गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

आपत्तीमध्ये आपदा मित्रांचे योगदान मोलाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. २२ (जि.मा.का.) : कोणत्याही आपत्तीमध्ये आपदा मित्रांचे योगदान मोलाचे असून आपदा मित्रांनी प्रशिक्षणातून विविध कौशल्य आत्मसात करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शांतीनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मौसमी चौगुले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, तहसिलदार दगडु कुंभार, अपर तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ, नायब तहसीलदार श्री. विभुते, विशेष कार्यकारी दंडाधिकारी उदयसिंग गायकवाड, शांती निकेतन शिक्षण संकुलाचे गौतम पाटील यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक व आपदा मित्र उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्तीमध्ये मदत आणि बचाव करत असताना आपदा मित्राची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी प्रशासनाने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या आपदा मित्रांची आरोग्य तपासणी करावी. आरोग्य तपासणी डाटा एकत्र संकलित करून ठेवावा. आपत्तीमध्ये आपदा मित्र आणि स्थानिक लोकांची मदत महत्त्वाची असल्याने प्रशिक्षण घेतलेल्या आपला मित्रांनी गाव पातळीवरही तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी बोलताना केले. पोलीस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, आपत्तीमध्ये तात्काळ प्रतिसाद महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज असते. यासाठी आपदा मित्रांनी गाव पातळीवरही असे प्रशिक्षित आपदा मित्र तयार करावेत. महापालिका आयुक्त श्री. पवार म्हणाले आपत्तीमध्ये आपदा मित्र हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला नियमित प्रशिक्षण मिळाले पाहिजे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमातून आपत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण आपदा मित्रांना मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनामध्ये करून प्रशासनाला आपत्तीमध्ये मदत करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. पवार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण १ जानेवारी २०२३ पर्यंत असून यामधे ५० आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत यापुढे ही आणखी ५ बॅचमध्ये आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आपदा मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे संपर्क साधावा. सदरचे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणार्थीना कोणतेही मानधन दिले जाणार नाही. तसेच भविष्यात शासकीय सेवेतील समावेशासाठी याचा विचार केला जाणार नाही. मात्र सामाजिक बांधिलकीतून आपदा मित्रांचा एक वर्षाचा विमा उतरवला जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांनी यावेळी दिली. प्रारंभी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन विभागाकडील तज्ञ राज्य प्रशिक्षक ओंकार नवलिहळकर यांनी प्रस्ताविक करून आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षणाचे असलेले महत्त्व विषद केले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा