सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- शिवगर्जना महानाट्य उपक्रमाची सांगता - तीनही दिवस शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरत आहे. या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून गेले तीन दिवस सुरू असलेल्या शिवगर्जना महानाट्य उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदि उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही शिवगाथा सांगलीकरांसाठी विनामूल्य सादर करण्यात आली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली व अलौकिक वारसा तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या महानाट्यात १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा आनंद घेतला. अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान अशा शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांनी साक्षात शिवकाल शिवप्रेमींपुढे उभा राहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे मैदान उजळून निघाले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा