शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी 5 एप्रिलला विशेष ग्रामसभा घ्या 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्याचा आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुर्नसंचयित करणे या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. जलशक्ती अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश होता त्यामध्ये जिल्ह्याने अत्यंत चांगले काम केले आहे. आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येवून गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर येत्या सहा महिन्यांत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा विहीत कालमुदतीत तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानामध्ये जिल्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे जलशक्ती अभियान हाती घेण्यात आले असून राज्य सरकारही यामध्ये सहभागी आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक विजय माने, अतिरिक्त आयुक्त डी. जी. लांघी, जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. एस. साहुत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेंद्र काटकर व अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सुनिल पाटील आदि उपस्थित होते. पावसाचे पडणारे पाणी अडविणे, जिरविणे आणि वाचविणे हा उपक्रम लोकसहभागाशिवाय होवू शकत नाही. त्यामुळे जलशक्ती अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध शासकीय यंत्रणा यांनी एकसंघ होवून एकदिलाने काम करावे आणि हे अभियान जनचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. जलशक्ती अभियानाची समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, त्यांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घ्यावी. यामध्ये जलशपथ घेण्यात यावी, लोकांना या योजनेची माहिती द्यावी, गावपातळीवर करावयाचा कामांचा आराखडा तयार करावा. यामध्ये जिल्हा परिषद यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच जलशक्ती अभियानाशी संबंधित यंत्रणांनी गावनिहाय, तालुकानिहाय करावयाच्या कामांचा आराखडा 10 एप्रिल पर्यंत तयार करावा व तो जलसंधारण अधिकारी यांच्याकडे द्यावा. 15 एप्रिल पर्यंत जिल्हा आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 2019 पूर्वी जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांचे जिओ टॅगींग पुन्हा करावयाची गरज नसून 2019 नंतर झालेल्या कामांचे जिओ टॅगींग करून ती पोर्टलवर अपलोड करावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. वृक्षारोपण, रेनवॉटर हार्वेस्टींग, सुक्ष्म जलसिंचन, जलसंधारण, मृद संधारण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, वनतळी आदि वेगवेगळ्या कामांना एकसंघ करून पुढील सहा महिन्यात करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरी भागातही पाण्याचा पुर्नवापर आणि संरचनेचे पुनर्भरण, सघन वृक्षारोपन, रेनवॉटर हार्वेस्टींग आदि कामांना माझी वसुंधरा अंतर्गत प्राधान्य द्यावे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करावी. यावेळी त्यांनी जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते सर्व नियोजन करावे, असे निर्देश दिले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा