शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार - ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर

सर्व उद्योगात कामगार हाच केंद्रबिंदू ... पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सृजनात्मा निर्माण करणारा आत्मा, म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. संस्कृती म्हणजे एकमेकांना जोडून राहणं, प्रेम करणं. यंत्रमानवाला आपल्या मेंदुवर स्वार होऊ देवू नका. यंत्र माणसाच्या हातात पाहिजे, ते माणसाच्या डोक्यावर जावू नये. यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा हा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केलेलं आहे. माणसामधली सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कविताही असणार आहे, त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचं साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा ‍विश्वास 17 व्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे आयोजित 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उप सचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते. डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य, मग ते कोणाचंही, कोणत्याही काळातलं असू देत, निर्माण करणारा माणूसच असतो. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते साहित्य त्याच्या जगण्यातून निर्माण होत असतं. साहित्याचा विषय हा नेहमी माणूसच असतो. मग माणसाचं जगणं, तो ज्या कुटुंबात, समाजस्तरात जन्माला येतो, ज्या वातावरणात वाढतो. त्या वातावरणातलं राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, सांस्कृतिक वातावरण या सगळ्या ताणाबाणांच्या मिश्रतेचा साहित्यात आविष्कार होत असतो. कामगार साहित्यातही हेच होत असतं. कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो, असे त्या म्हणाल्या. मी कामगार आहे तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे! “ म्हणजे लिहिणार आहे असे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे म्हणतात, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क इत्यादी बाबींच्यामधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला. नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचं नवं अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चे यामुळे कामगार चळवळीचं अस्तित्व समाजाला जाणवू लागलं. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातूनं होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळीतुन कामगार चळवळ ही पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली. बुध्दी व श्रम ही दोन्ही बले जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुध्दी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी यावेळी केले. 19 व्या शतकात महात्मा फुले, शतपत्रेकार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कामगारांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली. सध्याच्या काळात कामगारांच्या चळवळी मंदावत आहेत. हा जागतिकीकरणाचा दुष्परिणाम आहे. कंत्राटी पध्दतीने कामगार भरती होत असल्याने त्यांना संघटीत होण्यास संधी मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. कामगारांनी काम मागण्यापेक्षा देणारे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सर्व उद्योगात कामगार केंद्रबिंदू असल्याने त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी. कामगार साहित्य संमेलनाला मोठा वारसा असून यातून कामगारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कामगार कल्याण मंडळामार्फत होत आहे. कामगार साहित्य संमेलनाच्या मंचावरून कामगारांचे प्रश्न, समस्या यावर चर्चा घडते. कामगार कल्याण मंडळाने 17 वे साहित्य संमेलन साहित्य, आरोग्य पंढरी असलेल्या मिरजेत आयोजित केल्याबद्दल कामगार मंडळाचे त्यांनी आभार मानले. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात असून कबड्डी सारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत. शिक्षण, साहित्य व सांस्कृतिक विषयक कार्यक्रम आयोजित करून कामगारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम कल्याण मंडळामार्फत केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. कामगार कल्याण मंडळामार्फत साहित्य संमेलनासारखे उपक्रम आयोजित करून कामगाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे, असे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुमारे 12 वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनामध्ये ३ हजार कामगार व कुटुंबियांनी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्र गीत तर बाबा नदाफ आणि सहकाऱ्यांनी महात्मा फुले यांचा सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे माहेर हा अखंड सादर केला. कार्यक्रमात अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळ वादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा