सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित कुटूंबाना 40 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सानुग्रह अनुदान वाटप प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होणार

सांगली, दि. 26 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. ग्रामीण भागातील 42 हजार 525 व शहरी भागातील 29 हजार 524 कुटूंबांना 36 कोटी 2 लाख 45 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 7 हजार 338 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 3 कोटी 66 लाख 90 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. पुढील 2 दिवसात अनुदान वितरण पूर्ण होईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

21 हजार 70 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील 6 हजार 983 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 14 हजार 87 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 174 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 177 मिळकती आहेत. त्यापैकी 6 हजार 710 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.

पूरबाधित 61 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 25 ऑगस्ट अखेर 61 हजार 525 कुटुंबांना एकूण 6152.5 क्विंटल गहू व 6152.5 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 41 हजार 615 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 8 हजार 75 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

47420.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 92 हजार 477 शेतकऱ्यांच्या 47420.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 71.74 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

95 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 95 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 29 गावांसाठी एकूण 26 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 13 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे 15 हजार 348 किट वितरीत
राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 15 हजार 348 किट पाठविण्यात आले असून त्यामध्ये महानगरपालिका 5936, मिरज 7131, शिराळा 711, वाळवा 510, पलूस 1060 एवढ्या किटचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 30 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 299 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 48.17 कोटी इतका आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा