मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

कृषि पुरस्कारासाठी 13 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी दि. 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कृषि पुरस्काराचे नाव, निकष व पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, अधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार कृषि क्षेत्रामध्ये महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 11 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. उद्यानपंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. युवा शेतकरी पुरस्कार कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना देण्यात येतो (वय वर्षे 18 ते 40 वर्षे). या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा