सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

गरजू पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 26 (जि.मा.का) : अनेक सामाजिक संस्था, संघटना प्रशासनाशी संपर्क न साधता परस्पर पूरबाधित गावांमध्ये मदत साहित्य वाटप करीत आहेत. यामध्ये अनेकदा गरजवंत पूरबाधितापर्यंत मदत न पोहोचता अन्यत्र वितरीत होत असल्याबद्दल तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने गरजवंतांची मदत अन्यत्र वळविल्याची घटना सामोरी आल्यास पोलिसांनी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्याचे सांगून पूरग्रस्तांना मदत करू इच्छिणाऱ्या संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती यांनी मदत वितरणात सुसुत्रता रहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले मदत स्वीकृती व वितरण केंद्र अथवा तालुकास्तरावरील प्रशासनाने सुरू केलेली मदत स्वीकृती केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
महापुराने सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांमध्ये अनेक कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. पण त्याचवेळी प्रशासनाशी संपर्क न करता परस्पर मदतीचे वाटप होत असताना अनेकदा ही मदत अन्यत्र वळविल्याच्या घटना समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी मदत करण्यास इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्राशी अथवा तालुकास्तरावरील मदत स्वीकृती केंद्राशी संपर्क साधल्यास कोणत्या भागात मदत पोहोचवणे आवश्यक आहे याची माहिती संबंधितांना दिली जाईल व त्यासाठी माहितगार शासकीय कर्मचारीही सोबत दिला जाईल. गावातील ग्रामपंचायतीजवळ मदत वाटपाचे नियोजन केल्यास खऱ्या गरजवंत पूरग्रस्ताला मदत पोहोचविणे शक्य होईल. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. पूरबाधितांना मदत देण्यासाठी पुढीलप्रमाणे संपर्क करावा - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली - श्रीमती  शिल्पा ओसवाल- 8007547333, तहसिल कार्यालय, मिरज - सुनील कानडे - 7709286873, तहसिल कार्यालय, वाळवा - श्रीमती शर्वरी पवार - 9422763562, तहसिल कार्यालय, शिराळा - श्री. सिद - 9421177627, तहसिल कार्यालय, पलूस - श्रीमती पाटील - 9404419378.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा