शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी 2 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शालेय जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2022-2023 चे आयोजन दि. 3 जानेवारी 2023 रोजी कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली येथे होणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosport_sangli@rediffmail.com या मेलवर सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर व्हॉटसॲप नंबर असणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे. युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींचा सहभाग होत असतो. जिल्हास्तरावर लोकनृत्य-Folk Dance मध्ये एकूण सहभागी संख्या 20 आहे तर लोकगीत-Folk Song मध्ये सहभागी संख्या 10 आहे. स्पर्धकांनी दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली या ठिकाणी दोन फोटो, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला घेवून उपस्थित रहावे. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशासोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळा / महाविद्यालय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच सादरीकरण करावे. परीक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करताना कोणत्याही प्रकारची इजा / दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा महोत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी प्रा. श्री. वडमारे, सांगली मो.नं. 9423036091, श्री. रवी पवार, विटा मो. नं. 9657091000/ 9175283887, क्रीडा अधिकारी एल. जी. पवार मो.नं. 9422424185 यांच्याशी संपर्क साधावा. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, सण, मोर्चा, कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 1 ते 15 जानेवारी 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 1 जानेवारी 2023 रोजीचे 01.00 वाजल्यापासून ते दि. 15 जानेवारी 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. 00000

दुभंगलेले ओठ, टाळू आजाराच्या शस्त्रक्रियेकरीता 31 बालकांची तपासणी पुढील महिन्यात शस्त्रक्रिया मोफत पूर्ण होणार - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 31 बालकांकरिता दि. 29 डिसेंबर 2022 रोजी प्रभु क्लिनिक डॉ. महेश प्रभु कोल्हापूर यांच्या पथकांमार्फत प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले. तपासणीअंती शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या 29 बालकांच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच स्माईल ट्रेन या योजनेतून जानेवारी महिनाअखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुभंगलेल्या टाळूच्या दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मुंबई येथील एस.आर.सी.सी. रूग्णालय येथे पूर्ण करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. या शस्त्रक्रियेकरीता खाजगी रूग्णालयात प्रति शस्त्रक्रिया 90 हजार ते 1 लाख रूपये पर्यंतचा खर्च करावा लागतो. अशाप्रकारे एकूण 30 लाख रूपये रक्कमेच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शस्त्रक्रिया शिबीरांकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे मार्गदर्शन लाभले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, डी.ई. आय.सी. अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीराचे नियोजन केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथकांमार्फत करण्यात येत आहे. वैद्यकिय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारीका अशा चार जणांच्या पथकांमार्फत लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकिय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. तपासणीमधून हृदय रोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नका-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात. दुंभगलेले ओठ व टाळू या जन्मजात आजारामुळे बालकांना अन्न गिळण्यामध्ये, बोलण्यामध्ये, श्वास घेण्यामध्ये प्रचंड अडथळा निर्माण होतो. लवकरात लवकर शस्त्रक्रिया न केल्यास कुपोषण व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बालके मोठ्या प्रमाणात अशक्त होवून इतर किरकोळ आजारास वारंवार बळी पडतात. वेळेत, यशस्वी व पूर्णपणे मोफत केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे बालके सशक्त व अत्यंत सामान्य जीवन जगू शकतात. 00000

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

कृषि महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : राज्यस्तरीय कृषि महोत्सव औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे दि. 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत करण्याचे नियोजित आहे. या कृषि महोत्सवात कृषि प्रदर्शन व कृषि विद्यापिठामार्फत विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. 00000

लम्पी चर्मरोगाने मृत्यू : नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सोय

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन प्रणालीव्दारे अर्ज स्वीकारण्यासाठी www.mahapashuarogya.com या संकेतस्थळावर व गुगल प्लेस्टोअरवर PASHU SAHAYATA मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या पशुपालकांनी या संकेतस्थळावर अथवा PASHU SAHAYATA मोबाईल अॅपवर नोंदणी करून अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे. 00000

शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (MAHATET-2021) चे आयोजन दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर 1 व 2 चा अंतिम निकाल दि. 23 डिसेंबर 2022 रोजी परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद / शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांच्यामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली. पेपर १ व २ साठी एकूण 4 लाख 68 हजार 679 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 17 हजार 322 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 3.70 टक्के इतकी आहे. पेपर 1 (इ. 1 ली ते 5 वी गट) साठी 2 लाख 54 हजार 428 परीक्षार्थीं प्रविष्ठ झाले होते. यापैकी 9 हजार 674 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 3.80 टक्के इतकी आहे. पेपर2 - गणित विज्ञान (इ. 6 वी ते 8 वी गट) साठी 64 हजार 647 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 937 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 1.45 टक्के इतकी आहे. पेपर 2 - सामाजिक शास्त्र (इ. 6 वी ते 8 वी गट) साठी 1 लाख 49 हजार 604 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 6 हजार 711 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 4.49 टक्के इतकी आहे. 00000

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली. ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारमध्ये NCS किंवा Mahaswayam वेबपोर्टलव्दारे नोकरीच्या संधी या विषयावर यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष साळी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/kvd-ccio-ahx या लिंकवर वेबीनारमध्ये विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

आपत्तीमध्ये आपदा मित्रांचे योगदान मोलाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. २२ (जि.मा.का.) : कोणत्याही आपत्तीमध्ये आपदा मित्रांचे योगदान मोलाचे असून आपदा मित्रांनी प्रशिक्षणातून विविध कौशल्य आत्मसात करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शांतीनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मौसमी चौगुले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, तहसिलदार दगडु कुंभार, अपर तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ, नायब तहसीलदार श्री. विभुते, विशेष कार्यकारी दंडाधिकारी उदयसिंग गायकवाड, शांती निकेतन शिक्षण संकुलाचे गौतम पाटील यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक व आपदा मित्र उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्तीमध्ये मदत आणि बचाव करत असताना आपदा मित्राची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी प्रशासनाने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या आपदा मित्रांची आरोग्य तपासणी करावी. आरोग्य तपासणी डाटा एकत्र संकलित करून ठेवावा. आपत्तीमध्ये आपदा मित्र आणि स्थानिक लोकांची मदत महत्त्वाची असल्याने प्रशिक्षण घेतलेल्या आपला मित्रांनी गाव पातळीवरही तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी बोलताना केले. पोलीस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, आपत्तीमध्ये तात्काळ प्रतिसाद महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज असते. यासाठी आपदा मित्रांनी गाव पातळीवरही असे प्रशिक्षित आपदा मित्र तयार करावेत. महापालिका आयुक्त श्री. पवार म्हणाले आपत्तीमध्ये आपदा मित्र हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला नियमित प्रशिक्षण मिळाले पाहिजे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमातून आपत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण आपदा मित्रांना मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनामध्ये करून प्रशासनाला आपत्तीमध्ये मदत करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. पवार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण १ जानेवारी २०२३ पर्यंत असून यामधे ५० आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत यापुढे ही आणखी ५ बॅचमध्ये आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आपदा मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे संपर्क साधावा. सदरचे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणार्थीना कोणतेही मानधन दिले जाणार नाही. तसेच भविष्यात शासकीय सेवेतील समावेशासाठी याचा विचार केला जाणार नाही. मात्र सामाजिक बांधिलकीतून आपदा मित्रांचा एक वर्षाचा विमा उतरवला जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांनी यावेळी दिली. प्रारंभी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन विभागाकडील तज्ञ राज्य प्रशिक्षक ओंकार नवलिहळकर यांनी प्रस्ताविक करून आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षणाचे असलेले महत्त्व विषद केले. ०००००

कोविड लसीचा प्रिकॉशन डोस तात्काळ घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : सध्या चीनमध्ये नव्याने सापडलेल्या BF-7 या ओमायक्रॉनच्या उप-प्रकारामुळे सुरू असलेल्या कोवडि-19 साथ उद्रेकाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून एकही रूग्ण कोविड पॉझीटीव्ह नाही. कोणीही घाबररून जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोविड लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध असून ज्यांनी अद्यापही लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा. ज्यांचा प्रिकॉशन डोस प्रलंबित आहे त्यांनीही तो तात्काळ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 साथीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कोविड-19 साथीपासून बचाव करण्यासाठी कोविड ॲप्रोप्रीएट बिहेवीअरचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळावे, कोविड सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. कोमॉर्बीड व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांनी विशेष काळजी घ्यावी. कोविड-19 साथीच्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने तसेच उपचाराकरीता सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शासकीय यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे ते यावेळी म्हणाले. कोविड-19 साथीच्या संभाव्य लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व नियोजनाकरीता विविध यंत्रणांसमवेत आढावा बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी उदा. आठवडी बाजार, लग्न समारंभ, यात्रा/जत्रा, मॉल, चित्रपटगृह इत्यादी ठिकाणी मास्क वापरावा. सर्व खाजगी वैद्यकीय अधिकारी यांनी सर्दी, खोकला, ILI / SARI यासारख्या लक्षणांसाठी उपचाराकरीता येणाऱ्या सर्व रूग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, जेणेकरून सदर रूग्णांची तपासणी करून इतरांना बाधा होवू नये याकरीता वेळीच उपाययोजना राबविणे शक्य होईल. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक दुरीकरण पाळणे इत्यादी कोविड ॲप्रोप्रीएट बिहेवीअरचे तंतोतंत पालन करावे. जागतिक आकडेवारीच्या आलेखानुसार वयोगट 40 ते 70 यामधील व्यक्तींना कोविड-19 ची बाधा जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याअन्वये जिल्ह्यातील 40 ते 70 यामधील व्यक्तींवरती जास्त लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. कोविड लसीकरणामुळे साथीचा फैलाव होण्यास बाधा होते व कोविड-19 आजाराकरीता रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे ज्याप्रमाणे पहिल्या डोसचे लसीकरण 99 टक्के झालेले आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याबाबत तसेच प्रिकॉशनरी डोसचे प्रमाण अत्यल्प (9.35 टक्के) असल्यामुळे प्रिकॉशनरी डोसच्या लसीकरणावरती भर देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ILI/SARI सर्व्हेक्षण करून सर्व संशयिंत रूग्णांची आर.टी.पी.सी.आर. तपासणी करण्याबाबत, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे कोविड रूग्णांकरीता स्वतंत्र उपचार कक्ष निर्माण करून राखीव बेडचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालयातील ऑक्सीजन पाईपलाईनची आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या, PSA/LMO प्लाँटस सुरळीतपणे कार्यान्वीत राहतील याची दक्षता घेण्याच्या, सर्व रूग्णालयातील व्हेंटीलेटर, BiPAP, PSA / LMO प्लाँटस च्या दुरूस्ती व देखभालीकरीता स्वतंत्र ऑक्सीजन कन्सलटंट / टेक्नीशियनची नेमणूक करणे, सर्व आरोग्य संस्थामध्ये औषधे, मास्क, सॅनीटायझर, ग्लोजचा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय यंत्रणामध्ये ऑक्सीजन पुरवठा यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. याकरीता एकूण 10.61 मे.ट. इतक्या क्षमतेचे 15 PSA प्लॉंटस व 150.1 मे.ट. इतक्या क्षमतेचे 15 LMO प्लाँटस कार्यान्वीत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये 481 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर, 412 लहान सिलेंडर, 662 जम्बो व 56 डुरा सिलेंडर उपलब्ध आहेत. कोविड-19 च्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये कार्यान्वित असलेल्या एकूण 45 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 2 हजार 513 खाटांची सुविधा असून यापैकी 746 आयसीयु बेड्स व 1 हजार 416 ऑक्सीजन बेड्स, 259 व्हेंटीलेटर, 149 HFNO, BiPAP 107 आहेत. एकूण 44 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1 हजार 651 खाटांची सुविधा असून यापैकी 132 आयसीयु बेड्स, 1 हजार 326 ऑक्सीजन बेड्स, 34 व्हेंटीलेटर, 13 HFNO, 42 BiPAP 42 आहेत. एकूण 37 डेडीकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 374 इतक्या खाटांची सुविधा आहे. जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे स्वतंत्र 156 बेडचे कोविड हॉस्पीटल असून यामध्ये 7 आयसीयु खाटांची सुविधा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 00000

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका 29 डिसेंबर पासून सुरू होणार

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी झेड ही नवीन मालिका गुरूवार, दि. 29 डिसेंबर 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी दिली. एम एच 10 डी झेड या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे सहायक उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

चला जाणुया नदीला अभियानातंर्गत जिल्हास्तरावर समिती गठीत

चला जाणुया नदीला अभियानात लोकसहभाग वाढवावा.... जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यात गतीने आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा असून नदीच्या आरोग्याबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी समिती सदस्यांसह सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले. चला जाणुया नदीला अभियान जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस उप वनसंरक्षक तथा जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव नीता कट्टे यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी व नदी समन्वयक उपस्थित होते. चला जाणुया नदीला अभियानात जिल्ह्यातील कृष्णा, तिळगंगा, अग्रणी, महांकाली, येरळा आणि माणगंगा या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. जलसाक्षरतेसाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या अभियानामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी यंत्रणांनी अभियानाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी. नदीच्या बाबतीत समाज सजग व्हावा यासाठी लोकप्रबोधन करावे. जिल्ह्यात चला जाणुया नदीला अभियानाच्या यशस्वीतेसाठी नदी समन्वयकांसाठी आवश्यक माहिती कार्यान्विन यंत्रणांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच अभियान राबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. उप वनसंरक्षक तथा जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव श्रीमती नीता कट्टे यांनी जिल्हास्तरीय समिती आणि अभियानाबाबत माहिती दिली. 00000

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

ग्राहक मध्यस्थ समाधान विशेष मोहिमेंतर्गत चार प्रकरणात तडजोड

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : ग्राहक मध्यस्थ समाधान विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडील तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 14 प्रकरणांमध्ये 4 प्रकरणात तडजोड होवून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. याकामी सांगली जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी पॅनेल प्रमुख तर सेवानिवृत्त न्यायाधीश श्रीकांत आ. उपाध्ये यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. तडजोड केलेल्या 4 प्रकरणांमध्ये तक्रारदारांना सुमारे 2 लाख रूपये इतकी रक्कम तडजोडीअंती मिळाली. यासाठी ॲड. परांजपे, ॲड. सुर्यवंशी, ॲड. वझे, ॲड. नरवाडे, ॲड. श्रीमती फाटक यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाचे प्रबंधक एन. बी. कुनाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. 00000

पी एम किसान योजना लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : जिल्ह्यात पी एम किसान योजनेचे 4 लाख 36 हजार 645 लाभार्थी असून 3 लाख 20 हजार 431 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे तर 1 लाख 16 हजार 214 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. प्रलंबित लाभार्थ्यांची यादी sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून ई-केवायसी प्रलंबित असलेल्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पी एम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पी एम किसान योजनेचे वर्षासाठी 2 हजार रूपयांचे तीन हप्ते असे एकूण वार्षिक 6 हजार रूपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत आणि ते हप्ते पुढे चालू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना स्वत: प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वैयक्तिकरित्या ई-केवायसी प्रक्रिया ओटीपी व्दारा पूर्ण करता येते किंवा संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील जवळच्या महाईसेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करता येईल. ई-केवायसी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरीत होणार नाही असे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील पी एम किसान लाभार्थी अ.क्र. तालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी झालेले लाभार्थी ई-केवायसी प्रलंबित लाभार्थी 1. आटपाडी 31801 21850 9951 2. जत 74373 57526 16847 3. कडेगाव 36871 27516 9355 4. कवठेमहांकाळ 30644 23699 6945 5. खानापूर 27331 17716 9615 6. मिरज 58418 39447 18971 7. पलूस 25432 19362 6070 8. शिराळा 37606 28583 9023 9. तासगाव 44228 32686 11542 10. वाळवा 69941 52046 17895 एकूण 436645 320431 116214 00000

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर अर्ज करण्याची सोय उपलब्ध

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : पशुसंवर्धन विभागाकडील विविध वैयक्तिक योजनांच्या लाभासाठी https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर आणि AH.MAHABMS (Google play स्टोअरवरील ) या मोबाईल अॅपवर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून याचा लाभ पशुपालकांनी घेऊन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे व इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. पशुसंवर्धन विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभासाठी https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर तर AH.MAHABMS (Google play स्टोअरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध ) अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जानेवारी 2023 पर्यंत असून अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, सांगली अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, मिरज, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. 000000

लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 10 जानेवारी 2023 आहे. पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध असून अर्ज करण्याकरीता तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये व व्दितीय क्रमांकास 10 हजार रूपये शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र तसेच मानचिन्ह देण्यात येते. जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षे पूर्वीचा नोंदणीकृत असावा. तसेच मागील तीन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापुर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्याने केलेली भांडवली गुंतवणूक, अधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन, घटनेचे ठिकाण, सामाजिक कार्य, कर्मचारी सोयी सवलती, आयात-निर्यात क्षमता, स्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील नवउद्योजक असावा, उत्पादित वस्तु बाबतची गुणवत्ता इत्यादी बाबींचाविचार करण्यात येईल असे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

गोदाम बांधणीसाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेमधून सन 2022-23 मध्ये फलेक्झी कार्यक्रम अंतर्गत गोदाम बांधणीसाठी दि. 30 डिसेंबर 2022 अखेर अर्ज मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. एकपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक व भौतिक लक्षांकाच्या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत कमाल 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना / नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. तरी इच्छुक व पात्र लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. 00000

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : रब्बी हंगाम 2022 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. पीक स्पर्धेतील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस ही पाच रब्बी पिके असून पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील या स्पर्धेसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी अनुक्रमे पहिले दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळी - 5 हजार, 3 हजार, 2 हजार रूपये. जिल्हा पातळी - 10 हजार, 7 हजार, 5 हजार रूपये. राज्य पातळी - 50 हजार, 40 हजार, 30 हजार रूपये. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्तीत, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र एक हजार हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रूपये आहे. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येणार आहे. अर्ज दाखल करण्यााच्याक तारखेच्याय दिवशी शासकीय सुट्टी असल्याेस, त्या पुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्याात येईल. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पीक स्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्हा स्तिरीय पीक स्पर्धा घेण्यात येईल. राज्यरपातळीवरील पीक स्प र्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्याा तालुकास्तनरीय स्पसर्धेतील पीकनिहाय पहिल्याप तीन क्रमांकाच्याे विजेत्या् शेतकऱ्यांनी जिल्हा स्त रीय पीक स्पेर्धेमध्ये् सहभाग घ्याेवा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 18 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी होत असून मतमोजणीसाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना आणि पूर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली. ग्रामपंचायत मतमोजणी कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या. या आढावा बैठकीस व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार सहभागी झाले होते. तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे पुढीलप्रमाणे. मिरज - शासकीय धान्य गोडावून वैरण बाजार मिरज, कवठेमहांकाळ - तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ, नवीन प्रशासकीय इमारत कवठेमहांकाळ, तासगाव - बहुउद्देशीय हॉल तहसिल कार्यालय तासगाव, खानापूर-विटा - शासकीय धान्य गोदाम हणमंत नगर, उपविभागीय अधिकारी विटा यांचे कार्यालयासमोर, आटपाडी - मध्यवर्ती प्रशासकीय भवन आटपाडी, तहसिल कार्यालय आटपाडी पहिला मजला मिटींग हॉल, जत - तहसिल कार्यालय जत, पलूस - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पलूस, कडेगाव - महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, वाळवा - शासकीय धान्य गोदाम इस्लामपूर आणि शिराळा - तहसिल कार्यालय शिराळा नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात. जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची 22 टेबलवर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. तासगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची 15 टेबलवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची 15 टेबलवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे. जत तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींची 20 टेबलवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. खानापूर-विटा तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची 16 टेबलवर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची 15 टेबलवर 6 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 19 टेबलवर 9 फेरीत मतमोजणी होणार आहे. पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची 14 टेबलवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींची 30 टेबलवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. शिराळा तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची 15 टेबलवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम जितके टेबल आहेत त्या टेबल वरती पूर्ण एक गाव अशा पध्दतीने जेवढी गांवे एकावेळी टेबलवर घेता येतात त्याप्रमाणे त्या गावांचे प्रतिनिधी / उमेदवार यांना मतमोजणी कक्षामध्ये पासधारकांना प्रवेश दिला जाणार आहे व त्या गावची मतमोजणी संपल्यानंतर सदर उमेदवार बाहेर गेल्यानंतर इतर गावांची मतमोजणी केली जाणार आहे. तसेच गर्दी तसेच जमाव एकत्रित येऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 000000

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

अनोळखी मृत व्यक्तीबाबत माहिती देण्याचे आवाहन

सांगली दि. 8 (जि. मा. का.) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे शिवारात अश्रुबा राजेंद्र मिसाळ राहणार कोंबडवाडी यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीमध्ये एका अनोळखी पुरूषाचे प्रेत दि. 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 5.45 पूर्वी ‍आढळले आहे. मयताचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून उंची 5 फूट 5 इंच, पॅन्ट काळ्या रंगाची, शर्ट पांढऱ्या रंगाचा ॲक्शन कंपनीचा, अंडरविअर किलर कंपनीची, बनियन चॉकलेटी रंगाचे, डाव्या हातावर इंग्रजीत S.J. असे लिहिलेले, उजव्या हातावर अवि किंवा अभी नाव गोंदलेले स्पष्ट दिसून येत नाही, अशा वर्णनाच्या वस्तु प्रेताच्या अंगावर मिळून आल्या आहेत. अशा वर्णनाचा पुरूष बेपत्ता अथवा हरवला असल्यास उप विभागीय पोलीस अधिकारी कळंब मो.क्र. 8369907421, सहायक पोलीस निरीक्षक पोलिस स्टेश्न ढोकी मो.क्र. 9545555550 या मोबाईल क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष उस्मानाबाद दूरध्वनी क्रमांक 0272-222700, उपविभाग पोलीस कार्यालय कळंब दूरध्वनी क्रमांक 02473-263100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपविभाग पोलीस कार्यालय कळंब यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा तारखांमध्ये बदल

सांगली दि. 8 (जि. मा. का.) : मैदानी (ॲथलेटीक्स) विभाग व राज्यस्तर स्पर्धा नजिक आल्यामुळे जिल्हास्तर शालेय (ग्रामीण) मैदानी क्रीडा स्पर्धा तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली. दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी 19 वर्षातील मुले व मुली यांची फक्त क्रॉस कंट्री सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे होईल. दि. 13 डिसेंबर 2022 रोजी 14, 17, 19 वर्षातील सर्व मुले यांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा होतील. दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी 14, 17,19 वर्षातील सर्व मुली यांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा होईल तसेच मुले व मुली यांची उंच उडी व पोल वॉलट ही क्रीडा स्पर्धा एकत्र होतील. स्पर्धेच्या बदललेल्या तारखांची नोंद सर्व क्रीडा शिक्षकांनी घ्यावी, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे. 00000

भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2022-2023 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (ज्वारी बाजरी व मका) खरेदी पुर्व तयारी करीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक 15 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. सांगली जिल्ह्यात विष्णु आण्णा ख. वि. संघ, सांगली/जत, कवठेमहांकाळ तालुका ख.वि.संघ, कवठेमहांकाळ, ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह ख. वि. संघ, तासगाव, खानापुर तालुका ख. वि. संघ, खानापुर, डॉ. पतंगराव कदम शेतकरी सह. ख. वि. संघ, पलुस, कृषी उत्पन्न बाजार समिती,आटपाडी या सात खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणीसाठी चालु हंगामातील पिक पेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात बारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचे आहेत. चालु हंगामात मका पिकासाठी रक्कम 1 हजार 962 रूपये आधारभूत किंमत जाहीर झाली असून शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी. मका खरेदी करीता कालावधी दि. 1 नोव्हेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 असा आहे. अधिक माहितीसाठी 0233/2670820 व मो. नं 8108182941 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. 00000

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- गोवर रुबेला या साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी बालकांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात यावे, यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण करावे, लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय तसेच खासगी आरोग्य यंत्रणांनी संशयित गोवर रूग्णांचे त्वरित रिपोर्टिंग करणे बंधनकारक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. गोवर रुबेला लसीकरण, उद्रेक सर्व्हेक्षण, व्यवस्थापन आणि उपाय योजना याबाबत समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. शिषीर मिरगुंडे आदि उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गोवर रूबेलाचा उद्रेक राज्यभरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सिव्हील हॉस्पीटल सांगली व सिव्हील हॉस्पीटल मिरज येथे प्रत्येकी 20 बेड्सची स्वतंत्र व्यवस्था करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण आरोग्य केंद्रामध्येही स्वतंत्र बेड्स ठेवावेत. याबरोबरच ताप आलेल्या रूग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र ओपीडीची व्यवस्था करावी. गोवर रूबेलाच्या रूग्णांवर उपचारासाठी कॉमन ट्रिटमेंट प्रोटोकॉल तयार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. गोवर रूबेलाच्या रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा औषधांची तजवीज आरोग्य विभागाने ठेवावी. या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी शाळा, अंगणवाडी, आशा वर्कर्स या सर्व यंत्रणा गतीमान कराव्यात. योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास रूग्ण लवकर बरा होतो. या साथीवर लसीकरण हा प्रभावी उपचार असल्याने गोवर रूबेला लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्या, दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची यादी आशा वर्कर्सकडे सोपविण्यात यावी. त्यांनी अशा सर्व संबंधितांचा पाठपुरावा करावा. ऊसतोड कामगार, स्थलांतरीत कामगार यांच्या बालकांच्या तपासणी, सर्व्हेक्षणासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करावीत. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गोवर रूबेलाच्या साथीला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहिम मिशन मोडवर राबवावी. त्यासाठी अंगणवाडी, शाळा यांची मदत घ्यावी. ओपीडी व विशेष सर्व्हेक्षणामधून जे संशयित रूग्ण आढळतात त्यांची माहिती तालुका व जिल्हास्तरावर देण्यात यावी. संशयित रूग्णांच्या सर्व्हेक्षणामधून तपासणी मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवावी. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात गोवर रूबेला लसीचा 64.95 टक्के बालकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 63 टक्के बालकांनी दुसरा डोस घेतला आहे. सर्व बालकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत यासाठी पालकांची जनजागृती करावी व लसीकरण मोहिम ‍मिशन मोडवर राबवावी. हॉटस्पॉटची निश्चिती करावी. शीघ्रप्रतिसाद पथके स्थापन करावीत. ताप आणि पुरळ आलेल्या रूग्णांचे सर्व्हेक्षण गतीमान करावे. सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिक्षण व लोकसहभाग यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील गोवर रूबेला रूग्णस्थिती, प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपायायोजना याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिला. 00000

वन्यप्राणी नागरी वस्तीत आढळून आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा वनविभागाचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- वन्यप्राणी नागरी वस्तीत अथवा शेतपिकात आढळून आल्यास अशा वन्य प्राण्यास सुरक्षितरित्या पकडून त्याच्या अधिवासात सोडणे सुलभ व्हावे यासाठी वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी यु. एस. पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतीच्या कामांमध्ये द्राक्ष बागांची छाटणी, ऊसाची कापणी, इत्यादी कामे सुरु आहेत. वन्यप्राणी बाहेर पडत असल्याने ते विहीरीत पडणे, नागरी वस्तीमध्ये शिरणे, किंवा जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास त्वरीत माहिती द्यावी. सांगली वनपरिक्षेत्र अंतर्गत मिरज एमआयडीसी मधील गोदरेज कंपनी जवळील परिसरात दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी सांबर हा वन्यप्राणी आल्याची माहिती मिळताच वन विभागामार्फत पहाणी केली. सांबर हा वन्यप्राणी असल्याची खात्री झाल्यानंतर सदर वन्यप्राण्यास मानवी अथवा इतर कोणत्याही श्वान प्राण्याकडून कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेवून बंदोबस्त करण्यात आला. हा वन्यप्राणी मानवी हस्तक्षेपामुळे कुपवाड नागरी वस्तीत गेल्यामुळे हा वन्यप्राणी यापुर्वी भारत सुत गिरणी नावांने असणाऱ्या कुंपणामधील जागेत गेल्याने त्याच्यावर दिनांक 2 डिसेंबर पासून 5 दिवस निगरानी ठेवण्यात आली होती. दि. 6 डिसेंबर रोजी बोमा या पध्दतीचा वापर करुन दि. 7 डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडील अत्याधुनीक वाहनामध्ये बंदीस्त करण्यास यश आले. या वन्य प्राण्याची वैद्यकिय तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येत आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यु.एस. पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, पापा पाटील, वनपाल तुषार भोरे, राजेंद्र नाईक, शशीकांत नागरगोजे, वनरक्षक सागर थोरवत, भिवा कोळेकर, दादा बजबळकर, दत्तात्रय भोसले, सौ.राजमाने, सौ. सातपूते व सर्व वनमजूर व डब्ल्यूआरसी संघटनेचे पदाधिकारी इत्यादींनी या कार्यवाहीत महत्वाची भुमिका बजावली. 00000

ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य भावनेतून सहभागी व्हा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली दि. ७ (जि.मा.का.) :- सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कामाचे मूल्य होऊ शकत नाही. सैनिकांनी बजावलेली देश सेवा व कर्तव्याप्रती आदर राखून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी केले. ध्वजदिन निधी संकलन 2022 या शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरीक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, किर्तीचक्र विजेते प्रकाश नवले, निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उद्योग अधिकारी संतोष गवळी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांच्यासह शासकीय अधिकारी,माजी सैनिक उपस्थित होते. वीर जवानांना अभिवादन व उपस्थितांना ध्वज दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, माजी सैनिक हा नेहमी सैनिकच असतो. देशसेवा, कर्तव्य तत्परतेच्या भावनेतून कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असणाऱ्या सैनिकांना समाजात कृतज्ञतेच्या भावनेतून आपलेपणा व आदर देणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, पाल्य यांना आवश्यक आर्थिक मदत करता यावी यासाठी ध्वज दिन निधी संकलन केले जात आहे. यावर्षी सांगली जिल्ह्यास १ कोटी 42 लाख 29 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्याला मोठी सैनिकी पंरपरा लाभली असून सैनिकांसाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळाबरोबरच तालुका स्तरावरील मंडळांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न, समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. श्री. वालवडकर म्हणाले, सैनिक निवृत्त होत नसून केवळ त्याचा पोषाख बदलतो. देश सेवेसाठी समर्पण देणारा हा घटक आहे. कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यासाठी माजी सैनिक तत्पर असल्याने प्रशासनाने त्यांच्या सेवेचा उपयोग करुन घ्यावा. तसेच माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक असावी. माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये आवश्यक तेथे माजी सैनिकांची मदत घेतली जाईल. तसेच माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक दरबार सारखे उपक्रम राबविले जातील असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती चौगुले-बर्डे यांनी सांगितले. सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. फाटक यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात ध्वज दिन निधी संकलनाबाबत माहिती दिली. गतवर्षी सांगली जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात होते यामध्ये जिल्ह्याचे 87.69 टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात आले असून त्याची पुर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा व दानशूर व्यक्तीनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. वीरगती प्राप्त सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येऊन गतवर्षी ध्वज दिन निधी संकलनामध्ये उल्लेखनीय कामगीरी केलेल्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 000000

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी 41 बालके मुंबईकडे रवाना

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 41 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून ही बालके आज शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन स्वतंत्र बसमधून त्यांच्या पालकासह एस. आर. सी. सी. रूग्णालय मुंबईकडे रवाना झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बस मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गावोगावी अंगणवाडी सेविकांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे डी.ई.आय.सी. मधील दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पुनश्च: अशाच प्रकारचे अंगणवाडी सेविका व आशा यांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन सुरू आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. सिव्हील रूग्णालय सांगली येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. कल्याणी शिंदगी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहाय्य्क अनिता हसबनीस व संदीप मनोळी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व बालकांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 2013-14 पासून 1 हजार 274 बालकांवर हृदय रोग शस्त्रक्रिया तर 10 हजार 893 लाभार्थी बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा सातत्याने राज्यस्तरावर अग्रस्थानी आहे. सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यास तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी आज पाठविण्यात आलेल्या जिल्ह्यातील 41 बालकांमध्ये मिरज तालुक्यातील 2, कवठेमहांकाळ 2, जत 11, आटपाडी 3, कडेगाव 1, खानापूर 3, पलूस 6, तासगाव 3, वाळवा 4, शिराळा 3 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 3 बालकांचा समावेश आहे. या बालकांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून यासाठी सुमारे दोन कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च क्विन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व रोटरी क्लब ऑफ मुंबई, इतर धर्मादाय संस्था आणि दानशुरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 00000

रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 सरपंच पदासाठी 2 हजार 418 तर सदस्य पदासाठी 14 हजार 24 अर्ज वैध

ग् सांगली दि. 6 (जि. मा. का.) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी सरपंच पदासाठी २ हजार ४१८ अर्ज आणि सदस्य पदासाठी 14 हजार 24 अर्ज वैध ठरले आहेत. तर सरपंच पदासाठीचे 15 अर्ज आणि सदस्य पदासाठीचे 118 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाली असून छाननीनंतर वैध ठरलेल्या अर्जांची माहिती अशी... मिरज तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या ९९ प्रभागात २८८ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १५० तर सदस्य पदासाठी ९८१ अर्ज वैध झाले आहेत. अप्पर तहसील सांगली मध्ये ११ ग्रामपंचायतींच्या ५५ प्रभागात १६४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ६८ तर सदस्य पदासाठी ५८६ अर्ज वैध झाले आहेत. तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ९६ प्रभागात २८८ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १५० तर सदस्य पदासाठी ८६१ अर्ज वैध झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या ९९ प्रभागात २७० जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १६६ तर सदस्य पदासाठी १ हजार २ अर्ज वैध झाले आहेत. जत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या २७४ प्रभागात ८२८ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ३८९ तर सदस्य पदासाठी २ हजार २४ अर्ज वैध झाले आहेत. खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या १४३ प्रभागात ४२४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १९७ तर सदस्य पदासाठी ९६२ अर्ज वैध झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या ८२ प्रभागात २५४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १४४ तर सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध झाले आहेत. पलूस तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या ६३ प्रभागात १८६ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १३४ तर सदस्य पदासाठी ७६७ अर्ज वैध झाले आहेत. कडेगांव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या १४७ प्रभागात ४४० जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी २५३ तर सदस्य पदासाठी १ हजार २९२ अर्ज वैध झाले आहेत. वाळवा तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या २६२ प्रभागात ७८४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ३३९ तर सदस्य पदासाठी २ हजार ४१३ अर्ज वैध झाले आहेत. अप्पर तहसील आष्टा मध्ये १९ ग्रामपंचायतींच्या ७३ प्रभागात २२६ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १०५ तर सदस्य पदासाठी ७४२ अर्ज वैध झाले आहेत. शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या १९५ प्रभागात ५६४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ३२३ तर सदस्य पदासाठी १ हजार ५४८ अर्ज वैध झाले आहेत. अवैध नामनिर्देशन पत्रामध्ये मिरज तालुक्यात सदस्य पदाचे १३ अर्ज, अप्पर सांगलीमध्ये सरपंच पदाचा १ व सदस्य पदाचे ७, तासगाव तालुक्यात सरपंच पदाचे ५ व सदस्य पदाचे 11, कवठेमहांकाळ तालुक्यात सरपंच पदाचा १ सदस्य पदाचे २ , जत तालुक्यात सरपंच पदाचे ३ सदस्य पदाचे २० , खानापूर तालुक्यात सरपंच पदाचे २ सदस्य पदासाठी १० , आटपाडी तालुक्यात सदस्य पदाचे ४, पलूस तालुक्यात सदस्य पदासाठी ३ , कडेगाव तालुक्यात सदस्य पदासाठी ७ , वाळवा तालुक्यात सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी १७, अपर आष्टा मध्ये सरपंच पदासाठी १ सदस्य पदासाठी ७ आणि शिराळा तालुक्यात सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी १७ अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. ०००००

शिष्यवृत्तीच्या लाभासाठी बँक तपशील सादर करा

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2021-22 या वर्षात इयत्ता 1 ली ते 10 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्ग केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झालेली नाही त्यांची यादी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे उपलब्ध करण्यात आली आहे. अशा विद्यार्थी व शाळांनी तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाकडे संपर्क साधून अचूक बँक खाते तपशील दि. 13 डिसेंबर 2022 अखेर तात्काळ जमा करावा जेणेकरून त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल व कोणीही शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी कळविले आहे. 00000

नेहरू युवा केंद्राकडील पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्ह्यातील युवा मंडळांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 या वर्षीच्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी नेहरू युवा केंद्रामार्फत 20 डिसेंबर पर्यंत प्रस्तावाची मागणी करण्यात आली असून इच्छुक युवा मंडळांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन नेहरू युवा केंद्रामार्फत करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत युवा मंडळांनी केलेल्या कुटुंब कल्याण, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, महिला सक्षमीकरण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, सामाजिक समस्या व स्थानिक प्रश्नांचे निराकरण, ग्रामीण स्वच्छता या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. रूपये 25 हजार व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मागील दोन वर्षात ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते या वर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. विहीत नमुन्यातील अर्जासाठी व जिल्हास्तरीय पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, भारती विद्यापीठ भवन दुसरा मजला राजवाडा चौक, सांगली येथे संपर्क साधावा. 000000

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचाराने यंत्रणा व प्रसार माध्यमांनी शासकीय योजनांच्या प्रसिद्धीत योगदान द्यावे समता पर्वानिमित्त आयोजित कार्यशाळेत वक्त्यांचा सूर

सांगली दि. 2 (जि.मा.का.) :- शासनाच्या लोककल्याणाच्या योजनांची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचारानुसार शासकीय यंत्रणा आणि प्रसार माध्यमांनी एकत्रित येऊन जनकल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावे, असा सूर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत वक्त्यांनी व्यक्त केला. समता पर्वा निमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. कार्यशाळेस दैनिक लोकमत, सांगलीचे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार, विविध महामंडळांचे व्यवस्थापक यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. नागे म्हणाले, शासनाच्या जनकल्याणाच्या योजना तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी यंत्रणेने अधिक लोकाभिमुख होऊन योजनांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने ज्या उदात्त हेतू, विचाराने योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ त्या-त्या घटकला होणे गरजेचे आहे. ज्या घटकांसाठी योजना सुरु केली त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती गेली नाही तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. यासाठी शासकीय विभागांनी प्रसार माध्यमांच्या सहायाने योजना सर्वदूर पोहचवून पात्र लाभार्थी त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. केंद्र व राज्य शासन वंचित घटकांसाठी अनेक योजना उपक्रम राबवित असते. या योजनांची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागामार्फत केली जात असल्याने विभागाने या उपेक्षित लोकांचे मातृत्व स्वीकारुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची बांधिलकी जपणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय विभागाने योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टिने गौरवाची बाब असून यामुळे जात वैधता पडताळणी, शिष्यवृत्ती योजनेसह अन्य योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आल्याचे दिसून येते. यापुढेही सामाजिक न्याय विभागाने शासन योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांचा अधिकाधिक उपयोग करुन घ्यावा. सामाजिक न्याय विभागाने आज आयोजित केलेली कार्यशाळा हा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजमाध्यमांप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यासांठीही यापुढे असे उपक्रम घेऊन सामाजिक न्यायात आणखी एक पाऊल पुढे उचलावे, अशी अपेक्षाही श्री. नागे यांनी व्यक्त केली. श्रीमती पाटोळे म्हणाल्या, सामाजिक न्याय विभागाच्या योजना त्या-त्या लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक गतीमान होण्याबरोबरच योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी माध्यमांचीही संवेदनशीलता वाढणे आवश्यक आहे. लोकांमध्ये आपलेपणा निर्माण होण्यासाठी यंत्रणांनी आपल्या विभागाच्या योजनांची प्रसार माध्यमांच्यामार्फत व्यापक जनजागृती करण्यासाठी पुढे यावे. परस्परात संवाद व समन्वय ठेवण्यासाठी अशा कार्यशाळा नियमित व्हाव्यात. कार्यशाळा, परिसंवादातून यंत्रणा व प्रसार माध्यमांमध्ये संवाद निर्माण होऊन योजनांच्या अंमलबजावणीसाठी वेगळी दिशा मिळू शकते. आपली गुणवत्ता अधिक सुधारुन योजनांची प्रचार प्रसिध्दी होऊन योजना लाभार्थी पर्यंत पोहचविता येतात. श्री. चाचरकर यांनी समता पर्वात सामाजिक न्याय विभाग राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक न्याय विभागामार्फत वंचित घटकाचे जीवनमान उंचाविण्यासाठी काम होत असून उपेक्षित व वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. श्री. कामत यांनी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. समता पर्वात योजनांची अधिक प्रसिद्धी करण्यात येत असून विभागाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारले असून योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्याचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने योजनांच्या अंमलबाजवणीमध्ये आणि पत्रकारांनी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्र येऊन काम केल्यास शासनाच्या जनकल्याणाच्या योजनेतून सामाजिक न्याय अधिक वृध्दींगत होईल अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार वसंत आपटे यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केली. सामाजिक न्यायासाठी संघर्ष करावालागू नये यासाठी शासनाच्या जनकल्याणाच्या योजनांच्या प्रसारासाठी शासकीय विभागानी योजनांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांच्या प्रभावी वापर करावा. सामाजिक न्याय विभागाने प्रसार माध्यमांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा स्तुत्य उपक्रम असून यापुढे अशा उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहचून त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संत रोहिदास मंडळाचे व्यवस्थापक अमोल शिंदे, महाराष्ट्र राज्य वित्त व दिव्यांग विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अश्विनी पाटील, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाचे व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक बसवराज कुंभार यांनी महामंडळाकडील योजनांची माहिती कार्यशाळेत दिली. प्रारंभी सहायक ग्रंथपाल भाईदास जाधव यांनी स्वागत केले. 00000

लम्पी चर्मरोगाच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरावर कॉल सेंटर सुरू

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : लम्पी चर्मरोग संदर्भात जनावरांची आरोग्य तपासणी, उपचार व लसीकरण संदर्भात शेतकऱ्यांनी 0233-2375108 या नंबरवर कॉल सेंटरसी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लम्पी चर्मरोगाची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर लम्पी चर्मरोग कॉल सेंटर सुरू केले आहे. 00000

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 3 व 4 डिसेंबर रोजीच्या विशेष शिबीराचा लाभ घ्या - जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 असून शनिवार, दि. 3 डिसेंबर व रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेचा 282 सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 282 सांगली विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केले आहे. शनिवार, दि. 3 डिसेंबर व रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावरती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंद कदण्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून संबंधित मतदान केंद्रावरती जमा करावा. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी फॉर्म नंबर 7 भरावा. ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये नावात दुरूस्ती किंवा पत्ता बदल करावयाचा असेल तर त्या मतदारांनी फॉर्म नंबर 8 भरावा. तसेच मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी फॉर्म 6ब भरून आपल्या परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. तसेच NVSP.IN या वेबसाईट वरून ऑनलाईन पध्दतीनेही फॉर्म भरू शकतो. 00000

शेतकऱ्यांनी माती परिक्षण करून घ्यावे - वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी

अटल भूजल योजनेंतर्गत झुरेवाडी येथे माती परिक्षण सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जल सुरक्षा आराखड्यामध्ये सूचविल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुक्ष्म सिंचनाचा वापर करावा तसेच जमिनीतील घटकांची कमतरता भरुन काढण्याकरीता सुक्ष्म सिंचनाव्दारे खतांची मात्रा देता येते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन घ्यावे. सूक्ष्म सिंचनासाठी अटल भूजल योजनेमधून 25 व 30 टक्के वाढीव अनुदान देण्यात येते. अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी दिली. वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांच्या मार्गदर्शनानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे झुरेवाडी येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माती परिक्षण करण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिक्षणाकरीता माती नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक व उपाययोजना याबाबत कृषि विभागाचे श्री. मुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुमन साठे, कृषि सहाय्यक धीरज गिरी, ज्येष्ठ नागरीक सर्जेराव देशमुख, पोलीस पाटील अनुराधा जाधव, ग्रामपंचायत सदस्य शोभा माळी, कृषि मित्र गणेश झुरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ञ कुणाल शितोळे, कृषि तज्ञ नागनाथ पाटील, जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेच्या अंजली वाघे, कु. देवकुळे, पियुष कुंभार, ज्ञानेश्वर सरडे, कु. तनुजा मोरे, अभिषेक पाटील व गावातील शेतकरी उपस्थित होते. जागतिक बँक व केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यातील 95 गावांमध्ये राबविण्यात येत असून भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी बचतीच्या उपाययोजना अवलंब करुन पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मातीतील घटक तपासून मातीची गुणवत्ता चांगली राखण्याकरीता मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय, पदार्थ, मातीचा सामू इत्यादी बाबी तपासून घेवून त्यानुसार उपाय योजना करता याव्यात हा उद्देश माती परिक्षणाचा आहे. 00000

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा 3 डिसेंबरला

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्ह्यातील विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा दि. 3 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रिडा संकुल, कृपामयी हॉस्पीटल समोर मिरज येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते दि. 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित राहणार असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल व जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 2 ते 16 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 2 डिसेंबर 2022 रोजीचे 09.30 वाजल्यापासून ते दि. 16 डिसेंबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

जत पूर्व भागाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला दौरा

सांगली दि. 1 (जि.मा.का.) : जत पूर्व भागातील विविध मागण्यांसाठी अनेक गावांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून यातील काही गावांचा दौरा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज जत, मायथळ, व्हसपेठ, गुड्डापूर, तिकोंडी, बालगांव, उमदी या गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, त्यांचे विषय, त्यांच्या मागण्या समजून घेतले. सदर गावांमधील लोकांच्या विविध समस्या, विविध मागण्या योग्य त्या ठिकाणी लवकरात लवकर मांडण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 00000

प्रभात फेरीव्दारे एड्स जनजागृती

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही. (एड्स) प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल सांगली) येथून प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उपस्थितांना एड्स विरोधी शपथ देवून प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रम प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, खेलो इंडिया गेम्समध्ये वेटलिफटींगमध्ये गोल्ड मेडल प्राप्त खेळाडू काजल सरगर, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच 16 महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेटची लक्षणीय उपस्थिती होती. प्रभात फेरीची सुरूवात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथून करण्यात आली ही प्रभात फेरी पुढे आंबेडकर रोड - एसटी स्टँड- शिवाजी मंडई - हरभट रोड - राजवाडा चौक मार्गे पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक सांगली येथे प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी एचआयव्ही प्रतिबंधाकरिता सर्व उपस्थितांना शपथ दिली. 00000

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्यास परवानगी

सांगली दि. 1 (जि.मा.का.) :- ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकारे कळविले आहे. 00000