शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचाराने यंत्रणा व प्रसार माध्यमांनी शासकीय योजनांच्या प्रसिद्धीत योगदान द्यावे समता पर्वानिमित्त आयोजित कार्यशाळेत वक्त्यांचा सूर

सांगली दि. 2 (जि.मा.का.) :- शासनाच्या लोककल्याणाच्या योजनांची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचारानुसार शासकीय यंत्रणा आणि प्रसार माध्यमांनी एकत्रित येऊन जनकल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावे, असा सूर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत वक्त्यांनी व्यक्त केला. समता पर्वा निमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. कार्यशाळेस दैनिक लोकमत, सांगलीचे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार, विविध महामंडळांचे व्यवस्थापक यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. नागे म्हणाले, शासनाच्या जनकल्याणाच्या योजना तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी यंत्रणेने अधिक लोकाभिमुख होऊन योजनांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने ज्या उदात्त हेतू, विचाराने योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ त्या-त्या घटकला होणे गरजेचे आहे. ज्या घटकांसाठी योजना सुरु केली त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती गेली नाही तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. यासाठी शासकीय विभागांनी प्रसार माध्यमांच्या सहायाने योजना सर्वदूर पोहचवून पात्र लाभार्थी त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. केंद्र व राज्य शासन वंचित घटकांसाठी अनेक योजना उपक्रम राबवित असते. या योजनांची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागामार्फत केली जात असल्याने विभागाने या उपेक्षित लोकांचे मातृत्व स्वीकारुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची बांधिलकी जपणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय विभागाने योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टिने गौरवाची बाब असून यामुळे जात वैधता पडताळणी, शिष्यवृत्ती योजनेसह अन्य योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आल्याचे दिसून येते. यापुढेही सामाजिक न्याय विभागाने शासन योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांचा अधिकाधिक उपयोग करुन घ्यावा. सामाजिक न्याय विभागाने आज आयोजित केलेली कार्यशाळा हा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजमाध्यमांप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यासांठीही यापुढे असे उपक्रम घेऊन सामाजिक न्यायात आणखी एक पाऊल पुढे उचलावे, अशी अपेक्षाही श्री. नागे यांनी व्यक्त केली. श्रीमती पाटोळे म्हणाल्या, सामाजिक न्याय विभागाच्या योजना त्या-त्या लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक गतीमान होण्याबरोबरच योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी माध्यमांचीही संवेदनशीलता वाढणे आवश्यक आहे. लोकांमध्ये आपलेपणा निर्माण होण्यासाठी यंत्रणांनी आपल्या विभागाच्या योजनांची प्रसार माध्यमांच्यामार्फत व्यापक जनजागृती करण्यासाठी पुढे यावे. परस्परात संवाद व समन्वय ठेवण्यासाठी अशा कार्यशाळा नियमित व्हाव्यात. कार्यशाळा, परिसंवादातून यंत्रणा व प्रसार माध्यमांमध्ये संवाद निर्माण होऊन योजनांच्या अंमलबजावणीसाठी वेगळी दिशा मिळू शकते. आपली गुणवत्ता अधिक सुधारुन योजनांची प्रचार प्रसिध्दी होऊन योजना लाभार्थी पर्यंत पोहचविता येतात. श्री. चाचरकर यांनी समता पर्वात सामाजिक न्याय विभाग राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक न्याय विभागामार्फत वंचित घटकाचे जीवनमान उंचाविण्यासाठी काम होत असून उपेक्षित व वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. श्री. कामत यांनी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. समता पर्वात योजनांची अधिक प्रसिद्धी करण्यात येत असून विभागाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारले असून योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्याचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने योजनांच्या अंमलबाजवणीमध्ये आणि पत्रकारांनी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्र येऊन काम केल्यास शासनाच्या जनकल्याणाच्या योजनेतून सामाजिक न्याय अधिक वृध्दींगत होईल अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार वसंत आपटे यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केली. सामाजिक न्यायासाठी संघर्ष करावालागू नये यासाठी शासनाच्या जनकल्याणाच्या योजनांच्या प्रसारासाठी शासकीय विभागानी योजनांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांच्या प्रभावी वापर करावा. सामाजिक न्याय विभागाने प्रसार माध्यमांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा स्तुत्य उपक्रम असून यापुढे अशा उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहचून त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संत रोहिदास मंडळाचे व्यवस्थापक अमोल शिंदे, महाराष्ट्र राज्य वित्त व दिव्यांग विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अश्विनी पाटील, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाचे व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक बसवराज कुंभार यांनी महामंडळाकडील योजनांची माहिती कार्यशाळेत दिली. प्रारंभी सहायक ग्रंथपाल भाईदास जाधव यांनी स्वागत केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा