गुरुवार, २६ मे, २०२२

पूरनियंत्रणाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्य पूर समन्वय बैठक. विविध धरणांमधून उपखोऱ्यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन होणार

- समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक होणार - अलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियमीत ठेवण्यास अलमट्टी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती सांगली दि. 26 (जि. मा. का.) : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची पूरनियंत्रणाबाबतची बैठक आज दि. 26 मे 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीत अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी दररोज जलशास्त्रिय माहितीची देवाण घेवाण करण्याचे तसेच विविध धरणांमधून उपखोऱ्यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन करण्याचे ठरले. पावसाळ्यामध्ये कृष्णाखोरे पूरनियंत्रण कक्ष, सांगली व अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे ठरले. ही बैठक जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस कर्नाटक राज्याचे अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता एच. सुरेश (KBJNI Dam zone), अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक सुर्वे, सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदवडेकर, कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार तसेच कोयना, वारणा, दुधगंगा, राधानगरी धरण व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली (Real Time Data Acquisition System) ही प्रणाली अधीक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील येवा, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. या प्रणालीचा वापर अधिक सक्षमपणे करुन कृष्णा उपखोऱ्यातील सर्व यंत्रणामध्ये समन्वय साधुन प्रभावी पूर नियंत्रण करता येईल, असा विश्वास मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला. अशा प्रणालीचा अवलंब कर्नाटक राज्यामध्ये देखील करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये राजापूर बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाच किलोमीटर अंतरावर नदीपात्रात नवीन पूल बांधकामासाठी करण्यात आलेला कॉपरडॅम व अनुषंगीक भरावा काढून घेण्याबाबत अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांनी संबंधीताना सूचना करण्यास सुचविले. त्याबाबत अधीक्षक अभियंता डी. बसवराज ( KBJNL, Dam Circle, Almatti) यांनी सहमती दर्शवली. कृष्णा उपखोऱ्यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जिवीत व वित्त हानी टाळून प्रभावी पुरनियंत्रणाच्या दृष्टीने अलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियमीत ठेवण्याविषयी बैठकीत चर्चा होवून यास अलमट्टी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा