मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

शेतकऱ्यांना मोबाईल अॅपवर बाजार भावाची माहिती गुगल प्लेस्टोअरवर अॅप मोफत उपलब्ध - प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. 27: शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव  शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल अॅप विकसित  केले आहे. या अॅपवर शेतकऱ्यांना बाजार विषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याची माहिती पणन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
श्री. शिंदे म्हणाले, सध्या अनेक व्यवहार मोबाईलवर करण्यात येतात. कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना, उपक्रम, बाजारभाव, बाजार समित्यांची एकत्रित माहिती शेतकऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध  व्हावी यासाठी  मोबाईल अॅपवर विकसीत करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची रोजची आवक,बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, शेतकरी आठवडी बाजार, कृषी पणन मित्र मासिक,फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान  संस्था इ. बाबतची सर्व माहिती सुध्दा शेतकऱ्यांना या अॅपद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.
सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणा-या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती या अॅपद्वारे भरता येते. त्यामुळे बाजार समित्यांमधील बाजारभावांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध होते. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि  खरेदीदार याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अॅप वापरणाऱ्यास कृषी पणन मंडळामार्फत सूचना देण्याची सुविधा या अॅपमध्ये  उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे हे अॅप MSAMB या नावाने गुगल प्ले स्टोअर ला  मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
००००





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा