बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य भावनेतून सहभागी व्हा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली दि. ७ (जि.मा.का.) :- सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कामाचे मूल्य होऊ शकत नाही. सैनिकांनी बजावलेली देश सेवा व कर्तव्याप्रती आदर राखून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी केले. ध्वजदिन निधी संकलन 2022 या शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरीक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, किर्तीचक्र विजेते प्रकाश नवले, निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उद्योग अधिकारी संतोष गवळी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांच्यासह शासकीय अधिकारी,माजी सैनिक उपस्थित होते. वीर जवानांना अभिवादन व उपस्थितांना ध्वज दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, माजी सैनिक हा नेहमी सैनिकच असतो. देशसेवा, कर्तव्य तत्परतेच्या भावनेतून कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असणाऱ्या सैनिकांना समाजात कृतज्ञतेच्या भावनेतून आपलेपणा व आदर देणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, पाल्य यांना आवश्यक आर्थिक मदत करता यावी यासाठी ध्वज दिन निधी संकलन केले जात आहे. यावर्षी सांगली जिल्ह्यास १ कोटी 42 लाख 29 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्याला मोठी सैनिकी पंरपरा लाभली असून सैनिकांसाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळाबरोबरच तालुका स्तरावरील मंडळांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न, समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. श्री. वालवडकर म्हणाले, सैनिक निवृत्त होत नसून केवळ त्याचा पोषाख बदलतो. देश सेवेसाठी समर्पण देणारा हा घटक आहे. कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यासाठी माजी सैनिक तत्पर असल्याने प्रशासनाने त्यांच्या सेवेचा उपयोग करुन घ्यावा. तसेच माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक असावी. माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये आवश्यक तेथे माजी सैनिकांची मदत घेतली जाईल. तसेच माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक दरबार सारखे उपक्रम राबविले जातील असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती चौगुले-बर्डे यांनी सांगितले. सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. फाटक यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात ध्वज दिन निधी संकलनाबाबत माहिती दिली. गतवर्षी सांगली जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात होते यामध्ये जिल्ह्याचे 87.69 टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात आले असून त्याची पुर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा व दानशूर व्यक्तीनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. वीरगती प्राप्त सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येऊन गतवर्षी ध्वज दिन निधी संकलनामध्ये उल्लेखनीय कामगीरी केलेल्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा