शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम सोमवारपासून 1 ते 19 वर्षांच्या मुलांना जंतनाशकाची गोळी द्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम दि. 25 एप्रिल 2022 ते दि. 2 मे 2022 या आठवड्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालय व शाळाबाह्य 1 ते 19 वर्षांच्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाच्या आठवड्यामध्ये जंतनाशकाची गोळी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. 1 ते 19 वर्षातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेवून 1 ते 19 वर्ष गोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचा उद्देश आहे. आरोग्य, शिक्षण, एकात्मिक बाल विकास विभाग या तीन मुख्य विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संस्था स्तरावर शाळा महाविद्यालय मधील 6 ते 19 वर्षाच्या मुलांना शिक्षकांमार्फत दि. 25 एप्रिल राष्ट्रीय जंतनाशक दिन रोजी व दि. 29 एप्रिल मॉप अप दिन रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. तर समुदाय स्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून शाळेत न जाणाऱ्या 1 ते 19 वर्षाच्या मुलांना दि. 25 एप्रिल ते 2 मे 2022 या आठवड्यामध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण 6 लाख 95 हजार 870 मुलांना सदरचे औषध देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी वयोगट (1 ते 6 वर्षे) 1 लाख 92 हजार 752, शाळेतील (6 ते 18 वर्षे) 4 लाख 88 हजार 801 व शाळाबाह्य 14 हजार 317 मुलांचा समावेश आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा