गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

चला जाणुया नदीला अभियानातंर्गत जिल्हास्तरावर समिती गठीत

चला जाणुया नदीला अभियानात लोकसहभाग वाढवावा.... जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यात गतीने आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा असून नदीच्या आरोग्याबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी समिती सदस्यांसह सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले. चला जाणुया नदीला अभियान जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस उप वनसंरक्षक तथा जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव नीता कट्टे यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी व नदी समन्वयक उपस्थित होते. चला जाणुया नदीला अभियानात जिल्ह्यातील कृष्णा, तिळगंगा, अग्रणी, महांकाली, येरळा आणि माणगंगा या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. जलसाक्षरतेसाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या अभियानामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी यंत्रणांनी अभियानाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी. नदीच्या बाबतीत समाज सजग व्हावा यासाठी लोकप्रबोधन करावे. जिल्ह्यात चला जाणुया नदीला अभियानाच्या यशस्वीतेसाठी नदी समन्वयकांसाठी आवश्यक माहिती कार्यान्विन यंत्रणांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच अभियान राबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. उप वनसंरक्षक तथा जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव श्रीमती नीता कट्टे यांनी जिल्हास्तरीय समिती आणि अभियानाबाबत माहिती दिली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा