असते. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या समितीतील यापूर्वी नियुक्ती झालेल्या अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असल्याने इच्छुक व पात्र व्यक्तींकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या व्यवस्थापकीय समितीवर पुढीलप्रमाणे विविध गटांमधून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, सांगली जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर प्रेम करणारे / प्राणी कल्याणासाठी काम करणारे ५ ते ६ कार्यकर्ते. इच्छुक व्यक्तींकडून मानवहितकारक कार्य / प्राणी कल्याणासाठी काम केल्याच्या संपूर्ण तपशिलासह अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या छाननीसाठी इच्छुक व्यक्तींच्या प्राणी कल्याणाच्या कामाचा अनुभव तसेच प्राणी कल्याण कायद्याचे ज्ञान या बाबींचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार आहे. छाननीनंतर पात्र असणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्याची पडताळणी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असणाऱ्या व्यक्तींची शिफारस प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी मार्फत शासनास करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येणार आहे. कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पत्ता : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज), डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, झरी बाग, मिरज ता.मिरज जि.सांगली पिन-४१६४१०, दूरध्वनी क्रमांक : ०२३३-२२२२२३३, ई-मेल आय डी : ddcahsangli@gmail.com. ०००००

कृषि पुरस्कारासाठी 13 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी दि. 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कृषि पुरस्काराचे नाव, निकष व पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, अधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार कृषि क्षेत्रामध्ये महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 11 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. उद्यानपंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. युवा शेतकरी पुरस्कार कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना देण्यात येतो (वय वर्षे 18 ते 40 वर्षे). या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. 00000

रोजगार मेळावा 10 फेब्रुवारीला

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : खाजगी क्षेत्रात खाजगी लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून रोजगार मेळाव्याचे ऑफलाईन आयोजन शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, 3 रा मजला, वखार भाग, अमराई रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अप्लॉय करावे व मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारानी समक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये नियमीत एकूण 140 पदे भरण्यात येणार असून यामध्ये महाबळ मेटल प्रा.लि. एमआयडीसी मिरज यांचेकडील इलेक्ट्रीशीयन, सॅण्ड प्लॅन्ट ऑपरेटर, ऑपरेटर (कॅमशॉफटस), सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मोल्डर, फिटर, ऑपरेटर (रेडिओग्राफी) टेम्प टेस्टींग ऑपरेटर, रोबो ऑपरेटर, कोअर शॉप मशीन ऑपरेटर, कोअर शॉप प्लॅटिंग ऑपरेटर, इनस्पेक्टर, पॅटर्न शॉप व वेल्डर इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इ. १० वी, इ.१२ वी व कोणत्याही शाखेची पदवी तसेच ITI, Diploma, BE इ. शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी १ ते २ वर्षे अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल असे कळविण्यात आलेले आहे. मूथूट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली या कंपनीकडील फिल्ड ऑफिसर, क्रेडीट ऑफिसर व ब्रँच मॅनेंजर अशा प्रकारची पदे भरण्यात येणार असून या पदासाठी HSC, B.com, Any Graduate इत्यादी शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार आहेत. 00000

सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : सुकन्या समृध्दी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच भवितव्यासाठी फायदेशीर योजना असून आत्तापर्यंत या योजनेत सांगली जिल्ह्यामध्ये 74 हजार 512 खाती उघडण्यात आली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत खाती काढून आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर रमेश पाटील यांनी केले आहे. अमृतपेक्स प्लस (राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शन) कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर भारतीय टपाल विभागामार्फत दिल्ली येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि अमृतपेक्स 2023 निमित्त महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून टपाल विभागाने देशव्यापी सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी अमृतपेक्स च्या पूर्वसंध्येवर जास्तीत जास्त सुकन्या खाती उघडण्यात येणार आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. 00000

दहा वर्षापुर्वीचे आधार कार्ड त्वरीत अद्ययावत करून घ्या - निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : बायोमेट्रीक प्रमाणिकरणासह रहिवाशांची ओळख पटविण्याच्या तरतुदीसह आधार हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे पुरावा म्हणून स्विकारला जातो. रहिवाशांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर सक्तीचा केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना नविन आणि अद्ययावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील ज्या रहिवाशांना 10 वर्षाहून अधिक काळ आधार कार्ड मिळालेले आहे, परंतू त्यांनी एकदाही ते अपडेट केले नसेल, अशा रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांचा पत्ता पुनश्चः सत्यापीत करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील 31 लाख 52 हजार 947 नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध झालेले आहे. यापैकी 10 लाख 73 हजार 340 आधारकार्ड कागदपत्रे अद्ययावत करिता प्रलंबीत आहेत. तरी आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेल्या तथापी, अपडेशन न केलेल्या नागरीकांनी ओळखीचे व पत्यासंबंधी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रामध्ये जावून दस्ताऐवज सादर करून अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (18 वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी www.sangli.nic.in वर पाहावयास उपलब्ध आहे. शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांनी आधार नोंदणी केलेली आहे अशा बालकांची दर पाच व दहा वर्षानी बॉयोमेट्रीक अपडेट करणे अनिवार्य आहे. वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यामध्ये बदल होत असल्याने बायोमेट्रीक अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड हे बायोमेट्रीक अद्ययावत न केल्यास निष्क्रीय होऊ शकतात. यासाठी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जावून निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे. आधार सेवा देणाऱ्या केंद्राबाबत आपणास कोणतीही तक्रार असल्यास संचित पवार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, मोबाईल नंबर 9021026898 व विपुल मद्वाण्णा, वरिष्ठ सहाय्यक अभियंता, मोबाईल नंबर 9921317151 माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याशी त्वयरी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आधार सेवांचे दर • कोणत्याही वयोगटातील नविन आधार नोंदणी - निशुल्क. • डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय अनिवार्य बायोमेट्रीक अद्ययावतीकरण - निशुल्क. • बायोमेट्रीक अद्ययावतीकरण डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय - 100 रूपये. • डेमोग्राफीक अद्ययावतीकरण - 50 रूपये. • दस्ताऐवज अद्यावतीकरणाकरीता आधार सेवा केंद्रावर यासाठी - 50 रूपये. • myAadhaar portal वरुन ऑनलाईन दस्ताऐवज अद्यावत केल्यास - 25 रूपये. • आधार रंगीत प्रिंट डाऊनलोड - 30 रूपये. 00000

मुख्यमंत्री यांच्या नावे द्यावयाची अर्ज, निवेदने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास द्या - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली (रोहयो शाखा) येथे स्थापन करण्यात आलेला आहे. हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्या नावे द्यावयाची अर्ज, निवेदने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास द्यावीत. प्रलंबित न्यायिक, अर्धन्यायिक प्रकरण आणि केसेस यामध्ये देण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाबाबत माहिती देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय का मंत्रालय मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विभागीय स्तरावरील क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून कामकाज पहात आहेत. तसेच या कक्षामध्ये महसूल सहायक व नायब तहसिलदार यांची नेमणूक करण्यात आलेली असल्याचे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले अर्ज निवेदने, संदर्भ इत्यादी स्वीकारले जातील. कक्षास प्राप्त प्रकरणापैकी ज्या प्रकरणामध्ये जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करून त्यावर दिनांक १० जानेवारी २०२३ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशी सर्व वैयक्तिक / धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-३२ याला सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी मंत्रालय स्तरावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावरच सोडविले जातील. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास आतापर्यंत एकूण ५८ अर्ज / निवेदने प्राप्त झाले असून त्यापैकी १२ अर्ज धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत असल्याने शासनास सादर केले आहे. तसेच जिल्हास्तरावरून कार्यवाही अपेक्षित असलेल्या ५० प्रकरणाबाबत सबंधीत विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन २२ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी सांगितले. ०००००

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : आजची पिढी ही अधिक चिकित्सक असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगावी, असा सल्ला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान व गणित अध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड एमआयडीसी येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक येथे आयोजित ५० व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य आण्णासाहेब गाजी, सुहास पाटील, भालचंद्र पाटील, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी शालेय, तालुका व जिल्हा स्तरावर भरवण्यात येणारी विज्ञान प्रदर्शने प्रेरणादायी आहेत. लठ्ठे पॉलीटेक्निक येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या सांगली जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून देशासाठी भावी संशोधक व वैज्ञानिक निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये लहान वयापासूनच वैज्ञानिक ज्ञानाबाबत रूची निर्माण करण्यासाठी लठ्ठे पॉलिटेक्निक येथे सुंदर विज्ञान प्रदर्शन भरवले याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी अनुदान बंद केले नसून याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवावा त्याचा पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले. ५० वे विज्ञान प्रदर्शन लठ्ठे पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्याचा बहुमान दिल्याबदद्ल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. यापुढेही शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. लोंढे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. मुलांमध्ये वैज्ञानिक चिकित्सा व संशोधन वृत्ती वाढावी यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. जिल्ह्यात 758 हायस्कूल असून यामध्ये दोन लाखाच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना बाल वयातच विज्ञानाची गोडी लागून त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सायन्स क्लबची स्थापना करण्यात येणार असून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी सायन्स सेंटर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विज्ञान शिक्षक दादासाहेब सरगर यांनी विज्ञान प्रदर्शनासंदर्भात माहिती देऊन प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या विज्ञान उपक्रमाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 50 व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी कृती या गटात इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या विश्वप्रतापसिंग रामराजे माने यास प्रथम क्रमांक, शांतिनिकेतन कन्या शाळा सांगली येथील वैष्णवी आनंदा मोरे द्वितीय, येलूर हायस्कूल येलूरची वेदिका रत्नाकर जाधव तृतीय आणि कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूरची मधुरा मनोज कोरडे व पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हायस्कूल पलूसचे श्रेयस जगन्नाथ जाधव यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे. प्राथमिक शिक्षक कृती गटात जिल्हा परिषद शाळा, आराळा येथील शिक्षक मोहन राजाराम पवार प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा कारजनगे येथील शिक्षक श्रीकांत शंकर सोनार द्वितीय, जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर करगणी येथील शिक्षक दिपाली आनंद देवकर तृतीय आणि जिल्हा परिषद शाळा नं. २, कुची येथील शिक्षक अमोल किसन हंकारे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे. माध्यमिक विद्यार्थी कृती गटात जिजामाता विद्यालय वाळवा येथील श्रुती गजानन माळी प्रथम क्रमांक, एस. व्ही. एम. व्ही, कोळेगरी येथील प्रतीक्षा करबसप्पा हिरेमठ द्वितीय क्रमांक, शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली येथील आरती उमेश चव्हाण तृतीय क्रमांक आणि नचिकेता गौरवकुंज माध्यमिक विद्यालयाची ज्ञानेश्वरी संतोष माने व आझाद विद्यालय कासेगाव येथील ऋषिकेश राजेंद्र किरवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. माध्यमिक शिक्षक कृती गटात न्यू इंग्लिश स्कूल कोंगनोळी येथील शिक्षक संजयकुमार लालासो मगर प्रथम क्रमांक, समाज विकास विद्यालय, सांगाव येथील शिक्षक मंगेश विठ्ठल तिके द्वितीय क्रमांक, प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथील शिक्षक गीतांजली योगेश लुब्बाळ तृतीय क्रमांक आणि जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मिरज येथील शिक्षक परवीन मोहम्मद आरिफ बागवान यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे. प्रयोगशाळा परिचर कृती गटात सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील अशोक गणपतराव पाटील प्रथम क्रमांक, विटा हायस्कूल विटा येथील मुलाणी परवेज मौलाअली द्वितीय क्रमांक, बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल कवठेमहांकाळ येथील शहाजी पतंगराव दळवी तृतीय क्रमांक आणि समाज विकास विद्यालय सांगाव येथील आर. एच. कोरे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे. विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा या गटात नांद्रे विद्यालय व कला वाणिज्य विद्यालय नांद्रे येथील श्रद्धा राजेंद्र तांदळे, श्रावणी आप्पासो यादव, समीक्षा संदीप पवार यांना प्रथम क्रमांक, सेकंडरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भिलवडी येथील सृष्टी दादा चौगुले, सानिका शब्बीर इनामदार, सुखदा धनंजय भोळे यांना द्वितीय क्रमांक आणि महात्मा गांधी विद्यालय विटा येथील साद रफिक तांबोळी, अथर्व दीपक मुतालिक, विराज सूर्यकांत कदम यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. दिव्यांग विद्यार्थी कृती गटात भीमरावशेठ जगन्नाथ चव्हाण-देशमुख विद्यालय वासुंबे ता. खानापूर येथील विराज संजय पवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ००००००