शनिवार, ३० एप्रिल, २०२२

‘आपला महाराष्ट्र आपले सरकार…’ महाराष्ट्र दिनी विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि.३०: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन १ मे रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयामार्फत या प्रदर्शनाचे १ मे ते ५ मे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीच्या तळमजल्यावरील प्रांगणात आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती मिळणार आहे. प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ३६० अंश सेल्फी पॉईंट हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबरच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर हे वेळोवेळी आढावा घेत असून मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी केले आहे. 000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा