बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- गोवर रुबेला या साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी बालकांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात यावे, यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण करावे, लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय तसेच खासगी आरोग्य यंत्रणांनी संशयित गोवर रूग्णांचे त्वरित रिपोर्टिंग करणे बंधनकारक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. गोवर रुबेला लसीकरण, उद्रेक सर्व्हेक्षण, व्यवस्थापन आणि उपाय योजना याबाबत समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. शिषीर मिरगुंडे आदि उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गोवर रूबेलाचा उद्रेक राज्यभरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सिव्हील हॉस्पीटल सांगली व सिव्हील हॉस्पीटल मिरज येथे प्रत्येकी 20 बेड्सची स्वतंत्र व्यवस्था करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण आरोग्य केंद्रामध्येही स्वतंत्र बेड्स ठेवावेत. याबरोबरच ताप आलेल्या रूग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र ओपीडीची व्यवस्था करावी. गोवर रूबेलाच्या रूग्णांवर उपचारासाठी कॉमन ट्रिटमेंट प्रोटोकॉल तयार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. गोवर रूबेलाच्या रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा औषधांची तजवीज आरोग्य विभागाने ठेवावी. या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी शाळा, अंगणवाडी, आशा वर्कर्स या सर्व यंत्रणा गतीमान कराव्यात. योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास रूग्ण लवकर बरा होतो. या साथीवर लसीकरण हा प्रभावी उपचार असल्याने गोवर रूबेला लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्या, दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची यादी आशा वर्कर्सकडे सोपविण्यात यावी. त्यांनी अशा सर्व संबंधितांचा पाठपुरावा करावा. ऊसतोड कामगार, स्थलांतरीत कामगार यांच्या बालकांच्या तपासणी, सर्व्हेक्षणासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करावीत. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गोवर रूबेलाच्या साथीला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहिम मिशन मोडवर राबवावी. त्यासाठी अंगणवाडी, शाळा यांची मदत घ्यावी. ओपीडी व विशेष सर्व्हेक्षणामधून जे संशयित रूग्ण आढळतात त्यांची माहिती तालुका व जिल्हास्तरावर देण्यात यावी. संशयित रूग्णांच्या सर्व्हेक्षणामधून तपासणी मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवावी. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात गोवर रूबेला लसीचा 64.95 टक्के बालकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 63 टक्के बालकांनी दुसरा डोस घेतला आहे. सर्व बालकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत यासाठी पालकांची जनजागृती करावी व लसीकरण मोहिम ‍मिशन मोडवर राबवावी. हॉटस्पॉटची निश्चिती करावी. शीघ्रप्रतिसाद पथके स्थापन करावीत. ताप आणि पुरळ आलेल्या रूग्णांचे सर्व्हेक्षण गतीमान करावे. सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिक्षण व लोकसहभाग यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील गोवर रूबेला रूग्णस्थिती, प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपायायोजना याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा