मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

चाचा नेहरू बाल महोत्सवातून भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील - उपआयुक्त संजय माने

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या क्रीडा स्पर्धेतून बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन या स्पर्धेतुन भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास महिला व बालविकास विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित विभागीय चाचा नेहरू बाल मोहत्सवाचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त संजय माने व जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सांगलीच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, सातारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. बालगृहातील बालकांचे केवळ संगोपन,पुनर्वसन हा उद्देश नसून त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांच्या गुणांना वाव देण्याचे काम महिला व बाल विकास विभागामार्फत केले जात आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक भावना व खिलाडू वृत्तीने खेळ करावा असे आवाहन श्री. माने यांनी केले व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. खूप खेळा... नाव कमवा... प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो, कमतरता असते, पण याचा विचार न करता तुमच्यातील सुप्त गुण ओळखा, खूप खेळा आणि नाव कमवा असा मायेचा संदेश जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी यावेळी बोलताना दिला. श्रीमती पाटोळे म्हणाल्या, तुमच्यातील प्रकाशाने जगाला दिपवून टाका. आपले वेगळे अस्तित्व निर्माण करा, जग बदलण्याची तुमच्यात धमक असून जिंकायचेच ही उमेद तुमच्यात कायम ठेवा. महिला व बाल विकास विभागाच्या कामाला माया व करुणेची किनार असून ज्यांचे कोणी नाही त्यांची काळजी घेणारा हा विभाग असल्याचे मतही जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले व महोत्सवातील स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुलांनी त्यांच्यातील क्रीडा गुणांचा योग्य विकास करून खेळात करियर केल्यास त्यांना शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागाने चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आयोजित करून मुलांमधील सुप्त गुणांना वाव-चालना दिली ही कौतुकाची बाब आहे. भविष्यात या मुलांमधून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व्यक्त केला व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा विषयक योजनांची माहिती दिली. बालगृहातील बालकांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, मुलांच्या क्रीडा गुणांना चालना मिळावी यासाठी असे महोत्सव स्पर्धा वारंवार आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत सातारा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी व्यक्त केले. मुलांमधील क्रीडा गुणांना चालना मिळावी, त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण व्हावी यासाठी बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी सांगितले व जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्याबद्द्ल त्यांचे आभार मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चाचा नेहरू व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करुन विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन विधी सल्लागार दिपीका बोराडे यांनी केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे यांनी आभार मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा