मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

दहा वर्षापुर्वीचे आधार कार्ड त्वरीत अद्ययावत करून घ्या - निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : बायोमेट्रीक प्रमाणिकरणासह रहिवाशांची ओळख पटविण्याच्या तरतुदीसह आधार हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे पुरावा म्हणून स्विकारला जातो. रहिवाशांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर सक्तीचा केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना नविन आणि अद्ययावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील ज्या रहिवाशांना 10 वर्षाहून अधिक काळ आधार कार्ड मिळालेले आहे, परंतू त्यांनी एकदाही ते अपडेट केले नसेल, अशा रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांचा पत्ता पुनश्चः सत्यापीत करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील 31 लाख 52 हजार 947 नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध झालेले आहे. यापैकी 10 लाख 73 हजार 340 आधारकार्ड कागदपत्रे अद्ययावत करिता प्रलंबीत आहेत. तरी आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेल्या तथापी, अपडेशन न केलेल्या नागरीकांनी ओळखीचे व पत्यासंबंधी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रामध्ये जावून दस्ताऐवज सादर करून अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (18 वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी www.sangli.nic.in वर पाहावयास उपलब्ध आहे. शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांनी आधार नोंदणी केलेली आहे अशा बालकांची दर पाच व दहा वर्षानी बॉयोमेट्रीक अपडेट करणे अनिवार्य आहे. वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यामध्ये बदल होत असल्याने बायोमेट्रीक अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड हे बायोमेट्रीक अद्ययावत न केल्यास निष्क्रीय होऊ शकतात. यासाठी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जावून निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे. आधार सेवा देणाऱ्या केंद्राबाबत आपणास कोणतीही तक्रार असल्यास संचित पवार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, मोबाईल नंबर 9021026898 व विपुल मद्वाण्णा, वरिष्ठ सहाय्यक अभियंता, मोबाईल नंबर 9921317151 माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याशी त्वयरी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आधार सेवांचे दर • कोणत्याही वयोगटातील नविन आधार नोंदणी - निशुल्क. • डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय अनिवार्य बायोमेट्रीक अद्ययावतीकरण - निशुल्क. • बायोमेट्रीक अद्ययावतीकरण डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय - 100 रूपये. • डेमोग्राफीक अद्ययावतीकरण - 50 रूपये. • दस्ताऐवज अद्यावतीकरणाकरीता आधार सेवा केंद्रावर यासाठी - 50 रूपये. • myAadhaar portal वरुन ऑनलाईन दस्ताऐवज अद्यावत केल्यास - 25 रूपये. • आधार रंगीत प्रिंट डाऊनलोड - 30 रूपये. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा