शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

"माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान 18 वर्षावरील महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : शासनातर्फे दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानात जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. या अभियानाच्या जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी मोहिमेच्या उद्घाटनादिवशी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विशेष मेडीकल व डेंटल शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, आरसीएचओ डॉ. वैभव पाटील, डीआरसीएचओ डॉ. विवेक पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आदि उपस्थित होते. 30 वर्षावरील सर्व महिलांचे रक्तदाब, हिमोग्लोबीन, मधुमेह व थायरॉईड यांच्या अचूक तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन प्रशिक्षणाची तातडीने सोय करावी. तसेच ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांनी त्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे. सर्व प्रकारच्या तपासण्या अचूक असाव्यात. या तपासण्यानंतर ज्या महिलांमध्ये आरोग्य विषयक उपचारांची गरज भासेल त्यांना उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयाकडे वर्ग करावे. गरोदर स्त्रियांची जास्त काळजी घ्यावी. या तपासण्यांसाठी डिजीटल उपकरणांचा वापर करावा. महिलांमध्ये तंबाखू सेवनाची सवय असल्यास फोर फिंगर टेस्ट करावी. कर्करोगाविषयीच्या तपासण्याही कराव्यात. 40 वर्षावरील सर्व महिलांची सी.एच.ओ यांनी मोतिबिंदूची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या अभियानामध्ये पुढील प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. वजन व उंची, रक्त व लगवी, एक्सरे, मेमोग्राफी, कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग, आरटीआय-एसटीआय तपासणी, माता व बालकांचे लसीकरण, तज्ज्ञांमार्फत अतिजोखमीच्या मातांची तपासणी, सोनोग्राफी व सल्ल्यानुसार इतर तपासणी. औषधोपचार त्यामध्ये आयएफए, फोलिक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न सुक्रोज इंजेक्शन, आरआयटी/एसटीआय उपचार. तसेच पोषण, आरआयटी व एसटीआय, बीएमआय, मानसिक आरोग्य, स्तनपान व व्यसनमुक्ती या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावर देण्यात येणार आहे जोडप्यांना व दोन अपत्य असणाऱ्या मातांना उपलब्ध साधनांबाबत माहिती दिली जाणार आहे. 0 ते 6 वर्षे वयोगटातील मधील बालकांची तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाला जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेवक, सेविका यांनी घरोघरी जाऊन शिबीर व उपलब्ध सुविधा बाबत माहिती द्यावी या बाबतच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच या मोहिमेमध्ये 20 हजार 100 इतक्या गरोदर मातांची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा