मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी 41 बालके मुंबईकडे रवाना

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 41 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून ही बालके आज शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन स्वतंत्र बसमधून त्यांच्या पालकासह एस. आर. सी. सी. रूग्णालय मुंबईकडे रवाना झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बस मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गावोगावी अंगणवाडी सेविकांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे डी.ई.आय.सी. मधील दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पुनश्च: अशाच प्रकारचे अंगणवाडी सेविका व आशा यांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन सुरू आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. सिव्हील रूग्णालय सांगली येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. कल्याणी शिंदगी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहाय्य्क अनिता हसबनीस व संदीप मनोळी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व बालकांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 2013-14 पासून 1 हजार 274 बालकांवर हृदय रोग शस्त्रक्रिया तर 10 हजार 893 लाभार्थी बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा सातत्याने राज्यस्तरावर अग्रस्थानी आहे. सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यास तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी आज पाठविण्यात आलेल्या जिल्ह्यातील 41 बालकांमध्ये मिरज तालुक्यातील 2, कवठेमहांकाळ 2, जत 11, आटपाडी 3, कडेगाव 1, खानापूर 3, पलूस 6, तासगाव 3, वाळवा 4, शिराळा 3 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 3 बालकांचा समावेश आहे. या बालकांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून यासाठी सुमारे दोन कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च क्विन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व रोटरी क्लब ऑफ मुंबई, इतर धर्मादाय संस्था आणि दानशुरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा