शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

न्यायालयाच्या नुतन इमारत व कौटुंबिक न्यायालयातून कमी खर्चात जलद न्याय मिळावा - न्यायमूर्ती भूषण गवई

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्हा न्यायालयाची नुतन 'बी' विंग इमारत कौटुंबिक न्यायालय यांची अत्यंत दर्जेदार उभारणी  झाली असून या सुंदर वास्तूतून न्यायदानाचे गुणवत्तापूर्ण कार्य व्हावे. न्यायदान करत असताना सामाजिक आर्थिक न्यायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करा. पक्षकारांना कमी खर्चात जलद न्याय मिळावा यासाठी दक्ष राहा. आपण देशाच्या नागरिकांच्या हितासाठी आहोत याची जाणीव ठेवून घटनेला अभिप्रेत असे कार्य करा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली चे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
सांगली येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन 'बी' विंग इमारतीचे कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली चे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याहस्ते झाले. यावेळी आयोजित समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय मुंबई चे न्यायमूर्ती रणजीत मोरे, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती संदीप शिंदे, न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे, जलसंधारण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, महाराष्ट्र राज्याचे महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विजय पाटील, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली, सांगली वकील संघटना अध्यक्ष ॲड. सविता शेडबाळे यांची व्यासपीठावर तर  खासदार संजय पाटील, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, आजच्या काळात कौटुंबिक न्यायालयाची गरज महत्व वाढले आहे. वाद मिटविण्यासाठी संवाद आवश्यक आहे. हा संवाद निर्माण करण्यासाठी नुतन इमारतीच्या माध्यमातून चांगले वातावरण निर्माण केले आहे. या न्यायालयात विभक्त कुटुंब परत एकत्र आणण्यासाठी कार्य होईल अशी मला खात्री आहे. भांडण घेऊन आलेले जोडपे एकमेकांच्या हातात हात घालून आनंदाने परत जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी या इमारतीत असणाऱ्या अन्य न्यायालयामधूनही पक्षकाराला कमी खर्चात कमी वेळेत गुणवत्तापूर्ण न्याय मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कै. बॅरिस्टर शंकरराव पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. महापूरग्रस्त वकिलांसाठी वेस्टर्न इंडिया बार असोसिएशनने 5 लाख रूपयांची रक्कम उभारल्याबद्दलही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
न्यायमूर्ती रणजीत मोरे म्हणाले, सर्व न्यायालये एकाच परिसरात असा न्यायालयाचा कॅम्पस सांगली येथे महाराष्ट्रात प्रथमच निर्माण  झाला आहे. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून न्याय तातडीने गतीने पक्षकाराला मिळावा. सर्व प्रकरणांचा गतीने निपटारा व्हावा, असे सांगून न्यायदानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बी विंग मधील एडीआर सेंटर अधिक कार्यक्षम करावे. तडजोडीने प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी ज्येष्ठ वकिलांनी पुढाकार घ्यावा. न्यायाधीशांनी जलद न्याय द्यावा. एडीआर सेंटरचे महत्व पक्षकारांना पटवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे म्हणाल्या, बदलत्या काळात विभक्त कुटुंब व्यवस्था प्रचलित होऊ लागली आहे. स्त्री पुरूष यांच्या भूमिकांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे समस्याही बदलल्या आहेत. कुटुंबातील संवाद कमी होऊ लागला आहे. एकत्र असूनही एकत्र नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयांची गरज वाढली आहे. पती-पत्नीतील वाद कठोर कायद्यातून सोडविणे किचकट असून कौटुंबिक न्यायालयात समुपदेशकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. इतर न्यायालयांपेक्षा कौटुंबिक न्यायालयाचे कार्य वेगळे असून भूमिका वेगळी आहे. त्यामुळे या ठिकाणी सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. पती-पत्नीसोबत या ठिकाणी येणाऱ्या मुलांसाठी वेगळी व्यवस्था आवश्यक असून सांगली येथील कौटुंबिक न्यायालयात ती करण्यात आल्याबद्दल त्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून सांगलीतील कौटुंबिक न्यायालय हे मॉडेल कौटुंबिक न्यायालय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी न्यायालयीन परिसरात सुरक्षिततेसंबंधी सीसीटीव्ही कॅमेंरासाठी 25 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी नुतन इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच वेस्टर्न इंडिया बार असोसिएशनच्या माध्यमातून पूरग्रस्त वकिलांसाठी 5 लाख रूपयांचा निधी उभारल्याबद्दल वकील संघटनांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारत उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. या प्रसंगी त्यांची आठवण होणे अगत्याचे आहे असे सांगून मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयात उच्च पदावर गेल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याची न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली.
महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी नुतन इमारतीत कायद्यांच्या मुद्यांवर चांगले युक्तीवाद व्हावेत. न्यायदानात गुणवत्ता वाढावी असे सांगून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी स्पेशलायझेशन करू नये. सर्व प्रकारच्या कायद्याच्या शाखांचा अभ्यास करावा असे सांगितले.
12 कोटी 7 लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नुतन इमारतीत 6 कोर्ट हॉल, 1 फॅमिली कोर्ट, 1 अतिरीक्त फॅमिली कोर्ट हॉल असे एकूण 8 कोर्ट रूम तळमजल्यावर वैकल्पिक वाद निवारण केंद्र (एडीआर सेंटर) आहे. इमारतीच्या तळमजल्यावर रेल्वे आरक्षण, बँक, एटीएम, क्लिनीक, सार्वजनिक बांधकाम विद्युत शाखा कार्यालय इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर कौटुंबिक न्यायालय दोन न्यायदान कक्ष, दुसऱ्या मजल्यावर औद्योगिक, कामगार न्यायालय तसेच सहकार न्यायालय आहे. इमारतीच्या बाहेरील बाजूस लहान मुलांकरीता अद्ययावत बगीचा तयार करण्यात आला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये लहान मुलांसाठी भिंतीवरील रेखाचित्रे तसेच खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात कै. बॅरिस्टर शंकरराव पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. स्वागत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक ॲड. सविता शेडबाळे यांनी केले. आभार न्यायमूर्ती ए. आय. पेरमपल्ली यांनी मानले.
या कार्यक्रमास वकील, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा