गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या शीतपेय व्यावसायिकांवर कारवाई करणार - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

- शीतपेय थंड करण्यासाठी शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरणे आवश्यक - ग्राहकांनी शीतपेय विक्रेत्यांना बर्फाचा वापर कोणता केला आहे याबाबत विचारणा करावी सांगली दि. 21 (जि.मा.का.) : अन्न व औषध प्रशासनामार्फत सध्या बर्फ, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादींचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या बर्फ, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनतेस थंड सरबते, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस व शीतपेय पिण्याची इच्छा होत असते. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय थंड करण्यासाठी त्यामध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये मिळणारा सर्व बर्फ शुध्द पाण्यापासून बनविलेला आहे याची खात्री देता येत नाही, त्यामुळे ग्राहकांनी शीतपेय विक्रेत्यांना बर्फाचा वापर कोणता केला आहे याबाबत विचारणा करावी. महाराष्ट्र शासनाने स्वाद बर्फ व अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा फुड कलर वापरण्याची सक्ती उत्पादकांना केली आहे. काही बर्फ उत्पादक या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन, सांगली यांनी एप्रिल २०२२ पासून बर्फाचे ६ नमुने तपाणीसाठी घेतले असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात परवानाधारक ५ बर्फ उत्पादक आहेत. सर्व बर्फ उत्पादकांनी खाण्याचा बर्फ पिण्यास योग्य पाण्यापासूनच बनवावा. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी विक्रेत्यांनी खरेदी करीत असलेल्या बर्फाचे पक्के बिल घ्यावे व ज्या बर्फ उत्पादकाकडून त्यांना बर्फ येतो त्यांना तो खाद्य बर्फ आहे की अखाद् बर्फ आहे याबाबत विचारणा करावी. कोणतीही शंका तक्रार असल्यास १८००११२१०० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चौगुले यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा