गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

खाद्यतेल तीन पेक्षा जास्त वेळा तळण्यासाठी वापरण्यास प्रतिबंधित - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : खाद्यतेलाच्या पुर्नवापराबाबत अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत तरतुदी आल्या असून त्यामध्ये 25 पेक्षा जास्त पोलर कम्पाउंड असलेल्या खाद्यतेलाचा वापर करता येणार नाही असा नियम करण्यात आला आहे. बटाटेवडे, पॅटीस, समोसे, भजी व इत्यादी बेकरीत व चायनिज पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल हे तीन पेक्षा जास्त वेळा तळण्यासाठी वापरण्यास प्रतिबंधित केले आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली. एकच तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यामुळे त्या तेलातील फॅटी अॅसिड वाढतात व पोलर कम्पाउंड वाढतात त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तळण करणारे विक्रेते एकदा कढईत ओतलेले तेल दिवसभर वापरत राहतात त्यामुळे तेलातील पोलर कम्पाउंड वाढून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दि. 20 एप्रिल रोजी अशा तळण करण्यात येणाऱ्या विक्रेत्यांच्या तपासणी करून TPC मीटरच्या सहाय्याने तळलेल्या तेलाचे चेकींग करण्यात आले असता काही ठिकाणी पोलर कम्पाउंड वाढल्याचे आढळून आले. अशा ठिकाणी तपासणीसाठी नमुना घेण्यात आला असून उर्वरीत तेल जप्त करण्यात आले आहे. दि. 20 एप्रिल रोजी एकूण 6 ठिकाणी अशा तपासण्या करण्यात आल्या. ज्या ठिकाणी पोलर कम्पाउंड जास्त आढळून आले, अशा ठिकाणी अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा