शुक्रवार, २१ जुलै, २०१७

वृक्षारोपण व संवर्धनातील लोकसहभागासाठी 'ग्रीन आर्मी'चे 1 कोटी सदस्य करणार -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : राज्यात वृक्षारोपण आणि  वृक्षसंवर्धनामधील लोकसहभाग वाढावा, यासाठी ग्रीन आर्मी संकल्पनेवर अधिक भर देऊन ग्रीन आर्मीचे येत्या डिसेंबरपर्यंत 1 कोटी सदस्य करण्याचा निर्धार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज कुंडल येथे बोलताना केली.
    वन विभागाच्या वतीने कुंडल वन ॲकॅडमी येथे आयोजित केलेल्या  8व्या राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकारी परिषदेचा शुभारंभ श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेस वन सचिव विकास खारगे, मुख्य वनसंरक्षक श्रीभगवान, कुंडल वन ॲकॅडमीचे महासंचालक सरफराज खान यांच्यासह राज्यातील भारतीय वनसेवेतील वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते.
    ग्रीन आर्मीच्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन वाढविण्याचा मानस असून यासाठी लोकसहभागाबरोबरच उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीचे स्वतंत्र सॉफ्टवेअर निर्माण करून राज्यात या संकल्पनेचा विस्तार केला जाईल. सद्या ग्रीन आर्मीचे राज्यात 32 लाख सदस्य असून ते डिसेंबरअखेर 1 कोटी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यात पुढील वर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.. वनमंत्री
    एकच लक्ष 13 कोटी वृक्ष हे घोषवाक्य सर्वदूर पोहचवून पुढील वर्षीच्या वृक्षारोपणाचे आतापासूनच नियोजन करावे, अशी सूचना करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, गेल्या वर्षी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते, जनतेच्या उत्स्फू र्त सहभागामुळे प्रत्यक्षात 2 कोटी 83 लाख वृक्षलागवड करण्यात आली. यंदा 4 कोटीचे उद्दिष्ट होते, मात्र प्रत्यक्षात 5 कोटी 47 लाख वृक्षारोपण झाले. पुढील वर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र प्रशासनाचे नियोजन आणि जनतेचा उर्त्स्फुत लोकसहभाग यामुळे 16 कोटी पर्यंत वृक्षारोपण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    राज्य शासनाने 50 कोटी वृक्षलागवडीचे काम मिशन म्हणून हाती घेतले आहे. सर्व यंत्रणांनी वृक्षारोपणाचे हे काम एक मिशन म्हणून हाती घेऊन सामान्य जनतेचा सहभाग वाढवावा, असे आवाहन करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राज्यभर राबविलेल्या वृक्षारोपणाच्या मोहिमेस समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, शासनाच्या वृक्षारोपणाच्या या मोहिमेवर लोकांचा विश्वास बसला आहे, हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी अथक मेहनत आणि अपार कष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
    वृक्षारोपणाचे काम यशस्वी होण्यासाठी शासकीय यंत्रणा दोषविरहीत करून त्यांच्यात सेवावृत्तीची भावना निर्माण करावी, असे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, पुढील दोन वर्षात राज्यात होणाऱ्या वृक्षारोपणाचे आतापासूनच नियोजन करून लोकसहभागाबरोबरच नाविण्यपूर्ण संकल्पना राबवा. वृक्षांचे संगोपन ही महत्त्वाची बाब असून याबाबतीत समाजघटकांचे प्रश्न शांतपणे समजून घेऊन त्यांना संयमाने सांगण्याची गरज आहे. यासाठी राज्यात वन विभागाच्या माध्यमातून कॉल सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
    वनविभागाने यापुढे उत्त्पनाची नवी पध्दती अंमलात आणून दर्जेदार नर्सरी आणि दर्जेदार रोपे निर्माण करून वन विभाग हा रोजगार निर्माण करणारा विभाग म्हणून विकसीत करावा, असे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील जनतेला वृक्षारोपणाची सवय लागावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्मृतीवन, शुभमंगलवन, माहेरची झाडी, वाढदिवसवन अशा नाविन्यपूर्ण संकल्पना हाती घ्याव्यात. वृक्षारोपणाच्या या कामात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मनरेगातून नर्सरी विकसीत करण्यासाठी 100 दिवसांच्या रोजगाराऐवजी 150 दिवसांचा रोजगार करण्याबाबत शासन पाठपुरावा करील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याने वन अधिकाऱ्यांनी यापुढील वृक्षारोपण मोहिमेचे शास्त्रशुध्द पध्दतीने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
    वन विभागाचे सचिव विकास खारगे या प्रसंगी बोलताना म्हणाले, राज्यात वृक्षारोपणाची मोहीम गतीमान केली असून आगामी दोन वर्षात सुमारे 46 कोटी वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम राबवण्यात येणार असून ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनाबरोबरच लोकसहभाग वाढवण्यावर वन अधिकाऱ्यांनी भर देण्याची सूचना त्यांनी केली. पुढील वर्षी लावण्यात येणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवडीचे आतापासूनच नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घेण्यात येणार  आहे. तसेच वृक्षसंवर्धनासाठी मनरेगातून आवश्यक उपाययोजना करण्यावरही शासनाने भर दिलाअसल्याचे त्यांनी सांगितले.
    या प्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन विभागाने राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानावर आधारीत पुस्तिकेसह राज्यातील वन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वनविभागाच्या काही कार्यालयांना मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्रांचे वितरणही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
    कुंडल वन ॲकॅडमीचे महासंचालक सरफराज खान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र देऊन स्वागत केले. कुंडल वन ॲकॅडमी येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आगमन प्रसंगी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा