बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

वन्यप्राणी नागरी वस्तीत आढळून आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा वनविभागाचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- वन्यप्राणी नागरी वस्तीत अथवा शेतपिकात आढळून आल्यास अशा वन्य प्राण्यास सुरक्षितरित्या पकडून त्याच्या अधिवासात सोडणे सुलभ व्हावे यासाठी वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी यु. एस. पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतीच्या कामांमध्ये द्राक्ष बागांची छाटणी, ऊसाची कापणी, इत्यादी कामे सुरु आहेत. वन्यप्राणी बाहेर पडत असल्याने ते विहीरीत पडणे, नागरी वस्तीमध्ये शिरणे, किंवा जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास त्वरीत माहिती द्यावी. सांगली वनपरिक्षेत्र अंतर्गत मिरज एमआयडीसी मधील गोदरेज कंपनी जवळील परिसरात दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी सांबर हा वन्यप्राणी आल्याची माहिती मिळताच वन विभागामार्फत पहाणी केली. सांबर हा वन्यप्राणी असल्याची खात्री झाल्यानंतर सदर वन्यप्राण्यास मानवी अथवा इतर कोणत्याही श्वान प्राण्याकडून कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेवून बंदोबस्त करण्यात आला. हा वन्यप्राणी मानवी हस्तक्षेपामुळे कुपवाड नागरी वस्तीत गेल्यामुळे हा वन्यप्राणी यापुर्वी भारत सुत गिरणी नावांने असणाऱ्या कुंपणामधील जागेत गेल्याने त्याच्यावर दिनांक 2 डिसेंबर पासून 5 दिवस निगरानी ठेवण्यात आली होती. दि. 6 डिसेंबर रोजी बोमा या पध्दतीचा वापर करुन दि. 7 डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडील अत्याधुनीक वाहनामध्ये बंदीस्त करण्यास यश आले. या वन्य प्राण्याची वैद्यकिय तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येत आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यु.एस. पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, पापा पाटील, वनपाल तुषार भोरे, राजेंद्र नाईक, शशीकांत नागरगोजे, वनरक्षक सागर थोरवत, भिवा कोळेकर, दादा बजबळकर, दत्तात्रय भोसले, सौ.राजमाने, सौ. सातपूते व सर्व वनमजूर व डब्ल्यूआरसी संघटनेचे पदाधिकारी इत्यादींनी या कार्यवाहीत महत्वाची भुमिका बजावली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा