शनिवार, ३० एप्रिल, २०२२

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

जिल्ह्यातील एकही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री जयंत पाटील - 'आपले सरकार' ही भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी - जिल्ह्याच्या सर्वांगीण ‍विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य - शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर - सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : कोरोना महामारी, नैसर्गीक आपत्ती सारखे संकट झेलत महाराष्ट्र स्वाभिमानाने, कणखरपणे मार्ग काढत आहे. शासनाने गेल्या दोन अडीच वर्षात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटाची मालिका सुरू असतानाही सर्व आघाड्यांवर लढण्यात, सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्यात शासनाला यश आले आहे. हे सरकार 'आपले सरकार' असल्याची भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे, असे सांगून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा हा कृषि प्रधान जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य दिले असून शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवून सामाजिक एकोपा प्राणपणाने जपावा, असे कळकळीचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ठीक 8 वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषि, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळात कृषि, उद्योग, वने, आरोग्य, जलसंपदा आदि विभागांतर्गत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. गोरगरीब सर्वसामान्यांच्या मुलांना सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात जिल्ह्यात आपण अमुलाग्र बदल घडवत आहोत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मॉडेल स्कूल अभियान राबविण्यात येत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा हा महत्वाकांक्षी व नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील 176 शाळांमधून यशस्वीपणे राबविला आहे. सन 2022-23 मध्येही 156 ‍जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद शाळांमध्ये सायन्स पार्क निर्मिती करण्यासाठी भरीव निधी आपण दिला आहे. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळांचा कायापालट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमांतर्गत 35 सेवा विद्यार्थ्यांसाठी तर 70 सेवा शिक्षकांसाठी 1 मे 2022 पासून सुरू होत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रतिवर्षी बसणाऱ्या महापूराचा तडाखा लक्षात घेता आपत्ती निवारण यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच 2021 चा महापूर आला तरी महाप्रलय टाळण्यात आपल्याला यश आले आहे. पाटबंधारे विभागामार्फत पूरसंरक्षक भिंत बांधकाम, पूररेषा निश्चितीकरणाची कामे, विशेष दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. खानापूर, आटपाडी, तासगाव, जत येथे टेंभूचे क्षेत्र वाढविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीवरील क्षेत्र असे एकूण 2 लाख 64 हजार हेक्टर सिंचित क्षेत्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांमधून एकूण 33 हजार हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजनांद्वारे भिजविण्यात येत असून सद्य:स्थितीत आवर्तने चालू आहेत. या तीन उपसा सिंचन योजनांचा संकल्पीत वार्षिक पाणी वापर सुमारे 48 टीएमसी असून सद्य:स्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांद्वारे उचलून अवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान/मोठे तलाव पाण्याने भरुन दिले जात आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सन 2021-22 मध्ये या एका वर्षात टेंभू योजनेद्वारे 10 हजार 627 हेक्टर, ताकारी व म्हैसाळ योजनेद्वारे 4 हजार 557 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निमार्ण झालेली आहे. कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील परंतु लाभक्षेत्रालगतच्या गावांना सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांस 6 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यात आले असून त्याद्वारे अवर्षण प्रवण भागातील काही वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीत आहे. उजनी, वारणा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेर नियोजन केल्यामुळे आवर्षण ग्रस्त सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना लाभ होणार आहे. 57 हजार 475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सध्या सुरू असलेल्या उपसा सिंचन योजनेचे विद्युत देयके मोठ्या रक्कमेची येत असल्याने या योजना किफायतशिरपणे चालु राहण्यासाठी या योजना सौर उर्जावर चालवण्याचे नियोजन केले आहे.जलसंपदा विभागातील 14 हजार रिक्त जागा येत्या तीन वर्षात टप्याटप्याने भरल्या जातील. क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भूमीगत चर योजना तयार करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या अंतर्गत जिल्ह्यातील कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी 93 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी 80 टक्के निधी शासन व 20 टक्के निधी शेतकऱ्यांनी द्यावयाचा आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत द्राक्ष, केळी, ड्रॅगनफ्रुट, ॲव्होकॅडो या पिकांचा समावेश केला असून या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दर्जेदार सुविधा ‍मिळाव्यात यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कुपवाड़ वारणाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर हे हॉस्पिटल जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने लवकरच सुरु करण्यात येत आहे. जनतेच्या सहभागातून विविध ठिकाणी चौक सुशोभिकरण व मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यात आलेल्या आहेत. प्रथमच प्लास्टिकचा वापर केल्यामुळे रस्ते टिकाऊ झाले असून रस्त्यांचे आयुष्यमान वाढणार आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेला मान्यता मिळालेली असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे कुपवाड शहराचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ ॲन्ड केअर ट्रस्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे अद्ययावत असे कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार आहे. अल्पदरात सर्व नागरिकांना वैद्यकिय सुविधा मिळणार आहेत. विकासाची फळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी महाविकास आघाडी शासन अत्यंत दक्ष आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दोन वर्षाच्या काळात विविध वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत. त्यामुळे लाभार्थींची संख्याही वाढली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. गुणवंतांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा उद्योग पुरस्कारासाठी निवड झालेल्या इस्लामपूर येथील मे. व्यास एंटरप्रायजेसच्या मालक योगिता माळी, कुंडल येथील मे. राजनिलक इंडस्टीज चे मालक सचिन लाड यांचा अनुक्रम प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रूपये व वदितीय पुरस्कारासाठी 10 हजार रूपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. जिल्हा पुरवठा कार्यालये, तहसिल कार्यालय पुरवठा शाखा, अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय, परिमंडळ कार्यालय, विभागातील सर्व गोदामे व सर्व रास्त भाव दुकाने आयएसओ मानांकन मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पुरवठा विभाग तहसिल कार्यालय वाळवा, खानापूर कडेगाव गोदामपाल सिधू शिंदे, रावळी येथील रास्त भाव दुकानदार दौलत माळी यांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पीटीशनचे विजेते प्रथम क्रमांक प्राप्त क्रेडॉस इन्फा प्रा. लि., व्दितीय क्रमांक वेस्ट कार्ट, तृतीय क्रमांक स्पंदन प्रतिष्ठान, चतुर्थ आण्णासाहेब डांगे कॉलेज व पंचम क्रमांक प्राप्त आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन, स्मार्ट पी.एच.सी. उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. पोलिस विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलिस फौजदार संजय सनदी, पोलिस हवलदार अभिजीत धनगर, खडतर सेवेबद्दल पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार, उत्कृष्ट गुन्ह्याची उकल केल्याबद्दल सहायक पोलिस ‍निरीक्षक रविराज फडणीस, पोलिस ‍निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलिस हवलदार श्री. ढेंबरे, पोलिस नाईक श्री. पाटील, शिपाई श्री. निळे, सहायक पोलीस फौजदार सुभाष पाटील, पोलिस हवलदार संदीप मोरे, रमेश कोळी, कपील साळुंखे, पोलिस नाईक सचिन मोरे, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलिस फौजदार अनिल एैनापुरे, पोलिस नाईक दऱ्याप्पा बंडगर, सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दीसाठी सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलिस हवलदार एस. व्ही. कोळी, पोलिस नाईक के.के. कांबळे, पोलिस शिपाई इम्रान महालकरी, पोलिस निरीखक राजेश घरे, सहायक पोलिस निरीक्षक एम. जे. मोहिते, पोलिस हवलदार एस. इनामदार, पोलिस नाईक यु. एस. फकीर, पोलिस निरीक्षक संजीव कुमार, पोलिस नाईक एस. एस. पवार, पोलिस हवलदार आर. व्ही. माळकर, पोलिस नाईक व्ही. एस. मोहिते, पोलिस शिपाई एच. टी. गवळेी, पोलिस नाईक एस. जी. चिल्हावार, सहायक पोलिस फौजदार जी. एस. झांझरे, सी. टी. कांबळे यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी ध्वजरोहणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल, एनसीसी, बँड, वज्र वाहन, श्वान, निर्भया, डायल 112, फौंरेन्सीक लॅब, बीडीडीएस, आरसीपी पथक, आरोपी पार्टी वाहन, सिव्हील हॉस्पीटल रूग्णवाहिका आदि पथकांचा समावेश होता. त्याचबरोबर आरोग्य विभाग, सामाजिक न्याय, माझी वसुंधरा, मॉडेल स्कूल, पत्रकार दिपक चव्हाण यांचा शोले स्टाईल आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्तीपर गाण्यांचा चित्ररथ आदि चित्ररथांचा सहभाग होता. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले. 00000

‘आपला महाराष्ट्र आपले सरकार…’ महाराष्ट्र दिनी विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि.३०: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन १ मे रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयामार्फत या प्रदर्शनाचे १ मे ते ५ मे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीच्या तळमजल्यावरील प्रांगणात आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती मिळणार आहे. प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ३६० अंश सेल्फी पॉईंट हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबरच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर हे वेळोवेळी आढावा घेत असून मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी केले आहे. 000

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या हक्काच्या जागेचे आधुनिक तंत्राव्दारे अचूकपणे मोजमाप करून ‍सनद (डिजीटल नकाशे) व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आली आहेत. याचा जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभ होईल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत गावठाण भूमापन झालेल्या गावचे सनद वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे, उपअधिक्षक भूमिअभिलेख अशोक चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच सुधीर पाटील, उपसरपंच, सरीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सनद ही शासनाने नागरीकांना दिलेला हक्काचा पुरावा आहे. हा मालकी हक्काचा पुरावा असल्याने कोणत्याही शासकीय कामकाजासाठी तो ग्राह्य धरला जातो. त्यामुळे नागरिकांना कर्ज उपलब्धता होईल, शासनाच्या विविध आवास योजनेच्या मंजूरी कामी फायदा मिळेल, खरेदी -विक्री व्यवहारात पारदर्शकता येवून नागरीकांची फसवणूक होणार नाही. यामुळे कायमस्वरूपी वंशपरंपरागत मालकी हक्काचा पुरावा नागरिकांना मिळाला आहे. सनद ही कायदेशीर असल्याने न्यायालयीन कामकाजामध्येही पुरावा म्हणून वापरता येईल. सनदेमुळे धारकांची पर्यायाने गावाची पत सुधारेल. गावातील वाद, तंटे कमी होतील. त्याचबरोबर सार्वजनिक जागेचे संरक्षणही होईल. त्यामुळे नागरिकांनी सनदेची शासकीय फी भरून ती प्राप्त करून घ्यावी. ही सनद पुढील पिढीसाठीही उपयोगी पडेल. वाळवा तालुक्यातील सर्व गावांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून याकामी महसूल विभागाने अत्यंत चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले. जातपडताळणीचे दाखले विहीत वेळेत मिळण्यासाठी येत्या काळात 10 वी, 11 वी व 12 वी मध्ये असतानाच विद्यार्थ्यांचे शाळेतच अर्ज भरून घेवून ते अपलोड करण्याची मोहिम राबविली जाईल. त्यामुळे 12 वी पास होण्याअगोदरच विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात ‍मिळतील असा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदर्श शाळा उपक्रमांतर्गत भडकंबे येथे प्राथमिक शाळेचे चांगले डिझाइन तयार केले असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वाळवा तालुक्यात पहिल्यांदाच ड्रोनव्दारे मोजमाप करून डिजीटल नकाशे व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळेत जास्त गावांचे काम झालेले आहे. स्वामित्व योजनेंतर्गत वाळवा तालुक्यात 45 गावांमध्ये नगर भूमापन झाले असून 9 हजार 144 मालमत्तांच्या सनदा तयार केल्या आहेत व 11 हजार 353 प्रॉपर्टी कार्ड तयार केली आहेत. सनद ही मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्याची फी भरून प्रत्येकाने आपआपली सनद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी गावठाण जमाबंदी प्रकल्पाची सविस्तर माहितीदिली. यावेळी त्यांनी वाळवा तालुक्यातील 99 गावांपैकी 50 गावांचे यापूर्वी नगर भूमापन झाले असल्यासचे सांगून स्वामित्व योजनेंतर्गत 45 गावांचे नगर भूमापन केले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण ७३६ गावे असून यापैकी २६३ गावांमध्ये यापूर्वीच नगर भूमापन योजना झालेली आहे. सध्या ४५५ गावांमध्ये ड्रोन सर्व्हेच्या सहाय्याने नगर भूमापन कामकाज करण्याची कार्यवाही चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नागरिकांना सनद व प्रॉपर्टी कार्डचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भडकंबे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम सोमवारपासून 1 ते 19 वर्षांच्या मुलांना जंतनाशकाची गोळी द्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम दि. 25 एप्रिल 2022 ते दि. 2 मे 2022 या आठवड्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालय व शाळाबाह्य 1 ते 19 वर्षांच्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाच्या आठवड्यामध्ये जंतनाशकाची गोळी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. 1 ते 19 वर्षातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेवून 1 ते 19 वर्ष गोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचा उद्देश आहे. आरोग्य, शिक्षण, एकात्मिक बाल विकास विभाग या तीन मुख्य विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संस्था स्तरावर शाळा महाविद्यालय मधील 6 ते 19 वर्षाच्या मुलांना शिक्षकांमार्फत दि. 25 एप्रिल राष्ट्रीय जंतनाशक दिन रोजी व दि. 29 एप्रिल मॉप अप दिन रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. तर समुदाय स्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून शाळेत न जाणाऱ्या 1 ते 19 वर्षाच्या मुलांना दि. 25 एप्रिल ते 2 मे 2022 या आठवड्यामध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण 6 लाख 95 हजार 870 मुलांना सदरचे औषध देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी वयोगट (1 ते 6 वर्षे) 1 लाख 92 हजार 752, शाळेतील (6 ते 18 वर्षे) 4 लाख 88 हजार 801 व शाळाबाह्य 14 हजार 317 मुलांचा समावेश आहे. 00000

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी रविवार पासून विशेष मोहिम - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- मोहिमेच्या जनजागृतीसाठी रविवारी विशेष ग्रामसभा - यंत्रणांनी समन्वयाने काम करून मोहिम यशस्वी करावी सांगली दि. 21 (जि.मा.का.) : राज्यात पी. एम. किसान नोंदणीकृत एकुण 1 कोटी 14 लाख 93 हजार लाभार्थ्यांपैकी केवळ 81 लाख 36 हजार लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास 33 लाख 57 हजार पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि. 24 एप्रिल रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. या ग्राम सभेमध्ये बँक प्रतिनिधी उपस्थित राहून ग्रामस्थांना या विषयी माहिती देणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शकानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज, तसेच पशुधन / मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून दि. 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज तसेच पशुधन / मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यात येतील. या उपक्रमांतर्गत सामाजिक सुरक्षा योजना (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, आणि अटल पेन्शन योजना) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती, तसेच नवीन लाभार्थी नोंदणी करण्यात येईल. केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करून ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. 00000

भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या शीतपेय व्यावसायिकांवर कारवाई करणार - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

- शीतपेय थंड करण्यासाठी शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरणे आवश्यक - ग्राहकांनी शीतपेय विक्रेत्यांना बर्फाचा वापर कोणता केला आहे याबाबत विचारणा करावी सांगली दि. 21 (जि.मा.का.) : अन्न व औषध प्रशासनामार्फत सध्या बर्फ, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादींचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या बर्फ, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनतेस थंड सरबते, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस व शीतपेय पिण्याची इच्छा होत असते. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय थंड करण्यासाठी त्यामध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये मिळणारा सर्व बर्फ शुध्द पाण्यापासून बनविलेला आहे याची खात्री देता येत नाही, त्यामुळे ग्राहकांनी शीतपेय विक्रेत्यांना बर्फाचा वापर कोणता केला आहे याबाबत विचारणा करावी. महाराष्ट्र शासनाने स्वाद बर्फ व अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा फुड कलर वापरण्याची सक्ती उत्पादकांना केली आहे. काही बर्फ उत्पादक या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन, सांगली यांनी एप्रिल २०२२ पासून बर्फाचे ६ नमुने तपाणीसाठी घेतले असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात परवानाधारक ५ बर्फ उत्पादक आहेत. सर्व बर्फ उत्पादकांनी खाण्याचा बर्फ पिण्यास योग्य पाण्यापासूनच बनवावा. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी विक्रेत्यांनी खरेदी करीत असलेल्या बर्फाचे पक्के बिल घ्यावे व ज्या बर्फ उत्पादकाकडून त्यांना बर्फ येतो त्यांना तो खाद्य बर्फ आहे की अखाद् बर्फ आहे याबाबत विचारणा करावी. कोणतीही शंका तक्रार असल्यास १८००११२१०० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चौगुले यांनी केले आहे. 00000

खाद्यतेल तीन पेक्षा जास्त वेळा तळण्यासाठी वापरण्यास प्रतिबंधित - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : खाद्यतेलाच्या पुर्नवापराबाबत अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत तरतुदी आल्या असून त्यामध्ये 25 पेक्षा जास्त पोलर कम्पाउंड असलेल्या खाद्यतेलाचा वापर करता येणार नाही असा नियम करण्यात आला आहे. बटाटेवडे, पॅटीस, समोसे, भजी व इत्यादी बेकरीत व चायनिज पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल हे तीन पेक्षा जास्त वेळा तळण्यासाठी वापरण्यास प्रतिबंधित केले आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली. एकच तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यामुळे त्या तेलातील फॅटी अॅसिड वाढतात व पोलर कम्पाउंड वाढतात त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तळण करणारे विक्रेते एकदा कढईत ओतलेले तेल दिवसभर वापरत राहतात त्यामुळे तेलातील पोलर कम्पाउंड वाढून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दि. 20 एप्रिल रोजी अशा तळण करण्यात येणाऱ्या विक्रेत्यांच्या तपासणी करून TPC मीटरच्या सहाय्याने तळलेल्या तेलाचे चेकींग करण्यात आले असता काही ठिकाणी पोलर कम्पाउंड वाढल्याचे आढळून आले. अशा ठिकाणी तपासणीसाठी नमुना घेण्यात आला असून उर्वरीत तेल जप्त करण्यात आले आहे. दि. 20 एप्रिल रोजी एकूण 6 ठिकाणी अशा तपासण्या करण्यात आल्या. ज्या ठिकाणी पोलर कम्पाउंड जास्त आढळून आले, अशा ठिकाणी अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. 00000

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपअभिकर्ता संस्थांमार्फत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यास मंजुरी

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : रब्बी पणन हंगाम 2021-22 मध्ये भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने खरेदी सुरू होण्याअगोदरच म्हणजेच 11 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 पूर्वी NeML च्या वेब पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शासनामार्फत प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, जत, विटा व आटपाडी येथे उपअभिकर्ता संस्थांमार्फत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंजूरी दिली आहे. भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदी केंद्राचे ठिकाण व कंसात उपअभिकर्ता संस्थेचे नाव पुढीलप्रमाणे. तासगाव (ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ तासगाव), जत (विष्णू आण्णा पाटील सहकारी खरेदी विक्री संघ, सांगली-जत), ‍विटा (खानापूर तालुका खरेदी विक्री संघ ‍विटा), आटपाडी (कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी). नोंदणी प्रक्रिया दि. 30 एप्रिल पर्यंत उपअभिकर्ता संस्थामार्फत केली जाईल. नोंदणी करतेवेळी सर्व शेतकऱ्यांनी सादर केलेले बँक खाते सुरू असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. चौकशी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सांगली (0233-2670820), जिल्हा मार्केटींग अधिकारी सांगली (8108182941), ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ तासगाव (9623530717), कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी (9421115628), विष्णू आण्णा पाटील सहकारी खरेदी विक्री संघ सांगली-जत (9881755993), खानापूर तालुका खरेदी विक्री संघ विटा (9850011374). 00000

आरोग्य तपासणी मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून दिलासा मिळाल्यानंतर आता आरोग्य विभाग नागरिकांमधील संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजाराची लक्षणे शोधण्यासाठी 18 एप्रिलपासून आठवडाभर विशेष तपासणी मोहिम राबवित आहे. आवश्यक त्या सर्व तपासण्या मोफत होणार असून नागरिकांचा युनिक हेल्थ आयडीही तयार केला जाणार आहे. आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विशेष तपासणी मोहिमेचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा. तसेच अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नावाची नोंद या शिबीरामध्ये करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे आयोजित मेळाव्यात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या तपासण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळा ‍किंवा रूग्णालयांत हजारो रूपये शुल्क आकारले जाते. या शिबीरांमध्ये सदर तपासण्या एच.एन.एल. मार्फत मोफत करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय आरोग्य मेळाव्याचा ‍दिनांक व कंसात ठिकाण पुढीलप्रमाणे. पलूस - 18 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय पलूस), खानापूर - 18 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय विटा), कवठेमहांकाळ - 19 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ), जत - 19 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय जत), आटपाडी - 20 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय आटपाडी), शिराळा - 20 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय शिराळा), कडेगाव - 21 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय चिंचणी वांगी), वाळवा - 21 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर), तासगाव - 22 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय तासगाव), मिरज - 22 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय बेळंकी). आरोग्य विभागाने उपलब्ध सुविधा व मनुष्यबळानुसार कोरोना काळात रूग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने कोरोनाविषयक निर्बंध हटविले आहेत, तथापि, आरोग्य क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांमधील संसर्गजन्य आजार डेंग्यू, हिवताप, कांजण्या क्षयरोग, स्वाईन फल्यू, गोवर, कॉलरा, अतिसार इत्यादी व असंसर्गजन्य कर्करोग, मधूमेह, रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, मानसिक रोग, अंधत्व मोतिबिंदू इत्यादी आजाराची लक्षणे शोधण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 18 ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहिम राबवित आहे. विविध आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे, विविध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्य शिक्षण देणे, विविध आजारांच्या निदानासाठी स्क्रिनिंग, औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि आवश्यकतेनुसार संबंधित आरोग्य तज्ज्ञांच्या संदर्भसेवा प्रदान करणे आदि उद्देशातून विशेष मोहिम राबविली जात आहे. तसेच जे लोक अवयवदान करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींच्या नावाची नोंद या शिबीरामध्ये करण्यात येणार आहे. 00000

ओबीसी महामंडळाकडील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सूट) देण्याबाबतची एकरकमी (OTS) योजना दि. 31 मार्च 2023 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत ‍बिरादार यांनी केले आहे. 00000

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली शहर येथील पुतळ्यास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली बस्थ स्थानक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सांगली बस्थ स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त खुशाल गायकवाड, समितीचे सदस्य सचिव संभाजी पोवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, नगरसेविका स्नेहल सावंत, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

तकऱ्यांना पीक विमा पाठशाळांना उपस्थित राहण्याचे आवाहन

शे सांगली, ‍दि. 13 (जि. मा.का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पीक विमा पाठशाळांना उपस्थित राहून स्थानिक आपत्ती पीक विमा नुकसान भरपाई, काढणी पश्चात पीक विमा नुकसान भरपाई, तसेच हंगामाच्या प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाई याबाबत माहिती अवगत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने कृषि क्षेत्राचा पाया घट्ट करण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अनुषंगाने अधिक सुशिक्षित करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पीक विमा पाठशाळा आयोजित करून सज्ञान करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 42 पाठशाळा घेण्यात आल्या आहेत. पीक विमा पाठशाळा उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवणे, योजनेची उद्दिष्टे सफलपणे समजवणे इत्यादी बाबत कार्यवाही कृषि विभाग व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या उपक्रमामधून सुरक्षित व सक्षम शेतकरी तयार करण्याची कार्यवाही दि. 15 ऑगस्ट 2022 अखेर सुरू राहणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 18‍ एप्रिलला

सांगली, ‍दि. 13 (जि. मा.का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. माहे एप्रिल 2022 महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 18 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. 00000

औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा 21 एप्रिलला

सांगली, ‍दि. 13 (जि. मा.का.) : राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण, एमएसबीव्हीइ उत्त्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली चे प्राचार्य यांनी केले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आयटीआय पास गुणपत्रक छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, आयटीआय प्रमाणपत्र छायांकित प्रत या कागदपत्रांच्या 2 प्रतिसह उपस्थित रहाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांसाठी 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी

ी सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने बांधकाम विभागासाठी सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुचविलेली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सदरची कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षातील असून ती 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये विविध ग्रामीण क्षेत्रातील गावांत सभागृह बांधणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते सुधारणेंतर्गत डांबरीकरण, खडीकरण, मुरमीकरण व काँक्रीटीकरण करणे, जोड रस्ते सुधारणे, ग्राम सचिवालय बांधणी, संरक्षक भिंत बांधणे, व्यायाम शाळा बांधणे, धार्मिक स्थळांचा विकास, सांस्कृतिक भवन बांधणे, स्मशान भूमी बांधकाम व सुशोभिकरण आदि कामांचा समावेश आहे. 00000 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 31 मार्च 2022 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करण्यास भाग पाडणे) अधिनियम 1959 नुसार रिक्तपदे कळविण्याबाबत व तिमाही विवरणपत्र ईआर-1 मध्ये मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे दि. 31 मार्च 2022 अखेरच्या तिमाहीचे विविरणपत्र ईआर-1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन सादर करावे. अधिक माहितीसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. ०००००

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

समता कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच योजनांचे उद्देश साध्य व्हावेत याकरीता दि. 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये समता कार्यक्रमातंर्गत दि. 6 ते 16 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीक, लोकप्रतिनिधी, शासकिय कर्मचारी, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा परीषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये समता कार्यक्रमातंर्गत दि. 6 ते 16 एप्रिल या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 एप्रिल - सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन, दि. 7 एप्रिल - सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकिय वसतिगृह, निवासी शाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इ. आयोजन, दि. 8 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे स्वाधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना शिष्यवृत्तीचे प्रतिनिधीक वाटप. दि. 9 ‍ एप्रिल - सांगली जिल्ह्यात जेष्ठ नागरीकांचे जनजागृती शिबीर व नागरीकांच्या मेळाव्याचे आयोजन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली व जिल्ह्यातील महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह व निवासी शाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन, दि. 10 एप्रिल - समतादुतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटीका याव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 11 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करुन महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन, दि. 12 एप्रिल - सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे मार्जिन मनी योजनेंतर्गतच्या कार्यशाळेचे आयोजन, दि. 13 एप्रिल - समतादुतामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान जागर - संविधान जनजागृतीसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय वसतिगृहे, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम तसेच व्याख्यान, चर्चासत्राचे आयोजन. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात ऑन लाईन व्हॅलिडेटी प्रमाणपत्र प्रदान करणे या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 15 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन तसेच तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन. दि. 16 एप्रिल - जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यामध्ये स्वच्छता कार्यक्रम व अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार लाभार्थ्यांचे मनोगत कार्यक्रम आणि समता कार्यक्रम समारोप. 00000

खाजगी दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका सोमवार पासून सुरू

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या खाजगी दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी डब्ल्यु ही नवीन मालिका सोमवार, दि. 11 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली. एम एच 10 डी डब्ल्यु या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनासाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 12 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी 35 लाखाचा ‍निधी; 7 कोटीहून अधिक वितरीत - सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून शासनाने सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी 35 लाख रूपये कामांच्या अंदाजित रक्कमेस प्रशासकीय मंजुरी दिली असून 7 कोटी 24 लाख 50 हजार रूपये इतका निधी वितरीत केला आहे. अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. विविध गावातील कामांसाठी तालुकानिहाय मंजूर निधी व कंसात वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे. कडेगाव - 1 कोटी 20 लाख (84 लाख), पलूस - 75 लाख (52 लाख 50 हजार), जत - 75 लाख (52 लाख 50 हजार), शिराळा - 10 लाख (7 लाख), तासगाव - 70 लाख (49 लाख), कवठेमहांकाळ - 50 लाख (35 लाख), खानापूर - 93 लाख (65 लाख 10 हजार), आटपाडी - 42 लाख (29 लाख 40 हजार), मिरज - 1 कोटी 30 लाख (91 लाख), वाळवा - 3 कोटी 50 लाख (2 कोटी 45 लाख) तर महानगरपालिका क्षेत्रासाठी - 20 लाख (14 लाख) रूपये. या निधीतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधांमध्ये वाढ होईल. 00000

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी 5 एप्रिलला विशेष ग्रामसभा घ्या 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्याचा आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुर्नसंचयित करणे या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. जलशक्ती अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश होता त्यामध्ये जिल्ह्याने अत्यंत चांगले काम केले आहे. आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येवून गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर येत्या सहा महिन्यांत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा विहीत कालमुदतीत तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानामध्ये जिल्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे जलशक्ती अभियान हाती घेण्यात आले असून राज्य सरकारही यामध्ये सहभागी आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक विजय माने, अतिरिक्त आयुक्त डी. जी. लांघी, जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. एस. साहुत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेंद्र काटकर व अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सुनिल पाटील आदि उपस्थित होते. पावसाचे पडणारे पाणी अडविणे, जिरविणे आणि वाचविणे हा उपक्रम लोकसहभागाशिवाय होवू शकत नाही. त्यामुळे जलशक्ती अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध शासकीय यंत्रणा यांनी एकसंघ होवून एकदिलाने काम करावे आणि हे अभियान जनचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. जलशक्ती अभियानाची समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, त्यांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घ्यावी. यामध्ये जलशपथ घेण्यात यावी, लोकांना या योजनेची माहिती द्यावी, गावपातळीवर करावयाचा कामांचा आराखडा तयार करावा. यामध्ये जिल्हा परिषद यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच जलशक्ती अभियानाशी संबंधित यंत्रणांनी गावनिहाय, तालुकानिहाय करावयाच्या कामांचा आराखडा 10 एप्रिल पर्यंत तयार करावा व तो जलसंधारण अधिकारी यांच्याकडे द्यावा. 15 एप्रिल पर्यंत जिल्हा आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 2019 पूर्वी जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांचे जिओ टॅगींग पुन्हा करावयाची गरज नसून 2019 नंतर झालेल्या कामांचे जिओ टॅगींग करून ती पोर्टलवर अपलोड करावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. वृक्षारोपण, रेनवॉटर हार्वेस्टींग, सुक्ष्म जलसिंचन, जलसंधारण, मृद संधारण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, वनतळी आदि वेगवेगळ्या कामांना एकसंघ करून पुढील सहा महिन्यात करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरी भागातही पाण्याचा पुर्नवापर आणि संरचनेचे पुनर्भरण, सघन वृक्षारोपन, रेनवॉटर हार्वेस्टींग आदि कामांना माझी वसुंधरा अंतर्गत प्राधान्य द्यावे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करावी. यावेळी त्यांनी जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते सर्व नियोजन करावे, असे निर्देश दिले. 00000