सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

पूरबाधितांकडून जबरदस्तीने वसूली करू नका अन्यथा फौजदारी कारवाई करणार मायक्रोफायनान्स कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

सांगली, दि. 26 (जि.मा.का) : सांगली शहर आणि जवळपास 104 गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी आपल्या उपजिवीकेची साधने, संसार गमावले आहेत. अशा स्थितीत पूरग्रस्तांना आधार देवून शासन त्यांचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, अनेक मायक्रोफायनान्स कंपन्या ग्रामीण भागात आणि शहरात कर्जदारांकडून जबरदस्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसूली करू नये. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले.
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून जबरदस्तीने होत असलेल्या वसुलीबाबत येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जिल्हास्ततरीय प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, मायक्रोफायनान्स नेटवर्कच्या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचे देवेंद्र शहापुरकर यांच्यासह विविध मायक्रोफायनान्स कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूरबाधित क्षेत्रात शासनाकडून तातडीच्या मदतीसाठी देण्यात येत असणारे सानुग्रह अनुदान व अन्य तुटपुंज्या उपलब्ध रक्कमेतून मायक्रोफायनान्स कंपन्या पूरग्रस्त कर्जदारांकडून जबरदस्तीने कर्ज वसुली करत आहेत. अशा अनेक तक्रारी शहर व ग्रामीण भागातून येत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून होत असलेली ही वसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतही कठोर कारवाई करण्यात येईल. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जिल्हा प्रतिनिधींनी याबाबत गावपातळीवरील यंत्रणेलाही स्पष्टता द्यावी.  यावेळी त्यांनी स्थानिक स्तरावर मायक्रोफायनान्स कंपन्यांनी तक्रार निवारण कक्ष तात्काळ सुरू करावा. यावर येणाऱ्या तक्रारींची दखल घ्यावी. याबाबत एसआरओ यांनी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात असे निर्देश दिले.
मायक्रोफासनान्स कंपन्यांच्या वसुली संदर्भात तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 18002700317, सचिन घाटगे मो.क्र. 9881596110, श्री. रेवणसिध्देश्वर मो.क्र. 8888506688, देवेंद्र शहापुरकर मो.क्र. 9167252987 / 7498023220  या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा