सोमवार, १८ एप्रिल, २०२२

आरोग्य तपासणी मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून दिलासा मिळाल्यानंतर आता आरोग्य विभाग नागरिकांमधील संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजाराची लक्षणे शोधण्यासाठी 18 एप्रिलपासून आठवडाभर विशेष तपासणी मोहिम राबवित आहे. आवश्यक त्या सर्व तपासण्या मोफत होणार असून नागरिकांचा युनिक हेल्थ आयडीही तयार केला जाणार आहे. आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विशेष तपासणी मोहिमेचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा. तसेच अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नावाची नोंद या शिबीरामध्ये करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे आयोजित मेळाव्यात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या तपासण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळा ‍किंवा रूग्णालयांत हजारो रूपये शुल्क आकारले जाते. या शिबीरांमध्ये सदर तपासण्या एच.एन.एल. मार्फत मोफत करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय आरोग्य मेळाव्याचा ‍दिनांक व कंसात ठिकाण पुढीलप्रमाणे. पलूस - 18 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय पलूस), खानापूर - 18 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय विटा), कवठेमहांकाळ - 19 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ), जत - 19 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय जत), आटपाडी - 20 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय आटपाडी), शिराळा - 20 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय शिराळा), कडेगाव - 21 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय चिंचणी वांगी), वाळवा - 21 एप्रिल (उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर), तासगाव - 22 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय तासगाव), मिरज - 22 एप्रिल (ग्रामीण रूग्णालय बेळंकी). आरोग्य विभागाने उपलब्ध सुविधा व मनुष्यबळानुसार कोरोना काळात रूग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने कोरोनाविषयक निर्बंध हटविले आहेत, तथापि, आरोग्य क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांमधील संसर्गजन्य आजार डेंग्यू, हिवताप, कांजण्या क्षयरोग, स्वाईन फल्यू, गोवर, कॉलरा, अतिसार इत्यादी व असंसर्गजन्य कर्करोग, मधूमेह, रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, मानसिक रोग, अंधत्व मोतिबिंदू इत्यादी आजाराची लक्षणे शोधण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 18 ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहिम राबवित आहे. विविध आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे, विविध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्य शिक्षण देणे, विविध आजारांच्या निदानासाठी स्क्रिनिंग, औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि आवश्यकतेनुसार संबंधित आरोग्य तज्ज्ञांच्या संदर्भसेवा प्रदान करणे आदि उद्देशातून विशेष मोहिम राबविली जात आहे. तसेच जे लोक अवयवदान करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींच्या नावाची नोंद या शिबीरामध्ये करण्यात येणार आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा