शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

अटल भूजल पंधवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात 13 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयामार्फत भूजल पंधवडा राबविण्यात येत आहे. केंद्रशासन व जागतिक बँक सहाय्यीत अटल भूजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 95 गावांत अटल योजनेचा चित्ररथ शालेय विद्यार्थांच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, वृक्षारोपण, शेतकरी मेळावे, सरपंच परीषद अशा विविध उपक्रमांचे आयोजन भूजल पंधवडामध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी दिली. भूजल पंधवड्यात लोकसहभागातून भूजलाचे महत्व, पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करण्यात येत असून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच भूजल संबंधी विविध घटकांची प्रात्यक्षीके तसेच उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे. पुरवठा (जलसंधारणाची कामे) व मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना म.न.रे.गा., प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये अभिसरण साध्य करणे, भूजलाच्या शाश्वत विकासाकरीता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे ही अटल योजनेची मुख्य उद्यिष्टे आहेत. विविध उपक्रम राबवून अटल भूजल योजनेबाबत योजनेत समाविष्ठ गावात जनजागृती करण्यात येणार आहे. गावातील विविध पातळीवर ग्रामस्थ, महिला, सामाजिक संस्था यांच्या बैठका घेवून भूजलाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. जल सुरक्षा आरखड्याच्या माध्यमातून भूजलची घसरण थांबविणे व भूजल पातळीत वाढ करणे या करीता उपायायोजनाची माहिती विविध उपक्रमातून गावस्तरावर देण्यात येणार आहे. यामध्ये भूजल पुनर्भरण उपाययोजनेंतर्गत सिमेंट नाला बांध, माती नाला बांध व दगडी बांध, विहीर पुनर्भरण, रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट, इ. कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, अस्तीत्वातील कामांचे पुनर्रुजीवन अंतर्गत सिमेंट नाला बांध व तत्सम कामे-हायब्रीड गॅबीयन बंधारे व अस्तीत्वातील जलसंधारणाच्या कामांची दुरूस्ती तसेच भूजल पुनर्भरण, जलसंधारण कामाच्या साठवण क्षेत्रातील गाळ काढणे अशी पुनर्रुजीवन कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, मागणी व्यवस्थापन व पाणी बचतीच्या उपाययोजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर, मातीतील आद्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर, पाणी उपलब्धतेनुसार पिकसंरचना इत्यादीसाठी चालना देण्यात येणार असून कृषि विभागाव्दारे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व इतर सुरु असलेल्या योजनांमधून एककेंद्राभिमुखतेव्दारे अंमलबजावणी करून पाण्याची बचत व कार्यक्षम पाणी वापरात वाढ करण्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा